बाप्पाचे आगमन पावसातच होण्याची चिन्हे

0
37

>> आजपासून पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज

राज्यात मंगळवार दि. ३० ऑगस्ट ते गुरुवार दि. १ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या गणरायाचे आगमन पावसातच होणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

बुधवार ते गुरुवार असे तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या तिन्ही दिवसांसाठी खात्याने पिवळा इशारा दिलेला असून, उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील काही भागांत या दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दिवसांत उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता असून, ४० किमी. एवढ्या वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे. या काळात मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशाराही खात्याने दिला आहे.

गेले काही दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने चतुर्थीच्या दिवसांतही पाऊस कोसळणार नाही, या आशेवर असलेल्या गोमंतकीयांमध्ये या वृत्ताने चिंतेचे वातावरण पसरले आहे.