- गिरिजा मुरगोडी
ही मोनास्ट्री जिथे वसलेली आहे, तो परिसर खरोखर अतिरम्य आहे. प्रशस्त पात्र असलेली झुळझुळती नदी, घनगर्द हिरवाई, निळसर डोंगरांची पार्श्वभूमी, अनेकानेक बहरलेले नीलमोहर- जॅकरांडा… सगळंच अप्रतिम! तिथून पायच निघत नव्हता.
पुनाखाच्या नदीकाठच्या सुंदर रिसॉर्टमध्ये काही वेळ रेंगाळल्यानंतर तिथला पुनाखा झाँग पाहण्यासाठी बाहेर पडलो. हा भूतानमधील सर्वात प्राचीन दुसऱ्या क्रमांकाचा (सेकंड ओल्डेस्ट) पॅलेस आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेले हे स्थान फार सुंदर आहे. 17 व्या शतकातील ही अतिशय भव्य मोनास्ट्री. बुद्धा, सेकंड बुद्धा, फादर ऑफ भूतान अशा भव्य रेखीव मूर्ती. बाहेर मोकळी जागा. तिथे बौद्ध भिक्षू उत्सवाच्या वेळी नृत्य करतात असं सांगितलं. आजूबाजूला काही भिक्षूंची रोजची वर्दळ चाललेली होती.
प्रत्येक वेळी अशा ठिकाणांना भेट देताना सतत मनात येतं, संपूर्ण जगात दूरदूरपर्यंत बौद्ध धर्म, शिकवण या सगळ्याचा प्रसार आणि प्रचार इतक्या प्राचीनकाळी ज्या प्रमाणात साध्य केला गेला ते अतर्क्य असंच वास्तव. ती शिकवण आणि गौतम बुद्धांचं साक्षात्कारी व्यक्तिमत्त्व यांचा प्रभाव शेकडो वर्षांनंतरही उणावलेला नाहीच, उलट वृद्धिंगतच झाला आहे. त्या मूलतत्त्वांचा अधिक सखोल अभ्यास आपण करायला हवा, जाणकारांकडून अधिक समजून घ्यायला हवं, असंही अशा ठिकाणी तीव्रतेनं वाटतं. कारण आपण जे पाहतोय ते पूर्णपणे समजणं-उमजणं हे त्यामुळं शक्य होऊ शकेल.
ही मोनास्ट्री जिथे वसलेली आहे, तो परिसर खरोखर अतिरम्य आहे. प्रशस्त पात्र असलेली झुळझुळती नदी, घनगर्द हिरवाई, निळसर डोंगरांची पार्श्वभूमी, अनेकानेक बहरलेले नीलमोहर- जॅकरांडा… सगळंच अप्रतिम! वसंतऋतूच्या जादूने मूळचा सुंदर निसर्ग अधिकच मोहरलेला. तिथून पायच निघत नव्हता. बराच वेळ थांबलो. पण परतणे भाग होतेच!
संध्याकाळी हॉटेलजवळच्या बागेत सुषमाशी खूप गप्पा झाल्या. तिच्याकडे सांगण्यासारखे किती अनुभव आहेत… किती प्रवास… किती ठिकाणं… किती माणसं… किती प्रकारचे अनुभव… तिला या सर्वच गोष्टींची असणारी मनःपूर्वक आवड, रसिक आणि डोळसपणे सगळं अनुभवण्याची आस, ते सर्व लक्षात राहाणं… विशेष वाटलं! छान वाटलं ऐकताना.
सकाळी सगळं आवरल्यावर नदीवर गेले. प्रफुल्ल वाटलं. तो प्रवाह पाहताना मन उत्साहानं भरून गेलं. तीरावर किती सुंदर वेगवेगळ्या आकाराचे दगड होते. गोलाकार, लंबगोलाकार, चपटे, गुळगुळीत, तपकिरी, राखी, काळे असे विविधरंगी. त्यांवर काही रेखांची नक्षी असलेले… ते पाहत, कधी उचलून घेत प्रवाहाकडे गेले. मीनाही आली होती तिथे. पाणी बर्फासारखे थंडगार. पण पाय बुडवल्याशिवाय राहवेना. मग गेलो आत चालत चालत. पावलांना होणारा तो चैतन्यस्पर्श तनामनात आल्हादक संवेदनलहरी निर्माण करत होता. थोड्या वेळाने नीता, मधुरा, सुषमाही आल्या. फोटो काढणे झाले. रमत-गमत फिरणे झाले. तोपर्यंत निघण्याची वेळ झाली.
