भारतातील वृक्षविशेष

0
259
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

हिवाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत चाफ्याच्या झाडावर भरपूर पाने असतात. नंतर पुन्हा हिवाळा येईपर्यंत झाड निष्पर्ण असते. निष्पर्ण चाफ्याला फुले आलेली पाहणे हा एक आनंदानुभव आहे. तो काव्यानुभवही होऊ शकतो.

पांगारा हा भारतीय वृक्ष आहे. समुद्रकिनार्‍याच्या आसपासच्या प्रदेशात तो वाढतो. ब्रह्मदेश, अंदमान बेटात, जावा आणि पॉलिनेशिया येथील जंगलात तो विपुल आढळतो. समुद्रकिनार्‍यालगतच्या प्रदेशात त्याची वाढ चांगली होते. हे मध्यम उंचीचे झाड खूप भरभर वाढते. ते दणकट आणि पानझडी असते. त्याची साल मऊ आणि काळपट हिरवी असते. तिचे ढलपे हळूहळू निघून जातात. याचे खोड आणि फांद्या यांच्यावर तीक्ष्ण काटे असतात. झाड वाढीला लागले की काटे निघून जातात. स्वसंरक्षणासाठी निसर्गाने त्याची अशी योजना केली असावी. या वृक्षाचे लाकूड ठिसूळ असते.

या वृक्षाची पाने तीन-तीन पर्णिकांची मिळून बनलेली असतात. या पर्णिका त्रिकोणी आणि मोठ्या असतात. मधली पर्णिका सर्वांत मोठी असते. पाने तजेलदार आणि हिरवी असतात. ती हिवाळ्यात गळून जातात. नंतर मार्च-एप्रिलपर्यंत झाड निष्पर्ण असते. छोट्या झाडांवर मात्र वर्षभर पाने असतात. जानेवारीच्या सुरुवातीपासून या झाडाला फुले येऊ लागतात. मार्च- एप्रिलपर्यंत या फुलांचा मोसम असतो. छोट्या डहाळ्यांच्या टोकांशी भडक शेंदरी फूल येते किंवा फुलांचा गुच्छ येतोे. एकेका दांड्यावर अनेकदा फुले येतात. फुलाला पाच पाकळ्या असतात. त्यातली एक इतर पाकळ्यांहून मोठी असते. वसंत ऋतूत फुलांनी बहरलेला पांगारा खूप देखणा असतो. याच्या बिया तपकिरी, तांबड्या किंवा बैंगणी रंगाच्या असतात.

छोेट्या नावा आणि दागिने बनविण्यासाठी पांगार्‍याच्या मऊ लाकडाचा उपयोग करतात. याच्या पाकळ्या उकडून लाल रंग तयार करतात. पिकावर सावली धरण्यासाठी, द्राक्षाच्या वेलीला किंवा काळ्या मिर्‍याच्या रोपाला आधार देण्यासाठी बर्‍याचदा या झाडाचा उपयोग केला जातो. बागेभोवती कुंपण म्हणूनही पांगार्‍याची झाडे लावतात. जमिनीचा कस सुधारण्यासाठीदेखील हे झाड लावले जाते. पांगार्‍याचे झाड हे अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे विश्रांतिस्थळ असते. त्याच्या फुलांना सुगंध नसला तरी त्यातील मध त्यांना आवडतो. महाभारतात या झाडाचा उल्लेख आढळतो.

