- डॉ. मनाली महेश पवार
अतिअम्बुपान, विषमाशन, वेगधारणा व स्वप्नविपर्यय अशी ही चार महत्त्वाची मलावरोधाची कारणे आयुर्वेदशास्त्रात सांगितली आहेत. मग ज्यांना-ज्यांना हा मलावरोधाचा त्रास आहे त्यांनी स्वतःची कारणे काय हे स्वतःच शोधून काढाची व ही कारणे पहिली दूर करायची. या कारणांचा त्याग केला की 50 टक्के आजार इथेच बरा होईल.
‘कितीतरी वर्षे झाली, मला छान कडकडून भूक लागल्याचे आठवतच नाही’ किंवा ‘सकाळी शी-ची (मलप्रवृत्तीची) संवेदना झाली आणि मला उठायला झाले असे आठवतच नाही’ असे सांगणारे निम्म्याहून अधिक भेटतील. पूर्वीच्या काळी ब्रह्ममुहूर्तावर लोक उठत. हा वाताचा काळ. रात्री थकून लवकर झोपत असल्याने पचन नीट व्हायचे, त्यामुळे मलप्रवृत्तीची संवेदना होऊन उठायला व्हायचे. काढा घ्या, गरम पाणी प्या, चहा घ्या, कॉफी घ्या अशा कशाचीच गरज नव्हती, ना-ही मलावरोध, आयबीएस, अतिसार, ॲसिडीटी इत्यादींची कटकट. ना-ही लॅक्टोज ॲलर्जी, ना ग्लुटेन ॲलर्जी! त्यामुळे मलावरोधासारखा आजार आयुर्वेदशास्त्रामध्ये स्वतंत्रपणे वर्णिलेला मिळत नाही. तरीही अन्नपचनाविषयी मात्र शास्त्रात आढळते, कारण कुठल्याही शास्त्रात न वर्णिलेल्या जठराग्नीबद्दल आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे.
आज व्यवहारात अन्न अपचन, मलावष्टंभ असणारे अनेक रुग्ण पाहायला मिळतात व अनेक रोगांचे हे एक मूळ कारण आहे. आजच्या शब्दांत सांगायचे झाले तर जर आपलं ‘गट-फिलिंग’ उत्तम असेल तर आरोग्य निरोगी! अपचन, ॲसिडिटी, मलावरोध इत्यादी त्रास अगदी बालवयापासून होण्याची कारणे काय आहेत हे आधी जाणून घेऊ म्हणजे प्रत्येकाला ज्यांना हा त्रास आहे, त्यांना आपण कुठे चुकतो हे तरी समजेल म्हणजे त्या कारणांचा परित्याग केला की आपलं ‘गट-हेल्थ’ सांभाळता येईल.
आयुर्वेदशास्त्रात अपचन, आमउत्पत्ती, जठराग्नी मंद होण्याची, मलावरोधाची काही शारीरिक तशीच मानसिक कारणे सांगितली आहेत.
1) अतिअम्बुपान ः सध्या वॉटर थेरपी, भरपूर पाणी पिणे, दिवसा साताठ लिटर पाणी पिणे, सकाळी उठल्या-उठल्या तांब्या-तांब्या पाणी पिणे असे बरेच गैरसमज समाजात रूढ होत आहेत. जेवढे जास्त पाणी पिणार तेवढ्या आपल्या किडण्या फ्लश होतील किंवा गट प्लश होऊन निरोगी राहील असेही काहींचे मत आहे. परंतु पाणी खूप अधिक प्रमाणात पिण्याने किडणीवर भार येऊ शकतो, तसेच अन्नाचे पचन होणार नाही. कारण पाण्याचीसुद्धा पचनक्रिया होते. तसेच जल हे अग्नीच्या विरुद्ध आहे, त्यामुळे अग्नीवर पाणी ओतल्यास तो अग्नी विझणारच. मॉडर्न सायन्सनुसार विचार केल्यास अन्न पचायला जे ॲसिड कारणीभूत असते ते तीव्र-तीक्ष्ण असते. अतिअम्बुपान म्हणजेच गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्यास हे ॲसिड पातळ होणार म्हणजेच अन्नपचन मंदावणार.
