बापरे! पुन्हा एकदा कोरोना…

0
20
  • डॉ. मनाली महेश पवार

‘कोविड- 19′, ‘कोरोना’ या कालरूपी राक्षसाच्या भीतीतून आत्ताच कुठे सावरतो ना सावरतो तोच ‘पुन्हा कोरोना… पुन्हा कोरोना…’ असे आवाज कानावर पडत आहेत. अमक्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढले, तमक्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढले म्हणता-म्हणता भारतातही कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. गोवा राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या दीडशेच्या जवळ पोचली.

कोविड- 19, कोरोना या कालरूपी राक्षसाच्या भीतीतून आत्ताच कुठे सावरतो ना सावरतो तोच ‘पुन्हा कोरोना… पुन्हा कोरोना…’ असे आवाज कानावर पडत आहेत. अमक्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढले, तमक्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढले म्हणता-म्हणता भारतातही कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. गोवा राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या दीडशेच्या जवळ पोचली. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’- त्यामुळे घाबरून जाऊ नका. मग व्हॅक्सिनेशनचं काय? सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतलीय, मग तरीही परत कोरोना? आयुर्वेदिक उपाय झाले, होमिओपॅथिक उपाय झाले, आधुनिक शास्त्राप्रमाणे उपाय झाले, व्हॅक्सिन झाले तरीही कोरोना आहेच… या विचारांनी सर्वसामान्य अगदी भयभीत झाला आहे. निसर्गाचा दोष, स्वतःचा दोष, का सरकारचा दोष? या विचारात अगदी गुरफटून गेला आहे.

मागील तीन वर्षे आपली कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली गेली. या काळात कोरोनामुळे तर अनेकांना प्राण गमवावे लागले. त्याचबरोबर अनेकांनी जवळच्या लोकांबरोबर नोकरी-पैसाही गमावला. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांवर तर उपासमारीची वेळ आली. तर अनेकांना नोकरी गेल्याने ताण-तणावाचा सामना करावा लागला. कित्येकांनी आपल्या जवळच्या माणसांचे अंत्यदर्शनही घेतले नाही. मुलांचे खेळणे-बागडणे मोबाईलमध्ये बंदिस्त झाले. अशी ही परिस्थिती काही महिन्यांपूर्वी सुधारताना दिसत होती. अज्ञानाचा अंधकार, मृत्यूची टांगती तलवार, अनारोग्याची भीती, माणसांचा दुरावा, ताण-तणाव इत्यादी हा अंधकार हळूहळू दूर झाला होता. आणि आपण तिमिराकडून प्रकाशाकडे जात होतो. अन्‌‍ आता परत कोरोना? कोरोनाचे किती व्हेरिएंट्स? कोरोना परत-परत बाळंत होत आहे. किती ही मुलेबाळे?
एखादा संसर्गजन्य रोग पसरला व तो इतका काळ टिकला असे पहिल्यांदाच घडले. इतिहासातसुद्धा असे कुठे नमूद नाही. एखादा संसर्गजन्य आजार किंवा महामारी ही दोन-तीन महिन्यांच्या वर टिकली म्हणजे संसर्ग आटोक्यात आला नाही असे कधी घडले नाही. याआधीही कोरोनासारख्या साथी जगाने अनुभवल्या, पण कोरोनाची ही साथ मात्र अधिक विश्वव्यापी ठरली. हा रोग इतका पसरला की जगाला टाळे लावून बंद करावे लागले. आजवरच्या ज्ञात इतिहासात ही अशी पहिलीच खेप आहे. अख्ख्या जगाला एका ठराविक जागेत स्थानबद्ध केले. आणि अशाच काहीशा चर्चा प्रसारमाध्यमांतून पुन्हा सुरू झाल्या तेव्हा सर्वसामान्य माणूस परत भ्रमात पडला आहे.

दरम्यानच्या काळात ओमिक्रॉननंतर कोरोना महामारीचा शेवट होईल अशी खात्री होताना दिसत होती. मात्र, जगावर असलेलं कोरोना महामारीचं संकट संपलेले नसल्याचे चित्र दिसत आहे. ज्या देशापासून कोरोनाची सुरुवात झाली होती, त्याच चीनपासून पुन्हा जगाला कोरोनाचा धोका आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारतातही चीनमध्ये सध्या पसरत असलेल्या बीएफ-7 व्हेरिएंटचे रुग्ण सापडले. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपले सरकार यावर तोडगा काढण्यासाठी किंवा जनजागृतीसाठी सज्ज होत आहे.