7 वा. स्वप्नवत पुनाखाचा निरोप घेऊन निघालो. आता पारोला जायचे होते. पण त्याआधी थिम्पूला जाऊन, पुढे आम्हाला ज्या ‘हा व्हॅली’ला जायचे होते त्यासाठी लागणारे परमिट घ्यायचे होते. साडेदहा-अकराच्या सुमारास थिम्पूला पोहोचलो. ऑफिसमध्ये अर्ज देऊन जरा इकडे-तिकडे फिरलो. आमच्या चालकाने फोन करून जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली होतीच. (येथे ऐनवेळी काही मिळत नाही. ऑर्डर दिल्यानंतर एक-दीड तासाने जेवण मिळते. कारण तयार काही नसते. ऑर्डरप्रमाणे बनते. त्यामुळे फोनवर आधी सांगितले होते.) ‘हा व्हॅली’साठीचा आवश्यक परवाना मिळाल्यानंतर जेवण करून पुढे मार्गस्थ झालो.
पारोला हॉटेलवर पोहोचताच तिथली मालकीण, तिच्या सहाय्यक भराभर पुढे झाल्या. भूतानमधल्या हॉटेल्सचं हे एक वैशिष्ट्य. इथे मॅनेजर, मालकीण, शेफ, वेट्रेस सगळ्या मुली/स्त्रियाच. अगदी गाडीच्या टपावरून बॅगा उतरवण्यापासून ते सगळं काही त्या अत्यंत कार्यक्षमतेनं पटापट करत असतात. नेहमी हसतमुख, स्वागतशील. महिलाशक्तीची सक्षमता कोणताही बोभाटा न करता कृतीत उतरत असलेली सर्वत्र आढळून येते. सर्व दुकानांमध्ये, रस्त्याच्या कामांवरसुद्धा महिलाच अधिक संख्येनं राबताना दिसतात. सिक्कीमलाही दुकानं, हॉटेल्स स्त्रियाच सांभाळताना दिसत होत्या. बहुतेक ठिकाणी वरच्या मजल्यावर खोल्या, खाली दर्शनी भागात दुकान, आतल्या बाजूला जेवणघर अशी साधारण रचना दिसली. अष्टावधानी, शांत, सक्षम, कार्यतत्पर असं स्त्रीरूप पाहताना मनात कौतुक दाटून येत होतं.
पारोला भूतानचे छोटेसे विमानतळ आहे. इथल्या पर्वतराजीमधून, डोंगर-कपारीतून एवढ्याशा रनवेवर विमान उतरवणं म्हणजे वैमानिकाच्या कौशल्याची कसोटीच! आम्हाला योगायोगानं एक विमान उतरताना पाहायला मिळालं. ते दृश्य पाहताना मनोमन वैमानिकाला सलामच केला!
नंतर एक मोनास्ट्री पाहिली. पुनाखाइतकी भव्य नव्हे, पण मोठी आहे. थोड्याच, पण उंच-उंच मोठ्या पायऱ्या चढून वर जावे लागते. पुनाखाची मोनास्ट्री सेकंड ओल्डेस्ट, पारोची थर्ड ओल्डेस्ट, तर सर्वात जुनी थिम्पूची.
तिथून परतल्यानंतर बाजारात भरपूर फिरलो. तिथली आठवण म्हणून कोणाकोणाला भेट देण्यासाठी म्हणून सर्वांनी काही छोट्या-छोट्या वस्तूंची खरेदी केली.
पारोहून 10 कि.मी. अंतरावर तकसांग मोनॅस्ट्री- टायगर्स नेस्ट- हे खूप उंचावर असलेले बौद्धांचे फार महत्त्वाचे असे श्रद्धास्थान आहे. ते पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी जायचे होते. 8 व्या शतकात बुद्धगुरू पद्मसंभव यांनी येथे तीन महिने तपस्या केली. त्यांना दिव्यदृष्टी लाभली असे म्हणतात. हे ठिकाण गुरू पद्मसंभवांना एका वाघाने दाखवले होते म्हणून हे टायगर्स नेस्ट. या मंदिरात वाघाची मूर्तीही आहे. भूतानचे रक्षण करणारे रेनपोचे धर्मगुरूंचे हे ध्यानधारणा करण्याचे स्थान. महायान बुद्धिजमचे पवित्र स्थळ. अनेक बौद्ध भिक्षू येथे राहून शिक्षण घेतात. इथला ट्रेक म्हणजे ‘वॉकर्स इन स्काय’ म्हटले जाते. मोक्षप्राप्तीसाठी आकाशातून चालत जाण्याचा हा मार्ग अशी श्रद्धा आहे. श्रद्धेने जाणारे अनेक लोक आहेतच, पण एक स्वप्नवत ट्रेक म्हणून चढणारेही खूप लोक आहेत.
