बेकायदा भराव, वृक्षतोड प्रकरण लोबो दाम्पत्य अडचणीत; गुन्हा नोंद

0
34

>> नगरनियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांची माहिती; बांधकाम केल्याचेही उघड

पर्रा येथे बेकायदेशीररित्या डोंगर व झाडे कापणे, तसेच सखल भागात मातीचा भराव टाकून जमीन बुजवल्या प्रकरणी व बांधकाम केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते तथा आमदार मायकल लोबो यांच्यासह त्यांची पत्नी आमदार डिलायला लोबो यांच्याविरुद्ध नगरनियोजनकडून म्हापसा पोलिसांत एफआयआर दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती नगर-नियोजन खात्याचे मंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल सांगितले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले मायकल लोबो हे आता सरकारच्या रडारवर आले आहेत. कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लोबो यांनी भाजपवर सातत्याने टीका चालवली होती, तेव्हाच ते भाजपच्या रडारवर आले होते. पत्नी डिलायला लोबो यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर लोबो दाम्पत्य विधानसभा निवडणुकीत विजयी देखील झाले होते. मात्र आता बेकायदा भराव व वृक्षतोडीच्या प्रकरणावरून लोबो दाम्पत्य अडचणीत सापडले असून, त्यांच्या पाठीमागे आता पोलीसी ससेमिरा लागला आहे.

लोबो दाम्पत्याविरुद्ध नगर आणि नियोजन कायदा १९७४ च्या कलम १७ अ आणि १७ ब खाली गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेस पक्षाची गोव्यासाठीची दृष्टी ही विनाशकारी असून, ती कधीही सत्यात उतरवू दिली जाणार नसल्याचे राणे यांनी काल स्पष्ट केले. राणे यांनी ट्विटद्वारे हा इशारा दिलेला असून, लोबो दाम्पत्याने झाडे कापलेल्या व भराव टाकलेल्या जमिनीची छायाचित्रेही राणे यांनी ट्विटरवर अपलोड केली आहेत.

राणे यांनी ट्विट केलेल्या छायाचित्रांमध्ये सदर जागेवरील झाडे कापून मातीचा भराव टाकल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे व अन्य बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने म्हापसा पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनंतर लोबो दाम्पत्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. दरम्यान, अशाच प्रकारची आणखी एक बेकायदा कृती ही पर्रा येथील सर्वे क्रमांक ९२ मध्ये करण्यात आलेली आहे. ही जागा तब्बल ९० हजार चौ. मी. एवढी आहे. एका बड्या व्यक्तीने ती खरेदी केलेली असून, या जमिनीचे निवासी भूखंडात रुपांतर करण्यासाठी ती ओडीपीखाली आणण्यात आली आहे. हे प्रकरण फेरआढाव्यासाठी समितीकडे पाठवण्यात येणार असल्याचे काल राणे यांनी नमूद केले.

‘त्या’ बांधकामाशी आपला काहीही संबंध नाही : लोबो
उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने पर्रा गावातील सर्वे क्रमांक ९ व १० मधील बांधकाम प्रकरणी जी तक्रार दाखल केली आहे, त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी काल केला. ज्या ठिकाणी आपण बांधकाम करीत आहे, त्या बांधकामासाठी आपण सर्व परवाने मिळवलेले आहेत, असा खुलासा देखील लोबो यांनी केला. आपण विरोधी पक्षनेता असल्याने व सरकारविरोधात आवाज उठवत असल्याने आपल्यावर दबाव आणण्यासाठी गुन्हा नोंद केला असल्याचे लोबो यांनी नमूद केले.

विश्‍वजीत राणे यांच्याशी आपले वैयक्तिक शत्रुत्व नाही, तसेच कॉंग्रेसने त्यांना लक्ष्य केलेले नाही, असे नमूद करतानाच भीतीचे वातावरण निर्माण करून आपल्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही लोबोंनी केला.