- विषमाशन ः विषमाशन म्हणजे भूक लागलेली नसताना किंवा भूक लागलेली असतानासुद्धा खूप जास्त प्रमाणात आवश्यकतेपेक्षा अधिक किंवा खूप कमी प्रमाणात म्हणजे भुकेपेक्षा खूप कमी असे अन्नग्रहण करणे. आजकाल भूक लागल्यावर जेवले जात नाही तर जेवणाची वेळ झाली की जेवतात. शाळेची मुले शाळेतून आल्यावर, मग ते कितीही वाजलेले असोत! नोकरदार ऑफिस ‘लंच टाइम’वर, घरातील मंडळी घरातील सगळी कामे आटोपल्यावर व सगळ्यांची जेवणे उरकल्यावर. म्हणजे आपण सगळेच ‘एक नियम’ म्हणून दिवसाला दोन वेळा जेवतो. जेव्हा आपला अग्नी पेटलेला असतो, तेव्हा आपण पोटात इंधन घालतच नाही मग पचन तरी कसे होईल? त्याचप्रमाणे जेव्हा आपण घरी असतो तेव्हा सारखे चरत असतो, मग अग्नी प्रदीप्त कसा होईल व भूक तरी कशी लागेल?
आज सर्रास सगळीकडे चित्र एकच आहे, भूक लागलेल्या वेळी जेवण्यापेक्षा आपल्या सोयीच्या वेळेवर जेवणे. अगदी लहान मूलदेखील याला अपवाद नाही. कारण आज शाळेला त्याला नकळत्या वयातच घालतात. सकाळी ‘शी’ची (मलप्रवृत्तीची) सवय नाही, झटपट नाश्ता खाण्याची मॉडर्न सवय, मधली सुट्टी झाली की खाणे, या सर्वांचा दुष्परिणाम म्हणजे अपचन, ॲसिडिटी, जळजळ, मळमळ, संडासला कठीण होणे, खडे होणे, चिकट होणे, ब्लोटिंग व मलावरोध! नैसर्गिक भुकेच्या आधी किंवा नंतर खाणे म्हणजे विषमाशन व आजच्या काळातील हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
कधीकधी तर वेळेवर म्हणा किंवा वेळेनुसार तर जेवतोच, त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणात- आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाल्ले जाते. हेही अन्न न पचण्याचे अजून एक कारण आहे. कारण मोह आवरता येत नाही. अन्न हे आरोग्यासाठी सेवन न करता, जिभेला रूचकर लागेल त्यावरच जास्त भर असतो.
कधीकधी आवश्यकतेपेक्षा खूप कमी प्रमाणात खाल्ले जाते. गृहिणी बऱ्याच वेळा पूर्ण जेवणाचे ताट जेवण्यापेक्षा चहा, बिस्किटे, स्नॅक, नुसतीच पोळी-भाजी असे अपूर्ण व मात्रेत कमी खातात. ऑफिसला जाणारेही बऱ्याच वेळा वेळेअभावी वडा-पाव, चाट, फास्ट फूडसारखे अन्न सेवन करतात. भुकेपेक्षा कमी प्रमाणात असे अन्नपदार्थ खाल्ल्यास अन्नपचन नीट होत नाही व परिणामी मलावरोधाची समस्या निर्माण होते.
अति खाणे, कमी खाणे, अजीर्ण असता खाणे, अवेळी खाणे हे सध्या सर्रास घडते आहे. म्हणजे हे विषमाशन सर्रास सगळ्यांकडून (किमान 90 टक्के) लोकांकडून घडते व इथूनच आम उत्पत्तीपासून, अपचनापासून मलावरोधास सुरुवात होते.