सध्या भारतात कोविडचे पेशंट वाढले आहेत. त्याचबरोबर एच3एन2 इनफ्लुएन्सचे पेशंटही वाढले आहेत. या आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि रुग्णांना उच्च ताप, खोकला आणि श्वासोच्छ्वासाची लक्षणे जाणवत आहेत. या व्हायरसची लक्षणेही कोरोना व्हायरससारखीच असतात. त्यामुळे स्थिती अजून काळजीची बनली आहे. ड्राय कफ साधारण दोन ते तीन आठवडे चालू राहतो. याची लक्षणे गंभीर आहेत, परंतु जीवघेणी नाहीत व या विषाणूने फुफ्फुसे इन्फेक्टेड होत नाहीत. तरीदेखील काहींना स्वास घेण्यात अडचण येते. या एच3एन2 विषाणूबाबत सविस्तर आपण पुढच्या लेखामध्ये पाहूच, पण कोरोना व एच3एन2 विषाणूंची लक्षणे सारखी असल्याने सर्दी-खोकला म्हणून घरी बसू नका. डॉक्टरांकडे जाऊन योग्य टेस्ट व औषधोपचाराला सुरुवात करा. मोठ्या आरोग्यतज्ज्ञांच्या मते तसेच कोविड जाणकारांच्या मते, भारताला कोविडपासून धोका नसल्याचे म्हटले जाते. तसेच भारतात जीनोम सिक्वेंसिंगही सुरू आहे, जेणेकरून कोविडचा नवा स्ट्रेन आला की नाही याची माहिती मिळेल. त्यामुळे कोविडचे प्रतिबंधक उपाय पूर्वी सांगितलेले आहेत, त्यांचे पुनः पालन करणे म्हणजे मनात कुठलीच शंका-भीती राहणार नाही.

मुखावरण (मास्क) ः मास्क घालून तोंड, नाक झाकण्याचे जुने दिवस परत आले आहेत. सर्वांनीच आजपासून मास्क घालायची परत सवय लावा. गर्दीच्या ठिकाणी तरी नक्की मास्कचा वापर करा.
सोशल डिस्टन्सिंग ः बीएफ-7 व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य आहे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तो खूप लवकर पसरतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी घाबरू नये, पण नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तुम्ही लग्नसमारंभ, इतर कार्यक्रम, सिनेमा हॉल, ऑडिटोरियमसारख्या ठिकाणी गेलात तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे. वृद्ध व आजारी नागरिकांनी तर विशेष काळजी घ्यावी.

होम आयसोलेसन ः रुग्णालयामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारांनी लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरातच राहण्यास सांगितले होते. तसेच आताही काही लक्षणे आढळल्यास स्वतःच होम आयसेलोशनमध्ये राहावे. तेव्हा ही पद्धत खूप प्रभावी ठरली होती.
टेस्ट आणि स्क्रिनिंग ः कोरोनाच्या प्रसाराचा विचार करता परदेशातून आलेल्या लोकांची कोरोना चाचणी महत्त्वाची आहे.
वर्क फ्रॉम होम ः कोरोनाच्या काळात घरून काम केल्यानं कॉर्पोरेट क्षेत्रासी निगडित तरुणांना मोठा आधार मिळाला होता. त्यामुळे लाखो लोकांनी कोरोनाच्या काळात घरातून काम करून आपलं कुटुंब चालवलं. जर देशात संसर्गाचा खतरा दिसत आहे तर पुन्हा एकदा कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू करावं.

लॉकडाऊन ः 2020 आणि 2021 मध्ये भारतानं कोरोनाच्या काळात जी परिस्थिती पाहिली ती आताची पिढी कधीच विसरू शकणार नाही. प्रदीर्घ लॉकडाऊनचा काळ आपण पाहिला आहे. त्याची पुनरावृत्ती व्हावी शी कोणाचीही इच्छा नाही. त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पाळण्यास सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून रुग्णसंख्या नियंत्रणात राहील.
व्हॅक्सीनचे काय?
देशातील बहुतेक लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पण बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. फक्त 27 ते 28 टक्के नागरिकांनीच बुस्टर डोस घेतले आहेत. लोकांनी बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे. कारण या व्हॅक्सीनमुळे शरीरात ॲन्टिबॉडिज तयार झाले खरे, पण ही व्हॅक्सीन सगळ्या व्हेरिएंटना सामोरे जाऊ शकत नाही. पण या व्हॅक्सिनमुळे जरी रुग्ण कोरोना बाधीत झाला तरी त्या रुग्णाच्या लक्षणांमध्ये वाढ होत नाही. म्हणजेच रुग्ण अत्यावस्थेत जात नाही म्हणून सरकार तिसरा डोस घेण्याची सक्ती करत आहे.

