प्रिय सुदीक्षा

0
193
  • पौर्णिमा केरकर

सुदीक्षा, तू अशी अचानक जायला नको होतीस. तू हवी होतीस… अशा मुली आहेत ज्या खचून जातात मनाने बुद्धिमान असूनही… त्यांची प्रेरणा म्हणून तू हवी होतीस. देशाचा तू सन्मान होतीस सुदीक्षा… खूप अपेक्षा होत्या तुझ्याकडून…

प्रिय सुदीक्षा,
तुझ्याबद्दल मला लिहावेसे वाटले… का कुणास ठाऊक? तू तर माझ्या नात्याची नाहीस की नाहीस गोत्याची. तरीही तुझ्याविषयी, तुझ्याबद्दल कळले त्या रात्रीपासून मी अस्वस्थ आहे. माणसे आपापल्या कोशात जगत असतात. स्वतःच्या एका आखलेल्या चौकोनापलीकडेही आयुष्य असते हे जणू त्यांच्या खिजगणतीतही नसते. सुदीक्षा, अगदी कोवळ्या, हळव्या, संवेदनशील वयातच तू ही अशी चौकट मोडली होतीस. उत्तर प्रदेशमधील एका छोट्या गरीब खेडेगावच्या गौतमबुद्ध नगरात तुझं बालपण आणि वयाची अठरा वर्षे सरली. सहा भावंडांत तुझा नंबर तर सर्वात वरचा. त्यामुळे तू शिकून-सवरून पुढे गेलीस तर तुझा आदर्श बाकीची तुझी भावंडे गिरवणार होती. प्रतिभावंत कोठे जन्माला यावेत हे काही कोणी ठरवलेले नाही. पण आता मनात उगाच वाटते की तू गरीब कुटुंबात जन्माला आलीस. इतरांना मिळतात तशा सोयीसुविधा तुला मिळविण्यासाठी संघर्षच करावा लागलाय… तू तसा तो संघर्ष परिस्थितीला शरण न जाता करीत होतीस याबद्दल तुला शाबासकी द्यावी तितकी थोडीच!
बारावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेऊन तू अव्वल आलीस. दहावी-बारावीच्या परीक्षेत अलीकडे नव्वद आणि त्याहीपेक्षा जास्त टक्केवारी घेणारी मुले खूप आहेत. पण सुदीक्षा, तुझ्या डोळ्यात जी सर्जकतेची, प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाची चमक होती ती इतरांच्या डोळ्यांत क्वचितच दिसते. तुझे स्वप्न मोठे होते. तुझे घर… तुझी माणसे… तू ज्या परिसरात राहायचीस तो परिसर हे सगळं सगळं प्रत्यक्षात अनुभवणारी माणसे तुला म्हणालीही असतील की, हिची स्वप्ने ही दिवास्वप्नेच आहेत किंवा मग माणसांनी अंथरूण पाहून पाय पसरावे.

मात्र तू या सगळ्यांना पुरून उरली होतीस. तुला विशाल, अमर्याद जगाचा अभ्यास करायचा होता. तुला जग फिरायचे होते. तुझं स्वप्न तू सत्यातही उतरवलं होतंस. बारावी झाल्यानंतर तुला लगेचच अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पावणेचार कोटीची शिष्यवृत्ती मिळाली होती. तुला जेव्हा ही स्कॉलरशिप मिळाली तेव्हाच सर्वांचे लक्ष तुझ्याकडे वेधले. तू दाखविलेले अदम्य धाडस… पराकोटीची चिकाटी, जिद्द… परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचे तुझे साहस… मी कल्पनाही करू शकत नाही… अर्थातच तुझे पालक- पदरी पुरेसे शिक्षण नसतानाही तुला त्यांनी मोठी स्वप्ने पाहायला लावले… त्यांचे पूर्ण सहकार्य त्यासाठी तुला लाभले ही मोठी जमेची बाजू.

तूही त्याचे चीज केलेस. अवतीभवती सगळीकडे जेव्हा सर्वजण परिस्थितीला शरण जातात तेव्हा तू मात्र त्यावर मात करून पुढे गेलीस. सुदीक्षा कसं जमलं तुला हे…? तू तर प्रेरणादायी जीवन जगलीस… अगदी कमी वय… किती भरारी घेतली होतीस… कधीकधी मग मनात नसतानाही नियती… दैव… नशीब या शब्दांवर विश्वास ठेवावा की नको अशी संदिग्धता निर्माण होते. तुझ्याबाबतीत तर ही अशी चलबिचल मनात सातत्याने होत आहे. सुदीक्षा, तू अशी अचानक जायला नको होतीस. तू हवी होतीस… अशा मुली आहेत ज्या खचून जातात मनाने बुद्धिमान असूनही… त्यांची प्रेरणा म्हणून तू हवी होतीस. देशाचा तू सन्मान होतीस सुदीक्षा… खूप अपेक्षा होत्या तुझ्याकडून…

