शिक्षण खात्यात सध्या सावळागोंधळ, बजबजपुरी सुरू असून, त्यामुळे त्याचा विद्यादानावरही आता गंभीर परिणाम होऊ लागला असल्याचा आरोप गोवा शाळा व्यवस्थापन संघटनेने काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यातच आता शिक्षण खाते बालरथासारखी एक चांगली योजना बंद करून राज्यातील विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापनांना संकटात टाकू पाहत आहे, असा आरोपही संघटनेच्या कृती समितीचे सदस्य पांडुरंग नाडकर्णी, सुहास सरदेसाई, मंगेश मंत्रवादी व प्रशांत नाईक यांनी केला.
यासंबंधी बोलताना निराकार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रशांत नाईक हे म्हणाले की, बालरथ योजना ही शिक्षण खात्याने स्वत: पुढाकार घेऊन 2007-08 साली सुरू केली होती. 2013 सालापासून ही योजना अन्य सर्व अनुदान प्राप्त विद्यालयांसाठी सुरू केली गेली. तसेच सरकारी माध्यमिक विद्यालयांसाठी कदंब बसेसची व्यवस्था करण्यात आली. आता सरकारला बालरथ योजनेमुळे सरकारी प्राथमिक विद्यालयांतील पटसंख्या कमी होऊ लागली असल्याचा शोध लागला आहे. त्यामुळे सरकार बालरथ योजनाच आता मोडीत काढण्याचा विचार करीत असून, जर तसे झाले तर वाहतुकीच्या अभावी राज्यभरातील विद्यार्थ्यांचे व विशेष करून ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होणार असल्याचे नाईक म्हणाले.