खैर हे मध्यम उंचीचे झाड आहे. त्याचे खोड काळपट, तपकिरी असते. अतिशय गडद रंगाचे. पृष्ठभागावर उभ्या भेगा असतात. त्याची पाने द्विपिच्छाकृती, दुय्यम पर्णाक्षाच्या पंधरा-वीस जोड्या असतात. प्रत्येकीवर पंचवीस-तीस पर्णिकांच्या जोड्या असतात. प्रत्येक दुय्यम वर्णाक्षाच्या जोडीच्या तळाशी तसेच प्रत्येक पर्णिकांच्या जोडीच्या तळाशी बारीकशी पेल्याच्या आकाराची ग्रंथी असते. याची फुले पांढरट पिवळी आणि अतिशय बारीक असतात. फुलांना मंद सुगंध येतो. या झाडाला चपट्या शेंगा येतात. शुष्क प्रदेशात, मैदानी भागात ही झाडे वाढतात. याच्या काष्ठापासून कात काढतात. रंगासाठी, तसेच कातडी कमावण्यासाठी खैराच्या लाकडाचा उपयोग करतात. तबला बनविण्यासाठी काही ठिकाणी या लाकडाचा उपयोग केला जातो.

अर्जुन हा उंच वाढणारा वृक्ष आहे. तो भारतात तसेच श्रीलंकेत जंगलात तसेच नद्या व ओढे यांच्या काठावर वाढतो. तो पानझडी वृक्ष आहे. त्याच्या बुंध्याजवळ अनेक आधारमुळे व खोडावर आडव्या पसरट फांद्या असतात. त्याची साल जाड, हिरवट पांढरी, क्वचित लालसर तिचे पातळ पापुद्रे निघतात. पाने आयत-दीर्घवर्तुळाकृती, चिवट व गुळगुळीत असून देठावर पात्याच्या तळाशी दोन ग्रंथी असतात. फुले फिकट पिवळी असतात.

अर्जुनाचे लाकूड बाहेरून तांबूस-पांढरे व आत पिंगट असून गर्द रंगाच्या रेषा असल्यामुळे ते शोभिवंत दिसते. घरबांधणी, बैलगाड्या, शेतीची अवजारे, लहान होड्या, ब्रशांच्या पाठी इत्यादींसाठी हे लाकूड उपयुक्त असते. सालीतून निघणारा डिंक औषधी असतो. साल शक्तिवर्धक, ज्वरनाशक, हृदयास बल देणारी, पित्तविकारावर आणि जखमांवर उपयुक्त आहे. पानांचा रस कानदुखीसाठी वापरतात. रानावनात असलेला अर्जुनवृक्ष दुरूनही आपले लक्ष वेधून घेतो.

पारिजात हे फार उंच वाढणारे झाड नव्हे. याचे खोड राखाडी किंवा हिरवट पांढरे असते. साल खडबडीत आणि फांद्यांवरील लव ताठर, पांढरी असते. फांद्यांच्या टोकाशी शंकूच्या आकाराचे झुबके येतात. सुवासिक पांढरी फुले आणि डेरवे केशरी-लालसर असतात. भारतात सर्वत्र आढळतात. मंदिरांच्या परिसरात ती अधिक प्रमाणात असतात. प्राजक्ताची फुले रात्री उमलतात आणि सकाळी झाडाखाली त्यांचा सडा पडलेला असतो. त्यांच्या अस्तित्वामुळे आसमंत शुचिष्मंत वाटतो. प्राजक्ताच्या झाडामुळे घराभोवतालच्या वातावरणाला आगळी-वेगळी शोभा प्राप्त होते. ते सुगंधितही झालेले असते. देव-दैत्यांच्या सागरमंथनाच्या वेळी प्राजक्त वृक्ष प्राप्त झाला अशी मिथ्यकथा सांगितली जाते. श्रीकृष्णाने हे झाड रुक्मिणीच्या दारात लावले तेव्हा सत्यभामा रागावली. तेव्हा तिच्या दाराशी पडलेला प्राजक्ताचा सडा पाहून तिच्या मनातील रोष मावळला अशीही दंतकथा सांगितली जाते. बालकवींनी ‘श्रावणमास’ या कवितेत याचा उल्लेख केलेला आहे. पारिजातकाची फुले कवींना अत्यंत प्रिय. अभिजात संस्कृत वाङ्‌मयात आणि अन्यत्र त्यांचा संदर्भ अनेकवार येतो.
बकुळ हे उंच वाढणारे डौलदार झाड. त्याचे खोड जवळजवळ गुळगुळीत असते. साल असताना ते खवल्याखवल्यांचे असते.

