मलेशियन विमानातील सर्वजण ठार झाल्याचे स्पष्ट

0
145

१८१ मृतदेह सापडल्याचा दावा
युक्रेनमध्ये गुरूवारी क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे पाडण्यात आलेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानातील सर्व २९८ जण ठार झाले असून घटनास्थळी विखुरलेले १८१ मृतदेह ताब्यात घेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. सदर विमान कोणी पाडले याबाबत अद्याप निश्‍चित झालेले नसून रशियावादी बंडखोर व युक्रेनियन सरकार यांनी यासंदर्भात परस्परांवर आरोप केले आहेत. तथापि विविध देशांच्या प्रमुखांनी या कृत्याची स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान पूर्व युक्रेनमधील एका माळरानावर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर विमानातील ब्लॅक बॉक्स आपणाला मिळाला असल्याचा रशिया समर्थक बंडखोरांनी दावा केला. असून तपासणीसाठी तो मॉस्को येथे पाठविण्याचा विचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दुर्घटना स्थळावरील १८१ मृतदेह शोधून काढण्यात आल्याचे युक्रेनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या व घटनास्थळापासून २७० कि. मी. अंतरावर असलेल्या खारकिव येथे ओळख पटविण्यासाठी मृतदेह नेण्यात येणार असल्याचेही मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान दुर्घटनाग्रस्त विमानाच्या १५ कर्मचार्‍यांमध्ये मूळ भारतीय वंशाच्या दोन कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजीव सिंग संधू व आंजेलीन प्रमिला राजेंद्रन अशी त्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले. मलेशियन विमान पाडण्याच्या कृत्यास युक्रेन सरकार व रशिया समर्थक बंडखोर यांनी परस्परांवर दोषारोप केले आहेत. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याच्या ठिकाणी जाऊन शोधकार्य करण्यास आंतरराष्ट्रीय चौकशी पथकांना मुभा देण्यास रशिया समर्थक बंडखोरांनी मान्यता दिली आहे. मात्र अन्य भागांमध्ये आपली लढाई चालूच राहणार असल्याचे बंडखोरांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेत्रो पोरोशेन्को यांनी रशियन समर्थक बंडखोरांचा संदर्भ देऊन मलेशियन विमान दहशतवाद्यांनी पाडल्याचा आरोप केला आहे. दहशतवाद्यांनी एका फटक्यात ३०० जणांना ठार केले असल्याचे पोरोशेन्को यांनी म्हटले आहे.
दरम्यान मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी विमान पाडणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. हे वर्ष मलेशियासाठी शोकांतिक ठरले आहे. ताज्या दुर्घटनेत ठार झालेल्यांमध्ये अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश होता. दुर्घटनास्थळावर मदतकार्यासाठी वैद्यकीय पथकासह विशेष विमान पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे राजदूत सामंथा पॉवर यांनी मलेशियन विमान पाडण्याचे कृत्य हे रशियन तज्ज्ञांच्या तांत्रिक सहाय्याशिवाय शक्य नसल्याचे संयुक्त राष्ट्र संघाकडे स्पष्ट केले आहे.
रशियाचा पाठिंबा असलेल्यांचे कृत्य : ओबामा
मलेशियन विमान पाडणार्‍यांना रशियाकडून प्रशिक्षण व शस्त्रास्त्रांची मदत मिळाली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. त्यामुळे हे कृत्य रशियन बंडखोरांचे असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. रशियन विभाजनवाद्यांचे नियंत्रण असलेल्या प्रदेशात हे कृत्य घडले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.