- वेगधारणा ः ‘नॅचरल कॉल्स’ तसेच धरून ठेवणे किंवा बलपूर्वक रोखून धरणे, म्हणजे संडास, लघवी यांचे ‘नॅचरल कॉल्स’ अडवणे. त्याचबरोबर भूक लागलेली असता वेळेवर न जेवणे किंवा भूक लागलेली नसताना उगाचच काहीबाही खात राहणे. शाळेत जाणारी मुलं बऱ्याच वेळा लाजेने संडास-लघवीचा वेग आला असता जात नाहीत. सकाळी गडबडीतसुद्धा वेग आला असता उशीर होईल म्हणून अडवून ठेवतात. कधीकधी पालक मुलांना बळजबरी संडासात नेऊन बसवतात. मूल कुंथून-कुंथून वेगाचे उदीरण करून थकते, पण मलप्रवृत्ती काही होत नाही. यालाच वेगाचं उदीरण म्हणतात. त्याप्रमाणे काही गृहिणी, कंपनीमध्ये काम करणारे कामगार कामाच्या व्यापात मल-मूत्राचा वेग धारण करून अडवून ठेवतात. त्याप्रमाणे काही मुलं म्हणा किंवा मोठेही भूक नसताना उगाचच टीव्हीसमोर बसून- कंप्युटरवर काम करताना, आता तर ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पनाही काहींची चालू राहिली- तो वर्गही घरात हालचाल न करता, जास्तीत जास्त वेळ घरात असल्याने सारखा चरत राहतो, यालाच ‘क्षुधा’ या वेगाचं उदीरण म्हणतात. याव्यतिरिक्तसुद्धा जे वेग आहेत, त्यामध्ये उलटी, शिंक, खोकला, उचकी, जांभई, झोपसारख्या वेगांचे धारण किंवा उदीरण केल्यास अन्नाचे पचन होत नाही व पुढे अपचनातून मलावरोध निर्माण होतो.
- स्वप्न विपर्यय ः स्वप्न विपर्यय म्हणजे जेव्हा झोपायला हवे तेव्हा जागरण करणे आणि जेव्हा जागायला पाहिजे तेव्हा झोपणे. शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना याचमुळे मलावरोधाचा त्रास होतो. पूर्वी टीव्ही, मोबाईल तसेच शिफ्टमध्ये कामं नसायची. कामाची वेळ ठरलेली असायची. सकाळी लवकर काम सुरू करणे व रात्र व्हायच्या आत काम आटोपणे व ही कामे शारीरिक व मानसिक श्रमाची. त्यामुळे मेहनत केल्याने शरीर-मन आपसूकच थकायचे व लवकर झोप यायची. त्याचप्रमाणे मुलांनाही विरंगुळ्यासाठी काही साधनं नव्हती. रिल, इन्स्टा, फेसबुक, ट्विटर, नेटफ्लिक्स, वेब सिरिज असा कसलाच प्रकार नव्हता. त्यामुळे ‘लवकर निजे व लवकर उठे त्याला आरोग्य लाभे’ हे तंतोतंत खरे होते. पण आज सगळं चक्र बदललेय. घरी येणंच उशिरा होतं, त्यात नंतर जेवणं, नंतर टीव्ही, मोबाईल, मग झोप हे सर्व बारा-एकच्या पुढेच. सकाळी जमत नसताना, डोळ्यात झोप असताना उठायचे, मग दिवसभरात जसा वेळ मिळेल तसा म्हणजे अगदी 15 मिनिटांच्या डुलकीपासून दोन-तीन तास ताणून झोप घ्यायची. दिवसा झोपणे म्हणजे रात्री उशिरा झोपल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन नाही. तसेच दिवसा झोपल्यावर दुपारी जेवलेले अन्न तसेच पोटात राहते म्हणजे पचनाची गती मंदावते व पुढे मलावरोधाचा त्रास होतो.
अतिअम्बुपान, विषमाशन, वेगधारणा व स्वप्नविपर्यय अशी ही चार महत्त्वाची मलावरोधाची कारणे आयुर्वेदशास्त्रात सांगितली आहेत. मग ज्यांना-ज्यांना हा मलावरोधाचा त्रास आहे त्यांनी स्वतःची कारणे काय हे स्वतःच शोधून काढाची व ही कारणे पहिली दूर करायची. या कारणांचा त्याग केला की 50 टक्के आजार इथेच बरा होईल. मग योग्य आहार-विहाराचे ऋतुकालाप्रमाणे नियोजन केल्यास व सुज्ञ वैद्याकडून काही औषधोपचार घेतल्यास मलावरोधाचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो.
या शारीरिक कारणांबरोबर काही मानसिक कारणेही मलावरोधाची आहेत, ती पुढच्या लेखात…