रहस्यकथा किंवा रहस्यपटांपेक्षाही थरारक आणि अतर्क्य अशा घटना दैनंदिन जीवनात अधूनमधून घडतात. सध्या देशात गाजणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाबाबतही असेच म्हणायला हवे. एखाद्या रहस्यपटाचे कथानक शोभावे अशा प्रकारचे हे हत्याकांड आहे. मनाविरुद्ध लग्न झाल्याच्या रागाने नवविवाहिता आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा मधुचंद्राच्या निमित्ताने दूर मेघालयात नेऊन काटा काढते काय आणि चोरीच्या उद्देशाने पतीची हत्या झाल्याचा बनाव रचते काय, सारेच थक्क करणारे आहे. आणि ही सोनम आहे अवघ्या चोवीस वर्षांची! मधुचंद्राला मेघालयात गेलेले जोडपे गायब झाल्याच्या वार्तेने संपूर्ण ईशान्येकडील राज्यांची झोप उडाली होती. ईशान्य भारतातील राज्ये असुरक्षित असल्याचे चित्र त्यातून अकारण निर्माण झाले होते. पोलिसांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन हनीमून’ मधून अखेर सत्याचा उलगडा झाला आणि हा संशय वेळीच मिटला हे बरे झाले. अन्यथा ईशान्य राज्यांच्या जनतेकडे आधीच संशयाने पाहण्याची जी वृत्ती सर्वत्र दिसते, तिला ह्या हत्येतून पाठबळ मिळाले असते. परंतु येथे मेघालय हे केवळ निमित्तमात्र ठरले आहे आणि हत्येचे सूत्रधार आणि प्रत्यक्ष हत्या करणारे भाडोत्री हल्लेखोर हे सगळेच ईशान्य राज्यांबाहेरचे असल्याचे स्पष्ट झाले असल्याने हा संशय आता तरी मिटावा. जे घडले ते खरोखरच देशाला बुचकळ्यात पाडणारे होते. विवाहानंतर मधुचंद्रासाठी मेघालयासारख्या शांत, सुंदर राज्यामध्ये गेलेले हे जोडपे बेपत्ता झाल्याच्या बातम्या आल्या, तेव्हा साहजिकच संपूर्ण देशासाठी हा मोठा धक्का होता. नंतर 2 जून रोजी दरीमध्ये पती राजा रघुवंशी ह्याचा मृतदेह आढळून आला तेव्हा तर पतीची हत्या झाली, पत्नीचे काय झाले असेल ह्या शंकेने संपूर्ण देश अस्वस्थ झाला होता. मग त्या दोघांचे सीसीटीव्ही फुटेज आढळले, तिचा शर्ट आढळून आला. त्यामुळे तिच्याप्रती सहानुभूती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी ह्या प्रकरणाचा तपास हाती घेतला तेव्हा त्यांनी आपले पोलिसी चातुर्य कामाला लावले आणि ह्या प्रकरणातील एकेक धागे जुळत गेले. मधुचंद्राला म्हणून हे जोडपे गेले होते, परंतु आपल्या सोशल मीडियावर सोनमने एकही फोटो टाकलेला नाही हे जेव्हा पोलिसांना आढळले तेव्हा त्यांना तिच्याविषयी संशय आला. त्यांनी तपासासाठी तब्बल एकशे वीस पोलिसांचा फौजफाटा कामाला लावला आणि मग एकामागून एक दुवे हाती लागत गेले. मृतदेह सापडला होता तेथून तब्बल दहा किलोमीटर अंतरावर ह्या तरुणीची आणखी तिघांशी बातचीत चालल्याचे समोर आले आणि तिच्यावरील संशयाला दुजोरा मिळाला. एका पर्यटक गाईडने ह्या सगळ्यांना एकत्र जाताना पाहिले होते, त्यानेही ती माहिती पोलिसांना दिली आणि त्यातून मग सोनमचा शोध सुरू झाला. इकडे पतीच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी गुवाहाटीमार्गे परतलेल्या सोनमने उत्तर प्रदेशात जाऊन आपल्याला बेशुद्धावस्थेत तेथे सोडले गेल्याचा बनाव जरी रचला तरी पोलिसांच्या खाक्यापुढे हे खोटे टिकणारे नव्हते. त्यामुळे शेवटी प्रियकराच्या मदतीने आणि वीस लाखांना भाडोत्री हल्लेखोरांशी सौदा करून आपल्या पतीची हत्या ह्या महिलेनेच घडवून आणल्याचा उलगडा झाला आणि पोलिसांनी एकापाठोपाठ एकाच्या मुसक्या आवळल्या. ज्या वेगाने आणि शिताफीने हे तपासकाम झाले त्याबद्दल सर्व संबंधितांचे खरोखरच कौतुक व्हायला हवे. कोणताही धागादोरा नसताना अक्षरशः सुतावरून स्वर्ग गाठावा तशा प्रकारे ह्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांपर्यंत पोलीस येऊन पोहोचले आहेत. आता प्रश्न एवढाच उरतो की ह्या युवतीने एका निष्पाप युवकाच्या आयुष्याची माती करण्याचे कारण काय? घरच्यांनी केवळ आपल्या समाजातील तरुणाशीच लग्न करण्याचा आग्रह धरल्याने नाईलाजास्तव हिने राजा रघुवंशीशी लग्न केले. तत्पूर्वी आपल्या आईला तुम्ही जबरदस्तीने आपले लग्न लावून दिलेत, तर नंतर जे काही होईल त्याची जबाबदारी आपल्यावर नसेल अशी धमकीही दिली होती असे आता उघड झाले आहे. तरीही जोरजबरदस्तीने हा विवाह झाला. परंतु मधुचंद्राआधीच आपल्या पतीचा काटा काढण्याचा बेत आखून ह्या ‘बेवफा सोनम’ने जे केले ते थरकाप उडवणारे आहे. मेघालयसारख्या दूरस्थ, निर्जन ठिकाणाची निवड काय, प्रियकराने स्वतः तेथे न जाता मागे राहून सोनमच्या संपर्कात राहून सर्व नियोजन करणे काय आणि भाडोत्री हल्लेखोरांनी राजा रघुवंशीचा काटा काढणे काय, आधी म्हटल्याप्रमाणे हे सारे एखाद्या रहस्यपटाच्या कथानकाहून कमी नाही. अखेर सत्य समोर आले आहे. कदाचित पुढील काळात ह्यावर एखादा चित्रपट पण निघेल. पण देश हादरवून सोडणाऱ्या ह्या घटनेमध्ये एका निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. पुढील प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेत त्याला खरोखर न्याय मिळेल काय?