बायणा येथे तरुणाचा भररस्त्यात खून

0
7

>> चौघांपैकी दोघांना बाणस्तारीतून अटक

वास्को बायणा समुद्रकिनारी सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेऊन येताना उमेश हरिजन (३४) यांच्यावर चारजणांच्या गटाने चाकूने हल्ला करून त्यांचा खून केला. उमेश यांच्यावर हल्ला केल्यानंतर चौघांनीही हत्यारे तिथेच टाकून घटनास्थळावरून पळ काढला. नंतर उमेश यांना दाबोळी चिखली इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता तिथे त्यांना मृत घोषित केले. मुरगाव पोलिसांबरोबर वास्को, वेर्णा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पुढील कारवाईला सुरुवात केली. उमेश यांचा खून करणार्‍या चौघांपैकी दोघांना बाणस्तारी येथे फोंडा पोलिसांनी पकडून मुरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.

बायणा येथील बर्फाच्या फॅक्टरीजवळ सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेऊन येताना बायणा भागातील उमेश हरिजन यांना चारजणांच्या गटाने अडवून त्यांच्यावर सर्वप्रथम मागून धारदार शस्त्राने वार केले. नंतर त्यांच्या अंगावर चाकू व धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. उमेश यांच्या बंधूंनी उमेश यांना जखमी अवस्थेत चिखली इस्पितळात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मुरगावचे पोलीस निरीक्षक राघोबा कामत, वास्को पोलीस निरीक्षक कपिल नायक, वेर्णा पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्यासमवेत मुरगाव तालुक्याचे उपअधीक्षक राजेश कुमार घटनास्थळी दाखल झाले. मुरगाव पोलिसांनी खुनासाठी वापरलेले सर्व हत्यारे ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता आहे. उमेश यांचा मृतदेह मडगाव येथील हॉस्पिसीयो येथे शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे. खूनप्रकरणी पुढील तपास मुरगाव पोलीस तथा निरीक्षक राघोबा कामत करीत आहेत.

दोघांचा शोध सुरू
राज्यातील सर्व पोलीस स्थानकांत खून झाल्याची माहिती बिनतारी संदेशाद्वारे देण्यात आली. या प्रकरणातील इतर दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. खून करून पळालेल्यांतील दोघेजण फोंडामार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ओल्ड गोवा ते बाणस्तारी मार्गावर फोंडा पोलिसांनी त्यांना अटक केली व त्यांना मुरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.