भूस्खलनातील मृतांचा आकडा 167 वर

0
7

केरळमधील वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे हाहाकार माजला असून, मेप्पाडीच्या डोंगराळ भागातील मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा सर्वकाही नष्ट झाले आहे. भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 167 वर पोहोचली आहे, तर अद्याप 191 लोक बेपत्ता आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ नौदल आणि वायूदलाच्या वतीने बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे संपूर्ण परिसरात चिखल झाला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

मुसळधार पावसामुळे केरळमधील वायनाड जिल्ह्यातील चार गावांत मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाले होते. वायनाडमधील मेप्पाडीच्या डोंगराळ भागात 4 तासांत 3 वेळा भूस्खलन झाल्याने झोपेतच शेकडो लोकांना मृत्यूने गाठले होते. बचावकार्य व शोधमोहिमेनंतर आतापर्यंत 167 लोकांचे मृतदेह हाती लागले असून, अद्यापही जवळपास 200 लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. अजूनही बरेच लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. काल घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी काल प्रियजनांचा आक्रोश दिसून आला. वायनाडमध्ये निसर्गाचा विध्वंस मन हेलावून टाकणारा आहे.

मलप्पुरमच्या पोथुकल्लू परिसरातून 10 मृतदेह सापडले आहेत. जिथे भूस्खलन झाले, तिथून चालियार नदीत हे मृतदेह वाहून गेले होते. नागरी संरक्षण, पोलीस, अग्निशमन विभाग, एसडीआरएफ, एनडीआरएफचे सुमारे 250 कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. त्याचवेळी लष्कराच्या 122 इन्फंट्रीचे सुमारे 225 जवान बचाव कार्यात गुंतले आहेत.