28 C
Panjim
Sunday, March 7, 2021

भीषण

खरोखर हे घोर कलियुग आहे. अन्यथा श्रीपाद नाईक यांच्यासारख्या सज्जन आणि विनयशील लोकनेत्यावर अशा प्रकारचा दैवाचा घाला कसा पडला असता? त्यांची सुस्वभावी पत्नी अशा भीषण रीतीने हे जग सोडून कशी गेली असती? गुंडपुंड आणि मवाली, मस्तवाल माणसांचे कधी काही वाईट होताना सहसा दिसत नाही. अकाली देवाघरी जातात ती साधी, सज्जन माणसे. दैवाचा घाला सहसा पडतो तो अशा सरळमार्गी माणसांवर. म्हणूनच तर सध्याचे हे युग कलियुग म्हटले जाते.
ज्या भीषण प्रकारे दैवाचा घाला श्रीपाद नाईक यांच्या कुटुंबावर पडला तो साराच प्रकार सुन्न करणारा आहे. केवळ गोव्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये त्याविषयी तीव्र हळहळ व्यक्त होताना दिसते आहे. स्वतः श्रीपादभाऊ या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले ते केवळ त्यांचे दैव बलवत्तर म्हणून.
आजवर अनेक राजकीय नेत्यांचा रस्ता अपघातांमध्ये बळी गेला आहे. माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, गोपीनाथ मुंडे, राजेश पायलटांसारखे उमदे नेते, साहिबसिंग वर्मा, येरन नायडू, श्रीकांत जिचकार.. नामावली मोठी आहे. हवाई दुर्घटनांची यादी काढली तर जीएमसी बालयोगी, माधवराव शिंदे, वायएसआर रेड्डी, दोरजी खांडू अशी कित्येक नावे समोर येतात. यापैकी बहुतेक नेते हे अतिशय उमदे आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते होते, परंतु त्यांच्यावरच दैवाचा घाला पडला. सुदैवाने श्रीपादभाऊ या भीषण दुर्घटनेतून बचावले, परंतु त्यांच्या कोणाच्या अध्यात मध्यात नसणार्‍या आणि सदैव कार्यकर्त्यांची आई बनून वावरत आलेल्या, आल्या गेलेल्याचा मनःपूर्वक पाहुणचार करीत आलेल्या सुस्वभावी पत्नीचे अशा प्रकारे अपघातात तडकाफडकी जाणे हे देखील अतिशय शोकजनक आहे. आज या घडीला श्रीपादभाऊंची आणि त्यांच्या पुत्रांची सांत्वना करावी तेवढी कमी असेल.
आपल्या देशात रस्ता अपघात हरघडी होतच असतात. कित्येक लोक मृत्युमुखी पडतात, कितीतरी जायबंदी होतात. किती कुटुंबे उद्ध्वस्त होतात. असा एखादा भीषण अपघात घडला की त्यावर काही काळ चर्चा होते, परंतु पुन्हा येरे माझ्या मागल्या होऊन जाते.
जेथे परवाचा अपघात घडला तो जंगलातून जाणारा जवळचा आडमार्ग असल्याने खराब स्थितीत होता हे तर स्पष्टच झाले आहे. त्यामुळेच चालकाचा गाडीवरील ताबा गेला आणि ती बाजूच्या झाडझाडोर्‍यात जाऊन कोसळली. नव्या कोर्‍या इनोव्हा क्रेस्टासारख्या मजबूत वाहनाची जी दुर्दशा या दुर्घटनेत झाली आहे ती पाहिल्यास अपघात झाला तेव्हा गाडी किती भरधाव असेल याचीही कल्पना येते.
धर्मस्थळ, यल्लापूर, उडुपी, गोकर्ण अशी तीर्थस्थानांना भेटी द्यायला नाईक कुटुंब निघाले होते. काही दिवसांपूर्वीच श्रीपादभाऊंना कोविडची बाधा झाली होती. त्यातून ते सुखरूप बचावल्याने कदाचित पत्नीच्या आग्रहास्तव ही तीर्थयात्रा त्यांनी आखली असावी. परंतु एकेक ठिकाण आटोपून पुढे जात असताना पुढील वेळ पाळण्याच्या नादात हे वाहन भरधाव चालवले गेले असे दिसते. वास्तविक ह्या वाहनाला पुढे एस्कॉर्ट जीप होती. परंतु तिला मागे टाकून पुढे जाण्याची घाई चालकाने केल्याचे कारवारच्या आमदार रुपाली नाईक यांनी काल सांगितले. अपघात घडण्यास कारणीभूत ठरलेला दोष कोणाचाही असो, जे घडायचे ते तर घडून गेले. परंतु सर्वांसाठीच आणि त्यातही विशेष करून राजकारण्यांसाठी हा निश्‍चितच एक महत्त्वाचा धडा आहे. ‘अति घाई संकटात नेई’ हे महामार्गावरचे फलक नुसते वाचून मागे सारण्यासाठी नसतात. या घाईपोटी असे काहीतरी भयंकरही घडू शकते याचे भान या अपघाताने सर्वांना आणून दिलेले आहे. विशेषतः आपली नेते मंडळी अनेक कार्यक्रम आटोपण्याच्या नादात सतत प्रवासात असते. पुरेशा विश्रांतीचा अभाव, सततचा प्रवास यामुळे चालकावर ताण आलेला असू शकतो. त्यामुळे अशा अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
श्रीपाद यांच्या अपघाताचे वृत्त कळताच स्वतः पंतप्रधानांनी जातीने पुढील सूत्रे हलविली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तत्परता दाखवली. संरक्षणमंत्री राजनाथसिंग स्वतः गोव्यात येऊन गोमेकॉच्या डॉक्टरांना भेटले. गरज भासल्यास श्रीपादभाऊंना दिल्लीत हलविण्याची तयारीही दर्शवली. श्रीपादभाऊ कोरोनाने आजारी होते, तेव्हाही त्यांच्यासाठी ’एम्स’ च्या डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या सहकार्‍यासाठी संकटाच्या काळी सर्वतोपरी मदतीचा हात पुढे करण्याचा पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केलेला भाव ह्रद्य आहे. या सर्व धडपडीचे फळ म्हणून आपले श्रीपादभाऊ लवकरात लवकर बरे होवोत, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा घडो आणि ते पुन्हा आपल्या पायांवर उभे राहून जनसेवेसाठी सक्रिय होवोत अशी प्रार्थना करणेच या घडीला आपल्या सर्वांच्या हाती आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

ALSO IN THIS SECTION

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतरच निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा

>> गिरीश चोडणकर यांचे आयोगाला पत्र गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला लिहिलेल्या एका...

शुक्रवारी राज्यात ७९ कोरोना रुग्ण

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नवीन ७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना...

सीझेडएमपीवर उद्या सुनावणी

राज्यात येत्या रविवार ७ मार्चला पणजी आणि मडगाव येथे किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर (सीझेडएमपी) जनसुनावणी घेतली जाणार आहे. पणजी येथील जनसुनावणी कला...