बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) जागावाटप निश्चित केला आहे. त्यानुसार भाजप आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार उतरवणार आहेत. तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 29 जागा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाला आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत.
भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी सांगितले की, रालोआतील सर्व घटकांनी परस्पर सहमती आणि मैत्रीपूर्ण वातावरणात जागांचे वितरण पूर्ण केले आहे. रालोआच्या नेत्यांनी बिहारमधील आगामी निवडणुकीसाठी ही वाटणी परस्पर विश्वास आणि सन्मानाच्या वातावरणात करण्यात आली. तावडे यांनी स्पष्ट केले की, आम्ही एकत्रितपणे निवडणुकीत उतरून विकासाचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवू.
दोन टप्प्यात मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, बिहारमध्ये 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होणार असून यावेळी 121 जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 11 नोव्हेंबरला होणार असून या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांवर होणार आहे. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.