पण तू गेलीस… तुझ्याबरोबर तुझ्या पालकांची, तुझ्यावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचीच स्वप्ने अधुरी ठेवून तू गेलीस. मनाचा आकांत वाढत राहतो. अमेरिकेत बोब्सन कॉलेजमध्ये तुला चार वर्षं तुझं शिक्षण पूर्ण करता येणार होतं. लॉकडाऊनमुळे काही कालावधीसाठी तू घरी परतलीस… आता २० ऑगस्टला तू परत जाणार होतीस… पण तू तर आता न परतीच्या प्रवासाला निघून गेलीस… सुदीक्षा, तुझा अपघात झाला तेव्हा नेमकी परिस्थिती कशी होती? कसलाच अधिकृत परवाना नसताना, हेल्मेट न घालता गाडी तुझा भाऊ चालवीत होता असेही सांगितले जाते. पोलिस तर या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवून आहेत. घरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मामाच्या घरी तू गेली होतीस. एवढ्या लांबच्या प्रवासात तुझा भाऊ गाडी चालवताना त्याला कोणत्याच पोलिसांनी कसे बरे अडविले नाही?
तुझ्या मृत्यूला जबाबदार आणखी एक घटना समोर आली आहे आणि ती म्हणजे, काही गुंड प्रवृत्तीची तरुण मुलं बुलेटवरून तुझा पाठलाग करीत होती. ती तुमच्या गाडीच्या मागेपुढे होताना तुझ्या गाडीला अपघात झाला. तू मागच्या मागे कोसळलीस… आणि कायमचीच सोडून गेलीस…
या अशा घटना आपल्या देशात अजूनही घडत आहे… कालच देशाचा स्वतंत्रता दिवस आम्ही धुमधडाक्यात साजरा केला… सर्व दिशांनी आपला देश प्रगती करीत आहे… पण आपल्या देशातील महिला, मुली, तरुणी सुरक्षित, सन्माननीय जीवन जगू शकतात काय हाच प्रश्न आहे. निर्भया प्रकरणे संपली नाहीत तर ती कोठे कोठे नावातील, जागेतील बदल दर्शवून घडत असतात. ती कोणीही असली तरी चालेल, मात्र हैवनांना ती मादी हवीय. तिला आजही समुहाने मिळून अत्याचार करून धावत्या गाडीतून बाहेर फेकले जाते, ती घरी परतत असताना तिच्या गाडीसकट तिला जाळले जाते. कॉलेजच्या आवारात तिला सर्वांसमक्ष गोळ्या घातल्या जातात… तिच्यावर ऍसिड ओतून विद्रुप केले जाते… आणि आता तर स्टंट करून अपघात घडवून तिला संपवून टाकले जाते. सर्वसामान्य माणसे जन्माला येतात, मरूनही जातात… परंतु प्रतिभावंत जेव्हा असा अकाली निघून जातो तेव्हा ते अपरिमित सामाजिक नुकसान असते. सुदीक्षा, तू इतरांपेक्षा वेगळी होतीस. तुझ्या व्यक्तिमत्त्वात असं काय होतं कुणास ठाऊक? तुझ्या डोळ्यातील चमक खूप काही सांगू पाहणारी… आकाशभरारी घेऊ पाहणारी तुझी देहबोली… सगळं सगळं आता शांत झालेय… तू वाचन केलं होतंस… तुला अल्पवयात जग कळलं होतं. पुस्तके आपल्याला जगण्याचे भान देतात. त्यातून विश्वाचे ज्ञान प्राप्त होते. कसे जगावे… का जगावे? याचा विचार करता येतो. जन्म आणि मरण हा प्रवास तर प्रत्येकालाच करावा लागतो. पण ती ‘मुलगी’ आहे म्हणून तिच्या वाट्याला हे असे अघटित घडते… तेही एकविसाव्या शतकात… खूप क्लेशदायक… तेवढेच तिरस्करणीय. स्त्रिया, तरुणीकडे बघण्याची ही कुरूप नजर मुळापासून उखडून टाकली जाईल तोच मुक्तीचा दिवस असेल. सुदीक्षा, तुझं हे जग सोडून जाणं सहन होत नाही. आम्ही हतबल… अगतिक… असहाय्य आहोत. आमच्या पोरीबाळींना, लेकीसुनांना निर्भयतेने जगू देणारा समाज नाही निर्माण करू शकलो आम्ही. तू अनेक तरुणींची प्रेरणा हो… त्यांना तुझ्या जिद्दीचे पंख दे… परिस्थिती कितीही खडतर असो… आम्ही आमचे स्वतंत्र विश्व निर्माण करणार हा आत्मविश्वास दे!
सुदीक्षा, तू नाहीस आता आमच्यामध्ये… वेदना पचविण्याची शक्ती तुझ्या कुटुंबीयांना प्राप्त होवो… तुला न्याय मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!