पर्णसंभार दाट असतो. साधारणत: फुले सायंकाळी गळून पडतात. सकाळपर्यंत त्यांची पखरण चालू असते. या फुलांचा हंगाम जानेवारी ते जूनपर्यंत असतो. सुवासिक फुलांसाठी आणि तजेलदार हिरव्या पानांसाठी या झाडाची लागवड मुद्दाम केली जाते. बकुळीची फुले अत्यंत लोकप्रिय. या झाडाच्या सालीपासून दंतमंजन केले जाते.
उंबर हा भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष आहे. खूप उंचीपर्यंत ते वाढत नाही. मात्र त्याचा पर्णसंभार गोलाकार स्वरूपात पसरतो. त्याचे खोड सरळ आणि गुळगळीत असते. जुनाट वृक्षाचे खोड गुळगुळीत पण गाठीयुक्त असते. पाने अंडाकृती किंवा भाल्याच्या आकाराची असतात. फुले लक्ष न वेधणारी, कच्च्या उंबराच्या आत असतात. दुर्मीळतेच्या संदर्भात ‘उंबराचे फूल’ असा शब्दप्रयोग येतो तो यासाठीच. खरी फळे अत्यंत बारीक असतात. उंबर हे छद्मफळ आहे. पिकल्यावर उंबर लालसर होते. आत असंख्य कीटक असतात. उंबराचे घोस खोडावर आणि पर्णहीन फांद्यांवर येतात. डोंगरी प्रदेशांत, मैदानी प्रदेशांत किंवा नदीकाठावर उंबराची झाडे सर्वत्र दिसतात. या झाडाचे दृश्य आल्हाददायी असते. नदी, तलावाकाठच्या उंबराच्या वृक्षाची शान आगळी-वेगळी असते. वटवाघळे, खारी आणि वानरे यांचे आवडते खाद्य म्हणजे उंबरे. हा पवित्र वृक्ष मानला जातो. बालकवींच्या ‘औंदुंबर’ या कवितेमुळे मराठी काव्यसृष्टीत या झाडाला अक्षय स्थान प्राप्त झाले आहे.

देवचाफा हे मुळातले मॅक्सिको, ग्वाटेमाला आणि उष्ण कटिबंधात वसलेल्या अमेरिका खंडातील देशांतले. पण आता हे झाड भारतात एवढे रूळलेले आहे की ते येथलेच वाटावे. साधारणत: पांढरी पिवळसर रंगाची किंवा लालसर वर्णाची फुले त्याला येतात. आता कलमी चाफ्याला वेगवेगळ्या रंगाची फुले येतात. हे मध्यम आकाराचे पानझडी झाड आहे. ते भरभर वाढते. त्याचे खोड आणि फांद्या मांसल आणि वेड्यावाकड्या असतात. पण त्यातदेखील लय सांभाळली गेली आहे असे चित्र दिसते. चाफ्याची पाने मऊ, हिरवीगार, लांबट असतात. त्यांना छोटे देठ असतात. हिवाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत चाफ्याच्या झाडावर भरपूर पाने असतात. नंतर पुन्हा हिवाळा येईपर्यंत झाड निष्पर्ण असते. निष्पर्ण चाफ्याला फुले आलेली पाहणे हा एक आनंदानुभव आहे. तो काव्यानुभवही होऊ शकतो. बोरकारांनी म्हटले आहे ः
माझ्या गोव्याच्या भूमींत
चांफा पानावीण फुले
अशा प्रकारे अनेक कवी-कवयित्रींनी तो आपला काव्यविषय केलेला आहे.

