मतदारांना विश्‍वासात घेऊनच भाजप प्रवेश

0
9

>> आमदार संकल्प आमोणकर यांचा दावा; विकासासाठी सरकारमध्ये सामील

भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा माझा एकट्याचा निर्णय नसून, माझ्या मतदारांना विश्वासात घेऊनच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माझ्या मुरगाव मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्यासाठी आणि मतदारांची कामे करण्यासाठी सत्तारूढ सरकारमध्ये प्रवेश करणे आपण हितावह समजले, अशी प्रतिक्रिया मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी भाजप प्रवेशानंतर काल हेडलँड-सडा येथे दिली.

कॉंग्रेसच्या ज्या ८ आमदारांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात संकल्प आमोणकर यांचाही समावेश आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर संकल्प आमोणकर यांनी हेडलँड-सडा येथील गणपती मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, साईबाबा मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमले होते. फटाके वाजवून संकल्प आमोणकर यांचे स्वागत करण्यात आले. काहींनी गळाभेट घेत, तर काहींनी पुष्पगुच्छ देऊन संकल्प आमोणकर यांचे स्वागत केले. आता मुरगाव मतदारसंघाला बळकटी आली आहे; कारण आपले मतदार तसेच भाजप कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. भाजप मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि कार्यर्त्यांनी आता एकत्र मिळून काम करणे गरजेचे आहे. माझ्या जाहीरनाम्यात जी आश्‍वासने दिली आहेत, ती आता आपण पूर्ण करणार आहे. मुरगाव मतदारसंघाचा कायापालट करण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे आमोणकर म्हणाले.

संकल्प आमोणकर यांचे खंदे समर्थक तथा समाजसेवक शंकर पोळजी यांनी या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. आज जेव्हा आपल्या मातृभूमी गोव्याला महागाई, वाढती गुन्हेगारी, रोजगाराची समस्या, कोळसा समस्या, जंगलतोड, खाणकाम, खाजगीकरण, खाणबंदी या विरोधात आवाज उठवण्यासाठी चांगल्या राजकारण्यांची गरज होती, त्याचवेळी विरोधी आमदारांनी कच खाल्ली आहे. कॉंग्रेसच्या आमदारांनी पक्षांतर करून मतदारांचा विश्वासघात केला आहे. या पक्षांतराला आपला तीव्र विरोध आहे, असे शंकर पोळजी म्हणाले.

कॉंग्रेसच्या आमदारांनी मतदारांची अक्षरश: फसवणूक केली आहे. एकाच उमेदवाराला निवडून देण्याची जबाबदारी ही मतदारांवर असते. भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस कधीच गंभीर नव्हती, हे आजच्या नाट्यावरून कळले, अशी प्रतिक्रिया मागील विधानसभा निवडणुकीतील तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार जयेश शेटगावकर यांनी दिली.

मुरगावच्या जनतेने भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून कॉंग्रेसच्या उमेदवाराला स्पष्ट बहुमत दिले; मात्र त्यांनी मुरगावच्या जनतेचा पराभव केला, अशी प्रतिक्रिया परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली.

हे राजकीय नाट्य घडणार, हे सगळ्यांनाच माहीत होते. हे सगळे आमदार भाजपात गेले हे बरे झाले. लोकांनाही कळायला हवे, त्यांनी शपथ घेऊन काय केले? लोकांची फसवणूक केली. पुढील विधानसभा निवडणुकीत या फुटीरांचा भाजपला त्रास होणार हे नक्की. मात्र हे आमदार भाजपात गेल्याने कॉंग्रेसला बळकटी आली आहे.

  • कार्लुस आल्मेदा, माजी आमदार, वास्को.

कॉंग्रेस आमदारांचे पक्षांतर ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. हे पूर्वीच होणार होते; मात्र जरा उशीर झाला. कॉंग्रेसच्या प्रमुखांच्या चुकीमुळे हे सर्व घडले. हे नेते निवडणुकीपुरती येतात व दिखावा करतात. आपण फुटीर आमदारांना दोष देणार नाहीं. कॉंग्रेसमधील नेतृत्व संपले आहे. देवापुढे शपथ घेतल्यानंतर ती मोडून या कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी मोठी घोडचूक केली आहे.

  • जुझे फिलीप डिसोझा,
    माजी महसूलमंत्री.

आमोणकरांच्या कार्यकर्त्यांत निरुत्साह

संकल्प आमोणकर यांचे हेडलँड-सडा येथे साधेपणाने स्वागत झाले. भाजप प्रवेशानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणावा तेवढा उत्साह दिसून आला नाही. कॉंग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुरगाव आणि वास्कोत उलटसुलट चर्चा सुरू होती. कोणी आमोणकर यांनी भाजप प्रवेशाचा योग्य निर्णय घेतला, असे म्हणत होते, तर कोणी या प्रवेशाने त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर धोंडा मारून घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत होते.