‘मन की बात’ हा आध्यात्मिक प्रवास

0
6

शंभराव्या भागात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

4 लाख ठिकाणाहून कार्यक्रमाचे प्रसारण

‘मन की बात’ हा कार्यक्रम नसून माझ्यासाठी श्रद्धा, उपासना आणि उपवास आहे. लोक देवपूजेला जाताना प्रसादाचे ताट घेऊन येतात. भगवंताच्या रूपातील जनता जनार्दनच्या चरणी हे प्रसादाचे ताट आहे. माझ्यासाठी हा एक आध्यात्मिक प्रवास झाला आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाचा रविवारी सकाळी 11 वाजता 100 वा भाग प्रसारित झाला. या ऐतिहासिक क्षणासाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्र मुख्यालयासह देश-विदेशात 4 लाख ठिकाणी प्रसारण झाले. भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी 100 ठिकाणी हे भाषण ऐकण्याची सोय केली होती.

पुढे बोलताना मोदी यांनी, 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या दिवशी आपण सर्वांनी मिळून मन की बातचा प्रवास सुरू केला. आज 100 वा भाग आहे, असे सांगितले.

ओबामासोबतची मन की बात चर्चेत
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत मी ‘मन की बात’ केली. तेव्हा जगभरात त्याची चर्चा झाली. मन की बात ही माझ्यासाठी इतरांच्या गुणांची पूजा करण्याची संधी आहे. असे मोदी पुढे म्हणाले.

ज्योष्ठ नागरिकांसोबत मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या शंभराव्या कार्यक्रमात साखळीतील खेडेकर सभागृहात ज्येष्ठ नागरिकासोबत कार्यक्रम पाहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रोद सावंत यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक भीमराव देसाई, भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, संजय नाईक तसेच ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी देशभरात अनेक लोकांशी संवाद साधला. अनेकांचे कौतुक करत प्रोत्साहन देताना लोकांना ऊर्जा देण्याचे काम केले असल्याचे काल मुख्यमंत्री म्हणाले. मन की बात नंतर डॉ. सावंत यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

गिनिज बूकमध्ये नोंद व्हावी ः मुख्यमंत्री

मन की बात कार्यक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातच्या शंभराव्या भागावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काल केली. पंतप्रधान मोदी यांचा मन की बात हा अनोखा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे शंभर भाग पूर्ण केले आहेत. देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाने अशा कार्यक्रमाचे शंभर भाग पूर्ण केलेले नाहीत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

या कार्यक्रमातील पंतप्रधान नागरिकांशी थेट संवाद साधतात. देशातील नागरिकांच्या आकांक्षांना प्रेरणा देण्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती देतात. मन की बात हा कार्यक्रम एकतर्फी संभाषण राहिला नसून तो लोकसहभाग चळवळ बनला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाद्वारे सकारात्मकता ः राज्यपाल पिल्लई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम लोकांच्या मनात सकारात्मकता आणतो. यात कोणावरही टीका होत नाही. आपल्या देशातील लोक भारताच्या भल्यासाठी, विकासासाठी एकत्र आले आहेत भारत हा विश्वगुरू आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी प्रसार भारती यांच्यातर्फे राजभवनवर मन की बात कार्यक्रमानिमित्त आयोजित कािर्यक्रमात काल केले.