>> हणजूण पोलिसांची कारवाई; एडविन नुनीसच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी; दोघांनी जामीन अर्ज घेतले मागे
सोनाली फोगट खून प्रकरणामुळे हणजूण येथील कर्लीस शॅक सध्या चर्चेत असून, काल हणजूण पोलिसांनी हा शॅक सील केला. याच कर्लीस शॅकमध्ये गुन्हा घडल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. हा शॅक सील करावा, याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील आदेश दिला होता. तसेच या शॅकचा परवाना कायमचा रद्द करावा, यासाठी पोलिसांकडून संबंधित अधिकारिणीला पत्र लिहिण्याची शक्यता आहे.
सोनाली फोगट या मृत्यूपूर्वी कर्लीस शॅकमधील संगीतरजनीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी सुधीर सांगवान आणि सुखविंदर पाल सिंग या प्रकरणातील मुख्य संशयितांनी त्यांना घातक अमलीपदार्थ पाजले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. कर्लीस शॅकमध्ये हा गुन्हा घडल्याने पोलिसांनी कोणतेही पुरावे नष्ट होऊ नयेत, या हेतूने आता सदर शॅक सील केला आहे.
दुसर्या बाजूला कर्लीस शॅकचा मालक एडविन नुनीस याने उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर शुक्रवार दि. २ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
एडविन नुनीस याने न्यायालयात आपण कर्लीस शॅकचा मालक नसल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शॅकच्या मालकाला अटक होण्याची शक्यता असल्याने लिनेट नुनीस लोबो हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो तिने काल मागे घेतला. तसेच, ड्रग्स पेडलर रामदास मांद्रेकर यानेही जामीन अर्ज मागे घेतला आहे.
कर्लीस शॅकमध्ये सोनाली फोगट हिला घातक अमलीपदार्थ पाजल्याचे उघड झाल्याने हणजूण पोलिसांनी एडविन नुनीस याला अटक केली होती. या शॅकच्या प्रसाधनगृहातून घातक अमलीपदार्थ ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी अमलीपदार्थ कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, ड्रग्स पेडलर रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर या दोघांना अटक केली आहे.
गोवा पोलीस मंगळवारी
हरयाणात जाण्याची शक्यता
सोनाली फोगट खून प्रकरणाच्या तपासासाठी गोवा पोलिसांचे एक पथक मंगळवारी हरयाणाला रवाना होणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच, व्हिसेरा तपासणी अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून जलद गतीने मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गोवा पोलिसांकडून चंढीगडच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेशी चर्चा केली जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
गोवा पोलिसांच्या तपासकामावर
आपला पूर्ण विश्वास : मुख्यमंत्री
सोनाली फोगट खून प्रकरणी गोवा पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासकामावर आपला पूर्ण विश्वास असून, आत्तापर्यंतच्या पोलीस तपास कामाचा कृती अहवाल हरयाणाचे मुख्यमंत्री आणि हरयाणाच्या पोलीस महासंचालकांना दिला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. हे प्रकरण गरज भासल्यास हरयाणाच्या मुख्यमंत्र्याच्या मागणीनुसार सीबीआयकडे दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.