भक्तियोग, कर्मयोग व ज्ञानयोग

0
9

योगसाधना- 645, अंतरंगयोग- 231

 • डॉ. सीताकांत घाणेकर

भक्ती शास्त्रशुद्ध हवी. फक्त कर्मकांडात्मक स्वार्थी भक्ती उपयोगाची नाही. सूक्ष्म विचार केला तर थोडा स्वार्थ असणारच. त्यात वावगे असे काही नाही. पण भक्ती त्यासाठीच करायची नसते. त्यात प्रेमभाव अपेक्षित आहे. कारण देव भावाचा भुकेला आहे.

संपूर्ण विश्वात विविध समस्या आहेत. मुख्य म्हणजे त्या सर्व वाढतच आहेत- विविध क्षेत्रांत- वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, वैश्विक. त्याशिवाय नैसर्गिक संकटे व आरोग्याच्या अनेक व्यथा- प्रत्येक वयात. अशावेळी माणूस प्रयत्न करतो- प्रत्येकजण आपल्या परीने- स्वतःच्या शक्तीप्रमाणे. पण जेव्हा त्याला यश मिळत नाही तेव्हा तो भगवंताकडे वळतो. धार्मिक कर्मकांडात गुंततो. भक्ती करू लागतो.

हल्ली तर भक्तीला मोठा पूरच आलेला दिसतो. गावात पूर आला तर सगळीकडे पाणीच पाणी होते. पण ते पाणी आपल्या दैनंदिन वापरासाठी बिलकूल उपयोगाचे नसते- पिण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. कारण ते गढूळ आणि घाण असते. शुद्ध पाणीच आपण वापरू शकतो. भक्तीचेदेखील तसेच आहे. भक्ती शास्त्रशुद्ध हवी. फक्त कर्मकांडात्मक स्वार्थी भक्ती उपयोगाची नाही. सूक्ष्म विचार केला तर थोडा स्वार्थ असणारच. त्यात वावगे असे काही नाही. पण भक्ती त्यासाठीच करायची नसते. त्यात प्रेमभाव अपेक्षित आहे. कारण देव भावाचा भुकेला आहे. म्हणूनच शास्त्रकार कोटी करताना म्हणतात, ‘मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव!’
भक्ती करण्यापूर्वी भक्ताची व्याख्या बघायला हवी. विभक्त नाही तो भक्त. जाणकार, तत्त्ववेत्ते सांगतात की भक्त भगवंतापासून वेगळा असूच शकत नाही. म्हणून त्यांनी ‘भक्तियोग’ हा योगसाधनेचा एक साधा-सोपा मार्ग सांगितला आहे. हा मार्ग सामान्य व्यक्तीसाठीदेखील उपयोगी पडतो. पण भक्ती शास्त्रशुद्ध हवी.

भक्तियोगामध्ये पूजा, फुले, फळे, नैवेद्य यांचा समावेश आहे. तसेच मंत्र, स्तोत्रे, अष्टके, भजने, आरती या गोष्टीदेखील आहेत. पण ही फक्त कर्मकांडात्मक मोठ्या आवाजाने म्हटली जातात. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. बहुतेकवेळा हे समारोह मंदिरात, सार्वजनिक हॉलात अथवा स्वतःच्या राहत्या घरी होतात. आता इतरांना त्रास देऊन केलेली भक्ती किती उपयोगाची असेल हा संशोधनाचा विषय आहे. भजने, स्तोत्रे म्हणताना भावपूर्ण, कोमल आवाजात म्हणणे अपेक्षित आहे. त्यामुळे वातावरणदेखील प्रफुल्लित होते. ऐकताना आनंद मिळतो.
भक्तांची अनेक आदर्श व उत्कृष्ट उदाहरणे आहेत ः

