बंडखोर आमदारांसह मुख्यमंत्री दिल्लीला

0
8

>> आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

>> गृहमंत्री शहा, भाजपाध्यक्ष नड्डा यांनाही भेटणार

कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नव्या राजकीय घडामोडीबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर आज सोमवारी दिल्लीत बैठक ठरली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार आपणाबरोबर दिल्लीकडे प्रयाण करतील, असे सावंत यांनी रविवारी पणजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीला हजेरी लावून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

यासंबंधी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आज दिल्लीत बैठक ठरली आहे. जर गृहमंत्री अमित शहा तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे जर दिल्लीत असतील तर त्यांचीही भेट घेतली जाणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.

पंतप्रधानांशी सोमवारी बैठक संपन्न झाल्यानंतर सगळे जण मंगळवारी गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले.

मंत्रिमंडळ फेरचनेविषयीसांगण्यास टाळाटाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सोमवारी होत असलेल्या बैठकीत गोवा मंत्रिमंडळाच्या फेरचनेविषयी चर्चा होणार आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता त्याविषयी काहीही सांगण्यास प्रमोद सावंत यांनी नकार दिला. मात्र, गेल्या गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यानी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबर बैठक घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विषयावर निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

मडगावचे आमदार दिगंबर कामत, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, नुवेंचे आमदार आलेक्स सिक्वेरा, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, सांताक्रुझचे आमदार रुदाल्फ फर्नांडिस, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक या आठ कॉंग्रेस आमदारांनी गेल्या बुधवारी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सकंल्प आमोणकरांचे
आरोप खोटे : चोडणकर

कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार संकल्प आमोणकर यांनी पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव तसेच पक्षाचे केंद्रीय नेते व राहुल गांधी यांच्यावर केलेले आरोप हे खोटे व बिनबुडाचे आहेत, असे काल कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले. आमोणकर यांनी राव तसेच के. सी. वेणुगोपाल यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे खोटे आहेत. हे ज्यावेळी त्यांनी हे आरोप केले त्या वेळच्या त्यांच्या देहबोलीवरूनच स्पष्ट होत असल्याचे चोडणकर म्हणाले. हे भ्रष्टाचाराचे आरोप जर खरे होते तर त्यांनी माझ्यावरही हे आरोप करायला हवे होते. कारण निवडणुका झाल्या तेव्हा प्रदेशाध्यक्ष मीच होतो, असे चोडणकर म्हणाले. आपणाला पक्षाने मोठी पदे दिली नाहीत हा त्यांचा आरोप खोटा असल्याचे सांगून पक्षाने त्यांना एनएसयुआयचा अध्यक्ष, गोवा प्रदेश युवा अध्यक्षपद, सरचिटणीस, गोवा प्रदेश उपाध्यक्षपद तसेच विधिमंडळ उपनेतेपदही दिले होते, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळे पक्षाचे पतन झाल्याचा आरोप करणारे आमोणकर हे विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारासाठी राहुल गांधी हे आमोणकर यांच्या मुरगाव मतदारसंघात आले होते व यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार केला होता हे विसरल्याचे चोडणकर म्हणाले.

भाजपने गोव्यातील कॉंग्रेसचे आठ आमदार फोडले असले तरी त्याचा राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

तिघांना मंत्रिपदे शक्य

या आठ फुटीर आमदारांपैकी माजी मुख्यमंत्री असलेले आमदार दिगंबर कामत, माजी मंत्री व माजी विरोधीपक्ष नेते असलेले मायकल लोबो व माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा या तिघाजणांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तसे झाल्यास सध्याच्या मंत्रिमंडळातील तिघा मंत्र्यांना डच्चू द्यावा लागणार आहे. फुटीर आमदारांपैकी कुणाची मंत्रिमंडळात वर्णी लावावी व त्यांना कोणती खाती द्यावीत तसेच सध्याच्या मंत्र्यांपैकी कुणाला मंत्रिमंडळातून वगळावे याबाबत आज दिल्लीत होणार असलेल्या बैठकीत चर्चा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

फुटीर आमदारांनी राजीनामा देत

>> आरजीचे पणजीतील निषेध सभेत आव्हान

आपल्या स्वार्थासाठी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांनी आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवावी व निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान रिव्होल्युशनरी गोवा पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी काल या आमदारांना दिले. काल आरजीने पणजीतील आझाद मैदानावर या कॉंग्रेस आमदारांचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना परब यांनी, कॉंग्रेस पक्षाचे आमदार हे ‘बिकाऊ’ आहेत हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसच्या काही उमेदवारांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले होते. आणि त्यावेळी संकल्प आमोणकरसह अन्य काहीजण या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले गेले होते. याची आठवणही परब यांनी यावेळी करून दिली.

सत्ताधारी भाजपला गोवा विक्रीवर काढायचा आहे. मोठमोठे प्रकल्प राज्यात आणण्याचे कटकारस्थान भाजप सरकारने रचले आहे. राज्यात गोल्फ कोर्सेस, रेस कोर्सेस, फिल्म सिटी आणून येथील लाखों चौ. मी. जमीन परप्रांतियांच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे. परप्रांतियांतील मोठमोठ्या बिल्डर्सनाही राज्यातील जमिनी उपलब्ध करून देण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचा आरोप परब यांनी यावेळी केला.

सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी, कॉंग्रेसचे आमदार हे आता पैशांसाठी एवढे आंधळे बनले आहेत की ते आता देवाजवळ जाऊन पक्षातून फुटणार नसल्याची शपथ घेतल्यानंतरही पक्षातून फुटून भाजपमध्ये जातात. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मतदारांपुढे रिव्होल्युशनरी गोवन्स हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला असल्याचे स्पष्ट केले.