मनीष सिसोदिया यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी

0
10

>> कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरण

कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांना काल 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ही कोठडी सुनावली. सिसोदिया यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली होती.
रविवारी केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर काल सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सिसोदिया यांच्या सांगण्यावरून कमिशन 5 कोटींवरून 12 कोटी रुपये करण्यात आले. त्यामुळे अधिक चौकशीसाठी कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा सीबीआयने न्यायालयात मांडला.
सीबीआयने मागितलेल्या मनीष सिसोदिया यांच्या कोठडीला त्यांचे वकील दयान कृष्णा यांनी विरोध केला. कोठडी मागण्याचे कोणतेही कारण नसून, तपासात असहकार्याचे आरोप निराधार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राऊस एव्हेन्यू न्यायालयाने सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीवरील निर्णय काही काळासाठी राखून ठेवला होता. त्यानंतर त्यांना 5 दिवसांच्या कोठडीत पाठवण्याचा निर्णय सुनावला. तत्पूर्वी, सोमवारी दुपारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

आपची भाजप मुख्यालयासमोर निदर्शने

सीबीआयने कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केल्याच्या निषेधार्थ गोव्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील भाजप मुख्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने करून उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध केला.
आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रुज सिल्वा व इतर कार्यकर्त्यांनी या निदर्शनामध्ये सहभाग घेतला. केवळ राजकीय दबावामुळे सिसोदिया यांना अटक करण्यात आली असून त्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी आपच्या कार्यकर्त्यांनी केली. केंद्र सरकारला हिंमत असेल तर कथित आर्थिक घोटाळ्याचा आरोप होत असलेले गौतम अदानी यांची चौकशी करावी, अशी मागणी आपचे नेते वाल्मिकी नाईक यांनी केली. आपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार, भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात घोषणाबाजी केली.