प्रशासकीय समितीची नियुक्ती

0
198

गोवा डेअरीवर तीन सदस्यीय

सहकार निबंधकांनी कुर्टी येथील गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघावर (गोवा डेअरी) तीन सदस्यीय प्रशासकीय समितीची नियुक्ती काल केली असून या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी राय येथील सातेरी दूध व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष दुर्गेश मधुकर शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोवा डेअरीवर याआधी फोंड्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद खुटकर काम पाहत होते.
या संबंधीचा आदेश सहकार निबंधक विकास एस. एन. गावणेकर यांनी जारी केला आहे. सहकार निबंधकांनी गोवा डेअरीच्या सात संचालकांना अपात्र ठरविण्यात आल्यानंतर गोवा डेअरीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. गोवा डेअरीचे प्रशासक म्हणून फोंड्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद खुटकर काम पाहत होते.

सहकार निबंधकांनी नव्याने नियुक्त प्रशासकीय समितीच्या सदस्यपदी सीए यशवंत कामत (पणजी) आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (मुख्यालय) यांची नियुक्ती केली आहे. या समितीने त्वरित ताबा घ्यावा, अशी सूचना आदेशात करण्यात आली आहे.
गोवा डेअरीमधील कथित गैरव्यवहार प्रकरणामुळे संचालक मंडळातील आठ जणांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यानंतर गोवा डेअरीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. तथापि, प्रशासकाच्या काळात सुध्दा डेअरीचा कारभार योग्य प्रकारे चालत नसल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सहकार निबंधकांनी तीन सदस्यीय प्रशासकीय समितीची नियुक्ती केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.