भारतात कोरोनाबाधित २८ रुग्ण

0
135

>> केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची माहिती

भारतात आत्तापर्यंत २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी कोरोना व्हायरसचा भारतातील शिरकाव, धोका आणि त्यासंबधीत उपयायोजनांची माहिती दिली. कोरोनाबाधित रुग्णातील तिघांवर उपचार केल्यावर ते बरे झाल्याची माहितीही यावेळी मंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

कोरोनामुळे दिल्ली, नोएडा भागातील नागरिक धास्तावले आहेत. त्यांना दिलासा देण्यास दिल्ली सरकारलाही डॉक्टरांची टीम मजबूत करण्यावर भर देण्यास सांगितले असल्याचे मंत्री म्हणाले.
इटलीहून आलेल्या पर्यटकांच्या गटामधले १६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. याच गटातील एका भारतीयालाही कोरोनाची लागण झाली असून या सर्वांना आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये हलवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

इटलीहून भारतात पर्यटनाच्या निमित्तानं दाखल झालेल्या २१ पर्यटकांपैंकी १६ जण करोनाग्रस्त असल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे. या पर्यटकासोबत असलेल्या २१ पर्यटक आणि तीन भारतीय टूर ऑपरेटर्सना दिल्लीस्थित आयटीबीपीच्या क्वारेंटिन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. यातील १६ पर्यटक आणि १ भारतीय कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे.

कोरोनासंदर्भात रोज आढावा ः जावडेकर
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण तयारी केली आहे. कोरोनासंदर्भात सरकारकडून दररोज आढावा घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण तयारीवर स्वतः जातीने लक्ष घालत आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

देशातील २१ विमानतळांवर प्रवशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ६ लाख नागरिकांची तपासणी केली गेली असल्याचे ते म्हणाले. कोरोनापासून बचाव करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि सीबीएसईला दिले आहेत.
नेपाळ, भूतान आणि म्यानमारच्या सीमांवरही १० लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असल्याचे जावडेकर यावेळी म्हणाले. १५ ठिकाणी कोरोनासंदर्भात चाचण्या करण्यात येत आहेत. आणखी १९ तपासणी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये चाचणी करण्यात येत होती अशी माहितीही यावेळी मंत्री जावडेकर यांनी यावेळी दिली.