सकाळी सर्वांनी ‘चला, आज ट्रेकिंगचा दिवस’ म्हणत आगेकूच केले. अत्युच्च ठिकाणी सरळ उंच कड्यावर बांधलेली ही वास्तू थक्क करणारीच! इतक्या प्राचीनकाळी, इतक्या दुर्गम ठिकाणी, इतक्या उंचीवर इतकी सुरेख मोनास्ट्री उभारली कशी याचं विलक्षण आश्चर्य वाटतं. नदीच्या काठावर डोंगराच्या कपारीमध्ये थोड्या-थोडक्या नव्हे, 10,240 फूट उंचीवर हे टायगर्स नेस्ट आहे. खडकाळ डोंगराळ पायवाटेवरून अवघड चढाईची वाट.
ताकसांग मोनास्ट्रीला जाताना थोड्या वरपर्यंत घोड्यावरून जाता येतं. पण पुढे चढत, चालत बरंच अंतर जायचं. त्यानंतर 600-700 पायऱ्या चढ-उतार केल्यानंतर त्या अपूर्व अशा ठिकाणी पोहोचता येतं. वरपर्यंत जाऊन परत यायला 5-6 तास लागतात. मी आणि काकू चढणार नाही हे ठरलेलंच होतं. पण नुसतं तासन्तास बसण्यापेक्षा थोडं जमेल तसं जाऊ असा विचार करून निघालो. चढता-चढता छान वाटायला लागलं. काठीचा आधार होता. काकूंनाही उत्साह वाटत होता. अर्धा-पाऊण तास चढल्यानंतर एके ठिकाणी त्या बसल्या. मी म्हटलं, थोडं पुढे जाऊन येते. चढत गेले आणि पुढे पुढे जावंसं वाटायला लागलं. साधारण आणखी तासभर चढल्यानंतर एक कोपरा आला जिथून खूप उंचावर का होईना, मोनास्ट्री दिसत होती. भोवतालचा निसर्ग तर अप्रतिम होताच. सर्वदूर हिरवाई, झरे, पक्षी, फुलं या सर्वांशी हितगुज करणारी रम्य शांतता… खूप छान वाटलं. खूपच… आणखी वर जावंसं वाटलं, पण पुढचा सगळा विचार करून रोखलं मनाला. पुढे चढण खूप चढी होत गेली होती. झेपलं नसतंच. उतरायला सुरुवात केली. उताराच्या अरुंद रस्त्यावरून अधूनमधून पाय घसरत होते. भीती वाटत होती. पुढे, मागे, आजूबाजूला कोणीही नव्हते. वाटलं, इथे धडपडले तर काही खरं नाही! धीर करून उतरले हळूहळू.
आमचा बाकीचा ग्रुप घोड्यावरून पुढे गेला होता. त्यांना परतायला बरेच तास लागणार होते. खाली आल्यावर मी आणि काकूंनी आजूबाजूला फेरफटका मारला. एका लांब-रुंद कट्ट्यावर काही ग्रामीण स्त्रिया छोट्या छोट्या वस्तू- की चेन्स, मूर्ती, पैंजण, ध्यानवेळी ध्वनिकंपित करता येणारे बाडल्स असे काही काही विक्रीसाठी घेऊन बसल्या होत्या. तिथे आम्ही दोघींनी छानशी खरेदी केली. फोटो काढले. गप्पा मारत बसलो. तोपर्यंत श्री. जोशी आणि श्री. संजय खाली येताना दिसले. घोडे जिथपर्यंत जातात तिथपर्यंत जाऊन ते उतरले होते. गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असताना श्री. जोशींनी एवढी मजल मारली होती हे विशेष होतं. आल्यानंतर ते म्हणाले, ‘आता इतके तास इथं अवघडत बसून काय राहायचं? चला, एखादी टॅक्सी बघू आणि हॉटेलवर जाऊ.’ ही छान कल्पना होती. थोडे खालच्या बाजूला उतरून गेलो. तिथे उभ्या असलेल्या टॅक्सींपैकी एक टॅक्सी मिळाली. हॉटेलवर येऊन जेवलो आणि वामकुक्षी घेतली. पाय दुखत होतेच. ही विश्रांती मिळाल्याने संध्याकाळपर्यंत छान बरं वाटलं.
संध्याकाळी साडेपाचनंतर बाकी सगळे परत आले. सगळे पूर्ण वरपर्यंत जाऊन आले होते. ग्रेट! वर पोहोचतानाचे, पोहोचल्यावरचे कल्पनातीत वाटणारे अनुभव ऐकले. फोटो पाहिले. फारच भारी!
सगळ्यांच्या पायांचे तुकडे पडले होते, पण मनं भरून, भारून, भारावून गेलेली होती. चेहऱ्यांवर आगळं समाधान होतं. काकूंनी सगळ्यांचं अभिनंदन केलं. जेवण झाल्यानंतर सुषमाने सगळ्यांना वेदनाशामक गोळ्या दिल्या आणि उद्या बरं वाटेल म्हणत सगळे शिलेदार निद्राधीन झाले!