वरील प्रतिबंधक उपायाबरोबर प्रत्येकाने स्वतःवर काही नियम घातले पाहिजे. कोरोनानंतरचे मानसिक आरोग्य जपले पाहिजे. इथे रोग नव्हे रोगी बरा झाला पाहिजे. त्यासाठी केवळ शरीरावरचे उपचार पुरेसे नाहीत. मानसिक आरोग्यही सुधारले पाहिजे. चिंता, नैराश्य, उद्विग्नता, अशांती कमी झाली पाहिजे. आहार-आचार व त्याचबरोबर जर श्वसनसंस्थेसंबंधी काही लक्षणे दिसत असल्यास त्यावर ताबडतोब औषधोपचार करावे. घरातल्या घरात सारखे घरगुती उपाय करत बसू नये. वाफ घेणे म्हणा, काढा घेणे म्हणा इत्यादीला वेळ-काळाचे बंधन आहे. प्रमाणाचे (डोस) मापन आहे. शेवटी हे फक्त उपाय नसून औषध आहे व औषधाला मर्यादा असते. काढा, वाफ यासारखी औषधे सतत घेऊ नये. ती औषधाप्रमाणेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. आजही एवढी दोन वर्षे उलटून गेली तरीही वाफ घेत आहेत, काढे घेत आहेत, हात सेनिटाइज करत आहेत. शेवटी प्रत्येक औषधाला साईड इफेक्ट असतोच, मग ते आयुर्वेदिक का असेना.
म्हणूनच कोरोनाचे संकट जर परत येत असेल तर घाबरू नका. औषधोपचार करत बसू नका. व्यवस्थित खबरदारी मात्र घ्या. शत्रूची ओळख तर आता झालेलीच आहे. त्यामुळे ओळख असलेल्यांशी आपणाला भीती वाटत नाही. त्यामुळे वेळीच सावध होऊन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवावी. दूषित दोषांना संसोधनाद्वारे बाहेर काढावेत. आहाराचे योग्य नियोजन करून सेवन करावे. शरीर-मन सुदृढ राहण्यासाठी आपल्याला झेपेल एवढा व्यायाम करावा.