 • हनुमान- राम ः हनुमानाने श्रीरामाचा सेवक बनून भक्ती केली. चित्रकार हनुमानाच्या हृदयात राम-सीता दाखवतात. केवढे भावपूर्ण चित्र असते ते!
 • राधा-कृष्ण ः ही एक भक्तीची उत्कृष्ट पायरी आहे- मधुराभक्ती. प्रियकर व प्रेयसी ही आत्मा व परमात्याच्या रूपात दाखवलेली प्रतीके.
 • मीरा-कृष्ण ः संत मीराबाईची भक्ती अप्रतिम होती. राणी असली तरी सामान्य भक्ताचे जीवन ती जगली. तिची श्रीकृष्णावर एवढी श्रद्धा होती की इतिहासकार लिहितात की विषाचादेखील तिच्यावर परिणाम झाला नाही.
 • अर्जुन-कृष्ण व सुदामा-कृष्ण ः कृष्ण त्यांना आपला सखा मानत असे. अर्जुनाने क्षत्रीय धर्म व सुदाम्याने ब्राह्मणधर्म पालन करून भक्ती केली.
 • संत जनाबाई, गोरा कुंभार, संत एकनाथ यांची भक्ती प्रेरणादायक आहे. भगवंताने जनाबाईचे दळण दळून दिले. गोरा कुंभाराच्या लहान मुलाला जिवंत केले. संत एकनाथाच्या घरी श्रीखंड्या बनून घरची सगळी कामे केली.
  गीतेचा बारावा अध्याय तर भगवंताने आपल्या प्रिय भक्तांच्या वर्णनाने सजवला आहे. ‘यो मद्भक्तः स मे प्रियः।’ नारदमहर्षी तर विष्णूचे भक्तच होते. दिवसरात्र ‘नारायण-नारायण’ मंत्राचा जप करणारे. भक्तांच्या अनेक कथा आहेत. काही बालपणी ऐकल्या. आजी-आईकडून, गुरुजींकडून, कीर्तनकारांकडून… तर काही वाचलेल्या. एक गोष्ट आठवते. एका गावात एक गरीब म्हातारी राहत होती. नित्यनियमाने ती अनेक वर्षे गावातील मंदिरात जात असे. ती मंदिरे होती हनुमान व रामाची. आधी झाडलोट करून संपूर्ण मंदिर साफ करायची व नंतर तिथले दिवे, समया धुवून-पुसून ठेवायची. तसेच काम झाल्यावर ती दोन्ही देवाकडे मागणी करायची. हनुमानाला म्हणायची- ‘हे मारुतीराया, तू आहेस म्हणून रामराया आहे. तेव्हा असाच त्याच्याबरोबर राहा रे बाबा.’ श्रीरामाला म्हणायची- ‘रामराया, तू आहेस म्हणून सर्व विश्व चाललंय बघ.’
  गावात काही खोडकर मुले होती. ती आजीबाईची मस्करी करायची. ‘आजी, राम जगाची काळजी घेतो मग मारुती रामाची काळजी घेतो- हे कसे?’ असे हे काही काळ चालायचे. आजीबाई फक्त भावपूर्ण हसायची. एक दिवस तिने त्यांना सांगितले की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ती गोष्ट अशी-
  एक दिवस नारद श्रीरामाकडे गेलेले. तेव्हा ते एक मोठी वही बघत होते. नारदांनी याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘या वहीत माझ्या सर्व भक्तांची नावे आहेत.’ नारदाने वही घेतली व नावे वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यांना आढळले की त्या वहीत त्यांचे नाव आहे पण हनुमानाचे नाही. त्यांना आश्चर्य वाटले. नारदाचा कळ लावण्याशी संबंध. त्यामुळे ते हनुमानाकडे गेले व त्याला त्याबद्दल सांगितले- ‘तुझे नाव रामभक्तांच्या यादीत नाही. तू माझ्याबरोबर चल. मी श्रीरामाला विचारतो.’

खरे म्हणजे हनुमानाला त्याची गरज वाटली नाही. पण महर्षींच्या आग्रहाखातर तो रामाकडे गेला. नारदाने रामाला त्याबद्दल विचारले तेव्हा राम हसून म्हणाले, ‘माझ्याकडे दोन वह्या आहेत. एक मोठी- जे भक्त माझे नाव घेतात त्यांची नावे त्यात आहेत. म्हणून तुझे नाव त्या वहीत आहे. दुसरी छोटी- ज्या भक्तांचे नाव मी घेतो त्यांची नावे त्या वहीत आहेत. हनुमानाचे नाव त्या वहीत आहे.’ अहो भाग्य हनुमानाचे!

हे ऐकून हनुमानाला अत्यानंद झाला. पण नारद खजील झाले. आजीबाई म्हणाल्या, ‘चांगली कामे- परोपकाराची, सेवेची केली तर ती व्यक्ती चांगली भक्त होते. देवाला ती आवडते. कारण जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला!’
त्या मुलांवर या कथेचा विलक्षण परिणाम झाला. त्यांनी आजीला वचन दिले- आता आम्हीदेखील तुझ्यासारखे चांगले काम करू. जनतेची व देवाची सेवा करू. वचन देऊन मुले थांबली नाहीत, ती लगेच कमाला लागली.

 • आजीला मंदिर सफाईच्या कामात मदत करू लागली.
 • गाव साफसफाईच्या कार्यात वाटेकरी झाली.
 • गावातील जलप्रकल्पात सहभागी झाली.
  सारांश ः गावातील सर्व समाजोपयोगी प्रकल्पांत ती भाग घेऊ लागली. रामाच्या सेतू उभारणीत आपला खारीचा वाटा आनंदाने व उमेदीने उचलू लागली. त्यांची कार्यशक्ती कार्याला लागली.
  हाच तो कर्मयोग. कर्म करताना देवाकडे योग साधायचा. जनसेवा हीच ईश्वरसेवा. तथाकथित अशिक्षित आजीबाईंनी पण स्वतःच्या उदाहरणाने व कथेच्या रूपाने तरुण मुलांना उत्कृष्ट ज्ञान दिले. हाच तो ज्ञानयोग.
  सारांश ः भक्तियोग, कर्मयोग व ज्ञानयोग यांचे हे आदर्श उदाहरण.
  पूर्वी गोष्ट कथा, कीर्तने, प्रवचने या रूपात असे. छान संस्कार व्हायचे. आजच्या मातापित्यांना, शिक्षकांना, आजी-आजोबांना वेळ व इच्छा आहे का तसे प्रबोधन करायची? निदान योगसाधक तरी नक्की करत असतील.