गेली सात वर्षे भारतीय तपासयंत्रणा ज्याच्या मागावर आहेत, तो पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची सुवार्ता आली आहे. बेल्जियमशी भारताचा प्रत्यार्पण करार असल्याने नुकत्याच भारताच्या हवाली झालेल्या तहव्वुर राणाप्रमाणेच मेहुल चोक्सी ह्याचेही भारतात प्रत्यार्पण होण्याची आशा जागली आहे. मात्र, हे प्रत्यार्पण रोखण्यासाठी आणि चोक्सीला जामीन मिळवण्यासाठी त्याच्या वकिलांची फौज सक्रिय झाली आहे हेही लक्षात घ्यावे लागेल. चोक्सी हा रक्तक्षयाने आजारी असल्याचे कारण देत त्याला जामीन मिळावा आणि त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास अनुमती मिळू नये यासाठी आता त्याच्या वकिलांकडून कायद्याचा कीस पाडला जाईल. मेहुल चोक्सीचा थांगपत्ता लागण्याची काही ही पहिली वेळ नव्हे. पीएनबी घोटाळा उजेडात येण्याची शक्यता दिसताच हा चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी दोघेही भारतातून पळाले. चोक्सी भारतीय तपासयंत्रणांचे हात सहसा पोहोचणार नाहीत अशा अँटिग्वा बर्ब्युडामध्ये आश्रयाला गेला. विशिष्ट गुंतवणूक केली की नागरिकत्व बहाल करणारे अनेक देश आहेत. त्यापैकीच हा एक. त्यामुळे चोक्सीची तेथे सोय झाली. चोक्सी अँटिग्वात असल्याचा सुगावा भारतीय तपास यंत्रणाां लागताच तो तेथून पळाला. तो डॉमिनिकन प्रजासत्ताकाच्या आश्रयाला गेल्याचे मग उघड झाले. भारताच्या दबावामुळे तेथे त्याला बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी अटक झाली, परंतु नंतर त्याची आजारपणाखातर सुटकाही झाली. आता बेल्जियममधून स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्यास जाण्याच्या तयारीत असताना चोक्सी पुन्हा एकवार पकडला गेला आहे. त्यामुळे यावेळी तरी त्याला भारताच्या ताब्यात घेण्यासाठी सरकारने प्रयत्नांची शर्थ करायला हवी. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये आहे. तो तर भारतातून पळाल्यावर इंग्लंडच्या उच्चभ्रू वस्तीत आलिशान सदनिकेत राहत असल्याचे आणि त्यावर कडी म्हणजे तेथील प्रतिष्ठित भागात हिऱ्यांचाच व्यवसाय करीत असल्याचे उघडकीस आले. अर्थात, हा शोध भारतीय तपास यंत्रणांना नव्हे, तर तेथील ‘टेलिग्राफ’ दैनिकाने लावला होता हेही लक्षात घेण्यासारखे आहे. भारतीय बँकांना म्हणजेच पर्यायाने देशाला एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल तेरा हजार कोटींना चुना लावून गेलेले हे गुन्हेगार विदेशात सुखाने राहू शकतात आणि भारतीय तपास यंत्रणांचे हात तेथवर थिटे पडतात हे अतिशय लाजीरवाणे आहे. नीरव मोदी काय, मेहुल चोक्सी काय, ललित मोदी काय, विजय मल्ल्या काय, ही नामावली फार मोठी आहे. देशाला लुटून विदेशात पळून गेलेल्या 72 आर्थिक गुन्हेगारांपैकी केवळ विनय मित्तल आणि सनी कालरा ह्या दोघांनाच भारतात परत आणण्यात आतापर्यंत भारतीय तपास यंत्रणांना यश आलेले आहे. बाकी सारे आर्थिक गुन्हेगार विदेशांमध्ये उजळ माथ्याने आणि आरामात राहात आहेत. जी गोष्ट आर्थिक गुन्हेगारांची तीच दहशतवाद्यांची. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला तर त्याच्या हयातीत परत आणणे भारतीय यंत्रणांना शक्य होईल का हा प्रश्नच आहे. छोटा राजन, अबू सालेम यांना भारतात आणता आले. आता तहव्वूर राणाचेही प्रत्यार्पण झाले. परंतु अनेक दहशतवादी – ज्यामध्ये खलिस्तानवादीही आहेत, विदेशात सुखाने राहून तेथील भारतीयांना धमकावत आहेत. भारतासारख्या सार्वभौम देशाच्या सरकारला देशाच्या ह्या दुष्मनांना भारतात परत आणण्यासाठी जे जंग जंग पछाडावे लागतात ते पाहाता कीव येते. त्यामुळे मेहुल चोक्सी पकडला गेला ह्यात समाधान मानण्यासारखे काहीही नाही. नीरव मोदी ह्यालाही अशीच अटक झाली होती. पण त्याचे प्रत्यार्पण अजूनही होऊ शकलेले नाही. बेल्जियमशी प्रत्यार्पण करार असल्याने त्याच्या बाबतीत कदाचित भारतीय तपासयंत्रणांना यश येईल, परंतु ह्या काका – पुतण्याने केलेल्या लुटीच्या परतफेडीचे काय? पीएनबीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच चारून ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ आणि ‘फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट’ मिळवून त्या हमीच्या आधारे विविध बँकांच्या विदेशस्थ शाखांकडून कोट्यवधींचे कर्ज घेऊन ते बुडवणाऱ्या आणि परिणामी पीएनबी बँकेला दिवाळखोरीत ढकलणाऱ्या ह्या गुन्हेगारांना त्यांच्या ह्या कृत्याची सजा मिळणार की नाही? एखाद्या बँकेवर दरोडा घालणारे गुन्हेगार पकडले जातात व त्यांना शिक्षा होते. परंतु इथे कोट्यवधींचे दरोडे घालून साळसूदपणे विदेशात प्रतिष्ठित नागरिक म्हणून जगणारे हे जे भामटे आहेत, त्यांचे काय? प्रस्तुत प्रकरणात मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताने शिकस्त केलीच पाहिजे, पण नीरव मोदीचेही विस्मरण होता कामा नये. त्याच्या प्रत्यार्पणात ब्रिटनच्या यंत्रणांनी खो घातला आहे. नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या.. गुन्हेगारांची नामावली तर मोठी आहे.