फुटीर आमदार अजूनही लटकलेलेच!

0
23
  • गुरुदास सावळ

दक्षिण गोव्यातील लोकसभा जागा जिंकण्यासाठी भाजप आपल्या धोरणात बदल करू शकतो. दिगंबर कामत यांच्यासारख्या मातब्बर, लोकप्रिय नेत्याच्या गळ्यात दक्षिण गोव्याच्या उमेदवारीची माळ पडली तर आश्वर्य वाटू नये. दिगंबर कामत यांना उमेदवारी मिळाली तर विजय निश्चित आहे, असे त्यांच्या समर्थकांना वाटते.

‘पुढच्यास ठेस मागचा शहाणा’ असे म्हटले जाते. मात्र, राजकारणी लोक सत्तेसाठी एवढे हपापलेले असतात की, तुमच्या – आमच्यासारख्या सामान्य लोकांना जे समजते – उमजते, ते या राजकारणी लोकांना कळत नाही असे म्हणावे लागते. सत्तेसाठी कॉंग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केलेल्या आठ आमदारांबाबत असे म्हणता येईल. उपमुख्यमंत्री, मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्षपद अशी विविध पदे भूषवायला मिळतील अशा मोठ्या अपेक्षेने भाजपात प्रवेश केलेल्या या आठ आमदारांना सध्या विजनवासात दिवस काढावे लागत आहेत.

भाजपात प्रवेश करून ते भाजपाचे आमदार बनलेले असले तरी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना भाजपा आमदार मानायला तयार नाहीत. ‘ना घरका ना घाट का’ अशी त्यांची विचित्र अवस्था झाली आहे. त्यात भर म्हणून काही पत्रकारमित्र बिनबुडाच्या अनेक बातम्या प्रसिद्ध करून या आमदारांची अवहेलना करून त्यांच्या वेदना वाढवतात.

कॉंग्रेस आमदारांनी पक्षांतरविरोधी कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर करायचे झाल्यास, किमान आठ आमदारांची गरज होती. एका आमदाराने ऐनवेळी माघार घेतल्याने पक्षांतराचा पहिला प्रयत्न फसला. त्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. दिगंबर कामत यांना उपमुख्यमंत्रिपद, मायकल लोबो यांना मंत्रिपद आणि आलेक्स सिक्वेरा यांनाही मंत्रिपद मिळेल, अशी हवा सर्वत्र पसरविण्यात आली होती. मंत्रिमंडळ बदलाच्या अनेक तारखा जाहीर झाल्या, पण प्रत्यक्षात काही घडलेच नाही. मोपा विमानतळ उद्घाटन सोहळा झाल्यावर मंत्रिमंडळ बदल होईल, असे आता सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ एकच बदल होईल असे भाजपाच्या वरिष्ठ गोटातून सांगण्यात येत आहे. खरे खोटे परमेश्वरालाच माहीत.

आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा आहे. काही पत्रकार आलेक्स सिक्वेरा वगळून भलत्याच आमदाराला मंत्रिपद मिळणार अशा बातम्या पिकवित आहेत. या प्रकारच्या बातम्यांमुळे आमदारांमधील गोंधळ वाढत आहे. एकाच आमदाराला मंत्रिपद मिळाल,े तर इतरही दोन आमदार नाराज होतील. मात्र, ते आपली नाराजी उघडपणे व्यक्त करू शकणार नाहीत. त्यांना तोंड बंद करून मुका मार खावा लागेल. भाजपात प्रवेश करून आपण फार मोठी चूक केली असे त्यांना वाटते आहे व ते साहजिकच आहे, पण आता नाराजी जाहीरपणे व्यक्त करुन श्रेष्ठींची आणखी नाराजी ओढवून घेण्याची चूक कोणी आमदार करणार नाही.

दिगंबर कामत व मायकल लोबो यांची परिस्थिती तर अधिकच बिकट झाली आहे. माजी मुख्यमंत्री असल्याने आपल्याला उपमुख्यमंत्रिपद नक्कीच मिळेल असे कामत यांना वाटले होते. त्यासाठीच त्यांनी पक्षांतराचा घाट घडवून आणला होता. मायकल लोबो यांचीही हीच अपेक्षा होती. लोबो यांना मंत्रिपद मिळालेले नसले, तरी त्यांच्या विरोधातील मोहीम बंद झाली आहे. पोलीस तसेच इतरत्रच्या तक्रारी आज ना उद्या मागे घेतल्या जातील हे नक्की आहे. त्यामुळे मंत्रिपद नसले, तरी या पक्षांतरामुळे लोबो यांचा बराच लाभ झाला आहे.