काही नियम प्रत्येकांनी घालून घेण्यासारखे आहेत ः

  • बऱ्याच आजारांचे मूळ हे चुकीचा आहार हेच असते. त्यामुळे अजीर्ण असता, भूक लागलेली नसता, अवेळी व निसत्त्व असा आहार सेवन करू नये. कारण अशाप्रकारच्या आहाराने व अशाप्रकारे सेवन केलेल्या आहाराने जठरांमध्ये ‘आम’ निर्मिती होते व हा ‘आम’ सर्व आजारांचे मूळ आहे. बऱ्याच वेळा ताप हा ‘आम’ उत्पत्तीतून होतो व आपण मात्र ताप असला तरी जेवण-खाणामध्ये काही बदलच करत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून चरचरीत भूक लागल्यावरच जेवावे.
  • या काळात थंड, फ्रीजमधील खाणं-पिणं, उदा. आईस्क्रीम, सॉफ्ट डिंक्स पूर्ण वर्ज्य करावेत. थंडीचा काळ आहे, जत्रांचा मौसम आहे, आईस्क्रीम खाणार, सर्दी-ताप होणार आणि येणार आणि येणार मात्र कोरोनावर. तेव्हा गरम-गरम हलका (पचायला हलका) असा आहार सेवन करा.
  • आता भाज्या भरपूर प्रमाणात पिकतात तेव्हा भाज्यांचा भरपूर वापर आहारामध्ये करा.
  • फळांचाही सिझन आहे, त्यात व्हिटॅमिन- सी युक्त फळे, जशी आवळा, मोसंबी, संत्री, लिंबू इत्यादी भरपूर प्रमाणात बाजारात येतात. त्या फळांचेही सेवन करा म्हणजे नंतर कोरोना वाढला तर व्हिटॅमिन-सी ची गोळी घ्यायला नको.
  • जडान्न (पचायला जड) खाऊ नये. अजीर्ण, मलावरोधाचा त्रास असल्यास रोज अविपत्तीकर, आरग्वध, त्रिफला इत्यादीसारखे रेचक औषध वैद्याच्या सल्ल्याने घ्यावे किंवा तज्ज्ञ वैद्याकडून विरेचन, बस्तीसारखे संशोधन उपक्रम करून घ्यावेत. आजच्या आधुनिक पद्धतीनुसार यालाच डिटॉक्झिफिकेशन म्हणतात.
  • किंवा घरच्या घरी जसे पूर्व दर रविवारी एरंडेल तेल प्यायला देत, तसेच आताही साधारण दर पंधरा दिवसांनी एरंटेल तेल घ्यायला हरकत नाही. आपल्या कोट्यानुसार साधारण 30 ते 50 मि.लि. एरंडेल तेल सकाळी 4 च्या सुमारास गरम पाण्याबरोबर घ्यावेत. चांगले चार-पाच वेळा जुलाब होतात व शरीरातील अतिरिक्त पित्त बाहेर पडते.
  • सर्दी सुकल्यासारखी वाटत असेल किंवा कफ घश्यात अडकल्यासारखा वाटत असल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून चांगले 2-3 ग्लास पाणी प्यावे. उलटी आल्यासारखी वाटत असल्यास उलटी करावी. कडू आंबट पित्त पडल्यावर बरे वाटते. किंवा तज्ज्ञ वैद्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने ‘वमन’ संशोधन करून घ्यावे. यानेही यूआरटीआय श्वसनसंस्थेचे डिटॉक्झिफिकेशन होते.
  • रक्यमोक्षण हेही या कोरोनाच्या काळात उपयुक्त असे शोधनकर्म आहे. चांगल्या तज्ज्ञ वैद्याकडून रक्तमोक्षण करून घ्यावे. रक्तमोक्षणाने कुठल्याही प्रकारचे दूषित रक्त- आजच्या भाषेत म्हणायचे झाले तर जंतुसंसर्ग रक्तातून बाहेर टाकला जातो म्हणजे रक्तशुद्धीकरण होते. त्यामुळे ज्यांना-ज्यांना कोरोना येण्याची भीती वाटते त्यांनी वमन, विरेचन, रक्तमोक्षणसारख्या पंचकर्म उपक्रमाद्वारे आपले शरीर शुद्ध करावे.
  • शरीरशुद्धीनंतर मस्त भूक वाढते. अशावेळी छान संतुलित आहार सेवन करावा. शक्यतो शाकाहाराला प्राधान्य द्यावे.
  • रसायन द्रव्यांचे सेवन करावे. उदा. दूध, तूप, शतावरी, अश्वगंधा, च्यवनप्राश, धात्री रसायन, सुवर्णसिद्ध जल इत्यादी. जेणेकरून मनुष्याची व्याधिप्रतिकारशक्ती अशी वाढेल की कोरोनासारख्या विषाणूला आत शरीरात प्रवेश करायला वावच मिळणार नाही.
  • आयुर्वेदशास्त्राप्रमाणे जंतुसंसर्ग दूर करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ घरात-बाहेर धूपन करावे. धूपन करण्यासाठी कडुनिंब, वेखंड, आंब्याची पाने, निर्गुंडी, लसूणाची सालपटं, कांद्याची सालपटं इत्यादींची गोवऱ्यावर टाकून धुरी करावी. यालाच आयुर्वेदशास्त्रामध्ये धूपन चिकित्सा म्हटले जाते. आपण बाळ-बाळंतिणीला धूपन करण्यासाठी जेवढा धूर करतो तेवढा घरात धूर करून वातावरण शुद्ध करावे.
  • सतत कोरोनाचे मॅसेजिस वाचू नयेत. सारख्या त्याच बातम्या ऐकू नयेत व पाहू नयेत. त्यापेा7 घरात एखादं सुमधुर संगीत लावावे. नामजपाचा घोष लावून ठेवावा किंवा ॐ गुंजन बारीक आवाजात लावून ठेवावे म्हणजे घरात एकप्रकारची सकारात्मकता निर्माण होते.
  • सूर्यनमस्कारासारखे व्यायाम प्रकार चालू ठेवावे व इतर योगसाधना चालू ठेवावी.
  • उगाचच सॅनिटायझरचा अतिरेक नको. त्यापेक्षा तीन-चार वेळा कोमट पाण्यानं आंघोळ करायला काहीच हरकत नाही. साबणाऐवजी उटण्याचा वापर करावा. सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणे असल्यास आपण स्वतः गर्दीपासून लांब राहावे. मास्कचा वापर करावा. स्वतःच्या स्वतः औषधोपचार घेऊ नयेत किंवा गुगल बाबा व्हॉट्सॲपवर पूर्ण विसंबून स्वतः डॉक्टर बनू नये.
  • मुख्य म्हणजे स्वतः घाबरू नये व इतरांनाही घाबरवू नये.
  • कोरोनाचे कितीही व्हेरिएंट्स आले तरी आपला आहार, आचार-विचार, दिनचर्या व ऋतूचर्याप्रमाणे असले तर कुठलाच व्हेरिएंट आपले काहीही करू शकत नाही.