मर्सिडीज चालकाला सशर्त जामीन मंजूर

0
4

>> आठ दिवस पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची अट

बाणस्तारी येथे 6 ऑगस्टला झालेल्या भीषण अपघाताला कारणीभूत मर्सिडीज कारचा चालक परेश ऊर्फ श्रीपाद सिनाई सावर्डेकर याला काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला.
बाणस्तारी येथील भीषण अपघातात तिघांचा बळी गेला होता, तर तिघे जण गंभीर जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी पोलिसांनी मर्सिडीज कारचालक परेश ऊर्फ श्रीपाद सावर्डेकर याला 7 ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर सुरुवातीला तो आठ दिवस पोलीस कोठडीत होता. या अपघात प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्याने त्याची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर, परेश सावर्डेकर याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अर्ज दाखल केला होता.

परेश सावर्डेकर याच्या जामीन अर्जावर काल सुनावणी घेण्यात आली. या अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी परेश सावर्डेकर याच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. त्याला 1 लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच रक्कमेचा हमीदार, गोव्याबाहेर जाऊ नये, पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणे, पोलीस स्थानकार आठ दिवस सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत हजेरी लावणे, तसेच पोलिसांच्या सूचनेनुसार पोलीस स्थानकावर उपस्थित राहणे, अपघात प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणू नये, अशा अटी घातल्या आहेत.