भाजपात प्रवेश केलेल्या इतर आमदारांची रिक्त असलेल्या महामंडळावर वर्णी लावण्याची योजना सरकारने तयार केली होती. महत्त्वाच्या अशा अनेक महामंडळांवर याआधीच भाजपा आमदारांची वर्णी लागली आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या आमदारांच्या पदरात किरकोळ महामंडळेच पडणार आहेत. कोणत्या आमदाराला कोणते महामंडळ द्यायचे याचा प्रस्ताव तयार करून श्रेष्ठींकडे पाठवून दिला गेला होता.हा प्रस्ताव पाठविल्यास आता महिनाभर उलटला, मात्र श्रेष्ठींनी त्याला अजून मान्यता दिलेली नाही.

मोपा विमानतळ उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येऊन गेल्यावर कदाचित महामंडळे व मंत्रिपदांचे वाटप यावर निर्णय घेतला जाईल असे वाटते. तीन नवे मंत्री घ्यायचे झाल्यास तीन मंत्र्यांना दुखवावे लागणार. तसे केल्यास समस्या अधिकच वाढेल याची कल्पना मुख्यमंत्री व भाजपा श्रेष्ठींना आहे. त्यामुळे एकाच मंत्र्यांचा बळी देऊन कमीत कमी नुकसान करण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने अपेक्षेपेक्षा मोठा विजय मिळविल्याने भाजपा नेत्यांचे मनोबल बरेच वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम गोवा तसेच इतर राज्यातील राजकारणावर नक्कीच पडणार. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या विजयाची अपेक्षा वाढली आहे. दक्षिण गोव्यातील लोकसभा जागा जिंकण्यासाठी भाजप आपल्या धोरणात बदल करू शकतो. दिगंबर कामत यांच्यासारख्या मातब्बर, लोकप्रिय नेत्याच्या गळ्यात दक्षिण गोव्याच्या उमेदवारीची माळ पडली तर आश्वर्य वाटू नये. दिगंबर कामत यांना उमेदवारी मिळाली तर विजय निश्चित आहे, असे त्यांच्या समर्थकांना वाटते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले आसन बळकट करण्याची बरीच धडपड केली आहे. बेकायदा बांधकामे व मादक पदार्थांच्या विरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. आता वाढत्या बेकारीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. सरकारी कर्मचारी भरती आयोगातर्फेच करण्याचा निर्धार केला आहे. या निर्णयांमुळे आपल्या कार्यकर्त्यांना खूष करता येणार नाही असे काही आमदारांना वाटते. म्हणून त्यांनी त्या धोरणाला विरोध केला होता. आरोग्य खात्यातील कर्मचारी भरती यापूर्वीच पूर्ण झाली आहे, त्यामुळे वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांना या निर्णयाची भीती वाटत नाही. त्यामुळे ते यावर बोलत नाहीत.
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज बनलेले आमदार भाजपाला लोकसभा निवडणुकीत दक्षिणेत अपशकून करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. मात्र, मुख्यमंत्री डॉ सावंत यांची सुधारणारी प्रतिमा व दिगंबर कामत यांच्यासारखा मातब्बर उमेदवार यामुळे दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय नक्की असल्याचे पक्ष समर्थकांना वाटते. दक्षिण गोव्यात कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, आर. जी., तसेच इतर उमेदवार भाजपा विरोधी मतांचे विभाजन करतील अशी त्यांना अपेक्षा आहे.

गोव्यातील कॉंग्रेसची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी मध्यप्रदेशात जाऊन कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत भाग घेतला. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाबरोबरची आपली मैत्री वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे जाणवते. कॉंग्रेसबरोबर युती केली नाही तर आपली डाळ शिजणार नाही हे त्यांनी ओळखले आहे. त्यामुळेच ही सलगी वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. मात्र, त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करावा असा कॉंग्रेसचा आग्रह राहील. विजय सरदेसाई हे एक चांगले नेते आहेत.त्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्ष लवकरच कॉंग्रेसमध्ये विलीन झालेला दिसू शकतो.