महानंद नाईकची रजा 8 दिवस करा

0
6

तुरुंग महानिरीक्षकांना निवेदन सादर

सिरीयल किलर महानंद नाईक याला देण्यात आलेला 21 दिवसांचा फर्लो कमी करून आठ दिवसांवर आणून भीतीच्या छायेखाली असलेल्या महिला वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन तुरुंग महानिरीक्षकांना सादर करण्यात आले आहे.
या निवेदनाची प्रत गोव्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आली आहे, अशी माहिती तारा केरकर यांनी येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

सिरीयल किलर महानंद नाईक याला फर्लोवर तुरुंगातून बाहेर सोडण्यात आल्याने महिला वर्ग भीतीच्या छायेखाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिरीयल किलर महानंद नाईक याच्या 21 दिवसांच्या फर्लोवर फेरविचार करावा, अशी मागणी तारा केरकर यांनी केली आहे.

तुरुंग प्रशासनाने शिक्षा भोगत असलेल्या सिरीयल किलर महानंद नाईक याला 21 दिवसांचा फर्लो मंजूर केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी तुरुंगातून बाहेर सोडले होते. सिरीयल किलर तुरुंगात असताना चांगले वर्तन केले तरी, तुरुंगातून बाहेर आल्यावर कोणती क्रूरकर्मे करील हे सांगता येणे कठीण आहे. त्याच्यावर पोलीस सुध्दा पाळत ठेवू शकत नाही, असे केरकर यांनी सांगितले.

सोळा युवतींचा खून
केल्याचा गंभीर आरोप

सिरीयल किलर महानंद याने लग्नाचे आमिष दाखवून सोळा युवतींचा खून केल्याचे उघड झाले होते. तो गेली कित्येक वर्षे तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

वर्ष 2018 मध्ये क्रूरकर्मा महानंद नाईक याला तुरुंगातून बाहेर सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी 1 लाख रुपयांची हमी आणि एक हमीदार देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावेळी महानंद नाईक याला तुरुंगातून सोडविण्यास विरोध झाला होता. त्यामुळे हमीदाराने माघार घेतली होती. त्यामुळे महानंद नाईक याचा तुरुंगातून बाहेर येण्याचा प्रयत्न बारगळला होता. आता, फर्लोसाठी नाममात्र हमी ठेवण्यात आली आहे, असेही केरकर यांनी सांगितले.