>> प्रदेश कॉंग्रेसची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विनंती
पोर्तुगीज पासपोर्ट बाळगणारे दर्यावर्दी तसेच विदेशात काम करणारे गोमंतकीय यांना कोविडमुळे निर्मित स्थितीत आपल्या देशात परतण्यासाठी भारत सरकारने सहानुभूतीपूर्वक परवानगी द्यावी व या संकटकाळात त्यांना मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
सध्या विदेशात जहाजांवर किंवा इतर ठिकाणी नोकरी-व्यवसाय करणार्या गोमंतकियांनी केवळ पोटापाण्यासाठी पोर्तुगीज पासपोर्ट केला आहे. या पासपोर्टमुळे त्यांना युरोपियन देशात नोकरी मिळते. पण त्या देशांत नोकरी करताना या गोमंतकीयांनी आपल्या देशाशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. आज गोव्यातील असंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह या विदेशातील गोमंतकीयांनी कष्ट करुन कमावलेल्या पैशांवर चालतो आहे हे कॉंग्रेसने मोदी व सावंत यांच्या नजरेस आणून दिले आहे. त्या गोमंतकीयांना पोर्तुगीज पासपोर्ट आहे म्हणून त्यांना मातृभूमीत परतण्यास मदत न करणे हे योग्य ठरणार नसल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे.