बदलती जीवनशैली आणि योग

0
19

गेली दोन वर्षे कोरोनाने आपल्यावर राज्य गाजवले. सर्व जगाला सळो की पळो करून सोडले. म्हणूनच कोरोनासारख्या महामारीमुळे आरोग्य जपणे किती महत्त्वाचे आहे हे आपणा सर्वांच्या लक्षात आले आणि आपण आपल्या आहाराकडे, व्यायामाकडे विशेष लक्ष देऊ लागलो.

‘योगा’ हे एकमेव असे साधन तसेच माध्यम आहे जे आपणास सदैव शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करते. आजारांशी लढण्यास आपल्या शरीरात शक्ती निर्माण करते. हेच योगाचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो.

योगा केल्याने आपल्याला अनेक शारीरिक तसेच मानसिक फायदे प्राप्त होतात. यातून आपल्याला एक आरोग्यदायी आणि रोगमुक्त जीवन जगता येते. हेच योगाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याकरिता, समजावून सांगण्याकरिता आणि नियमित योगा करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी, योगा करण्याविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस साजरा करतो.
2015 साली 21 मे रोजी प्रथमतः आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये 27 सप्टेंबर रोजी एका सभेत हा दिवस साजरा करण्याविषयी सर्वप्रथम प्रस्ताव मांडला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, योग हा आपल्या प्राचीन परंपरेकडून प्राप्त झालेला अनमोल वारसा आहे. योग हा उत्तम आणि निरोगी आरोग्याचे प्रतीक आहे. योगा केल्याने आपण नेहमी निरोगी राहतो. आपले विचार, कृती, भावना यांच्यावरदेखील आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो. आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल घडवून, चेतना निर्माण करून, हवामानातील कुठल्याही बदलास आपण सहजपणे सामोरे जाऊ शकतो. नरेंद्र मोदी यांच्या या प्रस्तावास 2014 मध्येच 11 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्यांनी मान्यता दिली. त्यानंतर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

योगा करण्याचे फायदे
नियमित योगा केल्यामुळे आपणास शारीरिक, मानसिक आरोग्याचे पुढील फायदे प्राप्त होतात-
1) जर आपण नियमित योगा केली तर आपल्याला कुठलाही आजार जडत नाही. आपले शरीर सदैव निरोगी आणि तंदुरस्त राहते.
2) आपल्या शरीराची कुठल्याही आजाराशी लढा देण्याची क्षमता वाढते. म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
3) सकाळी सकाळी योगा केल्याने दिवसभर आपला मूड एकदम फ्रेश आणि प्रफुल्लित राहतो.
4) आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते ज्याने आपण कुठलेही काम अधिक कार्यक्षमपणे करू शकतो.
5) आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाणदेखील नियंत्रणात राहते, ज्याने आपल्याला डायबिटीससारखा आजारदेखील जडत नाही.
6) आपले वजनदेखील नियंत्रणात राहते. लठ्ठपणाची समस्या उद्भवत नाही.
7) नियमित योगा केल्याने आपण तणावमुक्त राहतो.
8) आपल्या शरीराला लवचिकता प्राप्त होते.
9) मन शांत राहते. आपल्या एकाग्रतेत वाढ होते.

योगाचे महत्त्व
आज कोरोनासारख्या अनेक महामारी आपल्या जीवणात प्रवेश करत आहेत आणि आपल्याला जर या महामारींपासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर आपण नियमित योगा करणे फार गरजेचे आहे.

कारण योगा केल्याने अशा आजारांशी लढण्यासाठी लागणारी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपणास कुठलाही आजार जडत नाही. आपण नेहमी रोगमुक्त राहतो.