भारताकडून प्रथमच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात

0
6

>> फिलिपाईन्स देशाकडे पहिली तुकडी सुपूर्द; 3130 कोटी रुपयांत झाला करार

भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी काल फिलिपाईन्सला सुपूर्द केली. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र मिळवणारा फिलिपाईन्स हा पहिला देश आहे. भारताने जानेवारी 2022 मध्ये फिलिपाईन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी 375 दशलक्ष (3130 कोटी रुपये) च्या करारावर स्वाक्षरी केली होती.
भारतीय वायुसेनेने सी-17 ग्लोब मास्टर विमानाद्वारे ही क्षेपणास्त्रे फिलिपाइन्स मरीन कॉर्प्सकडे सुपूर्द केली. या क्षेपणास्त्रांचा वेग 2.8 मॅक आणि पल्ला 290 किलोमीटर एवढा आहे. फिलिपाईन्सला सोपवण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 पट जास्त आहे.

दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत असताना फिलिपाईन्सला क्षेपणास्त्र प्रणालीची डिलिव्हरी मिळाली आहे. चीनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी फिलिपाईन्स 3 ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली तटीय भागात (दक्षिण चीन समुद्र) तैनात करणार आहे. ब्राह्मोसच्या प्रत्येक प्रणालीमध्ये दोन क्षेपणास्त्र प्रक्षेपक, एक रडार आणि कमांड आणि कंट्रोल सेंटर आहे. याद्वारे पाणबुडी, जहाज, विमानातून 10 सेकंदात दोन ब्राह्मोस क्षेपणास्त्रे शत्रूवर डागली जाऊ शकतात. याशिवाय भारत फिलिपाईन्सला क्षेपणास्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही देणार आहे.

फिलिपाईन्सने ब्राह्मोस
क्षेपणास्त्रे का खरेदी केली?
अलीकडेच दक्षिण चीन समुद्रात फिलिपाईन्सची चीनसोबत अनेक चकमकी झाल्या आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांमुळे समुद्रात फिलिपाईन्सची ताकद वाढेल आणि समुद्रात चीनचा वाढता प्रभावही रोखला जाईल.

कराराचा भारताला फायदा
फिलिपाईन्ससोबतच्या या करारामुळे देशाला संरक्षण क्षेत्रात निर्यातदार बनवण्यात आणि आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यासाठी मदत होईल. या करारामुळे लष्करी उद्योगाचे मनोबलही उंचावेल आणि दक्षिण-पूर्व आशियातील एक विश्वासार्ह निर्यातदार म्हणूनही भारताकडे पाहिले जाईल. तसेच, या करारामुळे भारत-फिलिपाईन्स संबंध अधिक दृढ होतील आणि चीनला दोन्ही देशांमधील एकतेचा संदेश जाईल.