प्रमुख विरोधी नेत्यांचे आयफोन हॅक करण्याचा सरकारचा प्रयत्न?

0
7

>> विरोधकांचे आरोप केंद्र सरकारने फेटाळले; केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून चौकशीचे आदेश

केंद्र सरकार ‘इंडिया’ आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचे आयफोन हॅक करून हेरगिरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा देणारे संदेश ॲपल कंपनीकडून या नेत्यांना पाठवण्यात आल्याचे प्रकरण काल सकाळी समोर आले. या आरोपांनंतर राजकारणात एकच खळबळ माजली. केंद्र सरकारने हे आरोप फेटाळून लावले. तसेच या हॅकिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली.

काल सकाळी आयफोन हॅक होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार सीताराम येचुरी, काँग्रेस नेते पवन खेरा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आदी नेत्यांचे आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ॲपलने पाठवलेल्या मेलनुसार, हॅकिंगचा प्रयत्न सरकार पुरस्कृत हॅकर्सकडून करण्यात आल्याचे म्हटले आहे. कदाचित शासनपुरस्कृत हल्लेखोर तुमचे आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. हल्लेखोर तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतात, असे ॲपलकडून आलेल्या अलर्टमध्ये म्हटले होते.

प्रकरणाच्या मुळाशी
जाणार : वैष्णव

काही सहकाऱ्यांनी ॲपलने पाठवलेल्या अलर्टबाबत विचारणा केली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार आहोत. आमचे काही टीकाकार आहेत, जे नेहमीच खोटे आरोप करतात. त्यांना देशाची प्रगती नको आहे. ॲपलने 150 देशांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच ॲपलने अंदाजाच्या आधारे हा संदेश पाठवला आहे. ॲपलने याबाबत स्पष्टीकरण दिले असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले.

ॲपलने आपल्या स्पष्टीकरणात
काय म्हटले आहे?

कोणत्या कारणाने अलर्ट पाठवण्यात आला, याची माहिती देता येणार नाही, अशी माहिती उघड झाल्यास हॅकर्स अधिक सावध होण्याची शक्यता आहे. हॅकिंगच्या अलर्टबाबत कोणत्याही विशिष्ट राज्य किंवा सरकारला जबाबदार धरता येणार नसल्याचेही ॲपलने म्हटले आहे.

ॲपलने पाठवलेल्या मेलमध्ये काय म्हटले?
ज्यांचे आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न झाला, अशा व्यक्तींना ॲपलकडून मेल पाठवण्यात आले. या मेलनुसार, सरकार प्रायोजित हॅकर्सकडून आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे म्हटले आहे. हॅकर्सकडून तुमची वैयक्तिक माहिती, तुम्ही काय करता, कोणासोबत संवाद साधता, आदी वैयक्तिक कारणाने तुम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात आले.