सागवान ऊर्फ साग वृक्ष हा मूळचा मध्य आणि दक्षिण भारत, ब्रह्मदेश आणि थायलंड या भूप्रदेशांतला. किनारपट्टीपेक्षा अंतर्गत भागात हे झाड चांगले वाढते. उष्ण कटिबंधातील दमट, उष्ण हवामान आणि भरपूर पाऊस या झाडाला खूप मानवतो. पण थोड्याशा निराळ्या परिस्थितीतही ते चांगल्या प्रकारे वाढू शकते. सागाला भरपूर जागा, प्रकाश आणि सकस जमीन लागते. नदीकिनारी सागाची झाडे आढळतात. तशीच डोंगरउतारावरही ती वाढतात. हा पानझडी वृक्ष हळूहळू वाढतो. त्याची पूर्ण वाढ व्हायला साठ ते ऐंशी वर्षे लागतात. त्याची साल राखाडी किंवा तपकिरी-करड्या रंगाची असते. या झाडाची पाने मोठी आणि मजबूत असतात. ती जोडीजोडीने आलेली असतात. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात ती नोव्हेंबर ते जानेवारी या काळात गळतात, तर दमट हवामानाच्या प्रदेशात ती मार्चपर्यंत टिकतात. हा वृक्ष खूप देखणा असतो. तो वृक्षराजच म्हणायला हवा.
उत्तम प्रतीच्या लाकडासाठी सागवान प्रसिद्ध आहे.

त्यामुळे तो तोडण्यासाठी खूप बंधने असतात. त्याच्या झाडाच्या पानांचा रंगद्रव्य म्हणून उपयोग होतो. सागाच्या लाकडात ‘रेझिन’ नावाचे रासायनिक द्रव्य असते. त्यामुळे कीटक आणि वाळवी यांचा उपद्रव या लाकडाला होत नाही. ते खूप वर्षे टिकते. घरातील दारा-खिडक्यांसाठी आणि फर्निचरसाठी पहिली पसंती सागवानच्या लाकडाची असते.

गुलमोहराचे झाड मूळचे मादागास्करमधले. अनेक वर्षांपूर्वी मॉरिशसमधून ते भारतात आणले गेले. या झाडाचा आकार, विस्तार आणि सुंदर फुलांचा संभार अत्यंत आकर्षक. वातावरणनिर्मिती करणारा म्हणून रस्त्यावर दुतर्फा त्यांची लागवड करतात. उष्ण कटिबंधात त्याची वाढ चांगली होते. त्याच्या फांद्या नाजूक असतात. त्या चटकन मोडून पडतात. उन्हाळ्यात एप्रिलपासून गुलमोहर उमलू लागतो. अगोदर त्याला अल्प प्रमाणात फुले येतात. मागाहून हळूहळू संपूर्ण झाडच फुलांनी डवरून जाते. केशरी, लाल भडक आणि तपकिरी या रंगांनी ते खुलून दिसते. फुलाच्या चार पाकळ्या केशरी-लाल रंगाच्या असतात, तर पाचवी पाकळी जरा मोठी असते. तिच्यावर पांढर्‍या आणि पिवळ्या रंगाच्या अनेक छटा असतात. शिवाय लाल रंगाचे ठिपके असतात. रेषा असतात. त्याच्या शेंगा चांगल्या लांब-रूंद असतात. आधी त्या हिरव्या असतात. हळूहळू त्या टणक होत जातात. त्या कित्येक महिने झाडांवर राहतात. पानगळ झाल्यावर त्या उठून दिसतात. हे झाड मुख्यत: शोभेसाठी लावले जाते. त्याचे लाकूड पांढरे आणि मृदू असते. त्याला छान पॉलिश होऊ शकते. म्हणून त्याचे अलंकार बनवितात. खाद्यपदार्थांना सुवास यावा म्हणून त्याची फुले आणि कळ्या वापरतात. कविजनांचा हा लाडका वृक्ष आहे. कितीतरी उदाहरणे यासंदर्भात देता येतील.