>> विराट, रोहित, शमी, वॉर्नरला स्थान नाही
फॉक्स क्रिकेटने एक भाकीत करताना २०२५सालच्या जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी एकादश संघ घोषित केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे फॉक्स क्रिकेटने घोषित केलेल्या या संघात भारताचा विद्यमान आक्रमक कर्णधार विराट कोहली तसेच टीम इंडियाचा विद्यमान विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा यांना स्थान देण्यात आलेले नाही आहे.
संघात भारताच्या तीन खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. त्यात पृथ्वी शॉ, जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे. सलामीवीर म्हणून त्यांनी पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल या भारताच्या दोघा उभरत्या खेळाडूंना प्राधान्य दिलेले आहे. २०१८मध्ये भारताला अंडर-१९ विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी या दोघांचा महत्त्वाचा वाटा होता. तिसर्या स्थानी त्यांनी भारताचा आक्रमक कर्णधार कोहलीला प्राधान्य न देता ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला संधी दिली आहे. चौथ्या स्थानी मार्नस लाबुछेनची निवड केली आहे. गेल्या मोसमात लाबुछेनने जबरदस्त फलंदाजी केली होती. त्यामुळे चौथ्या स्थानाच्या फलंदाजीसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. पाचव्या स्थानावर पाकिस्तानचा टी-२० व वनडे कर्णधार बाबर आझमची निवड केली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून इंग्लंडच्या बेन स्टोकचा समावेश करण्यात आलेला आहे. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला स्थान मिळाले आहे. संघात एकमेव भारतीय गोलंदाजाचा समावेश झाला आहे. तो गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह. त्याच प्रमाणे दक्षिण आफ्रिकन कगिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्स यांनाही द्रुतगती गोलंदाज म्हणून स्थान मिळालेले आहे. संघात एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून अफगाणिस्तानच्या राशीद खानला संधी दिली आहे.
फॉक्स क्रिकेट वाहिनीने निवडलेला २०२५चा विश्व एकादश कसोटी संघ ः
पृथ्वी शॉ, शुबमन गिल, स्टीव्ह स्मिथ, बाबर आजम, मार्नस लाबुछेन, बेन स्टोक्स, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा, पॅट कमिन्स आणि रशीद खान.