बार्देशचे तत्कालीन मामलेदार राहुल देसाई यांना अखेर अटक

0
6

>> जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई

जमीन घोटाळा प्रकरणी तपास करणार्‍या गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूण येथील जमीन हडपल्या प्रकरणी बार्देशचे तत्कालीन मामलेदार राहुल देसाई यांना काल अटक केली. राज्यात गाजत असलेल्या जमीन घोटाळा प्रकरणी राजपत्रित सरकारी अधिकार्‍याला झालेली ही पहिलीच अटक आहे. यापूर्वी पुरातत्त्व खात्यातील दोन कर्मचारी आणि बार्देश मामलेदार कार्यालयातील वाहनचालक योगेश वझरकर याला अटक झाली होती. एसआयटीने या प्रकरणी आत्तापर्यंत १८ जणांना अटक केली आहे.

बार्देशचे तत्कालीन मामलेदार राहुल देसाई यांच्यावर गुन्हा नोंद होऊनही ते कित्येक दिवस आपल्या पदावर कायम होते. एसआयटीने देसाई यांच्याविरुद्ध या प्रकरणी दोन गुन्हे नोंदविले आहेत. एसआयटीने रॉयसन रॉड्रीगीस, राजकुमार मेथी, सेंड्रीक फर्नांडिस यांना अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणात सरकारी अधिकार्‍यांकडून मदत मिळत असल्याचे उघड झाल्यानंतर राहुल देसाई यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. एसआयटीने गुन्हा दाखल केल्यानंतरही राहुल देसाई हे कित्येक दिवस बार्देश मामलेदार कार्यालयात कार्यरत होते. त्यानंतर त्यांची पर्वरी येथील सचिवालयात बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांची मुरगाव येथे मामलेदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता एसआयटीने त्यांना अटक केली आहे.