रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) हा काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड ह्या पक्षांशी केवळ नावापुरती युती करू इच्छित नसून, या पक्षांनी गोव्यातील मूळ व्यक्ती या संबंधीच्या ‘पोगो’ विधेयकाला पाठिंबा दिला, तरच आपला पक्ष त्यांच्याशी युती करणार असल्याचे काल आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
गोव्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व गुन्हेगारी कृत्ये न करणाऱ्या परप्रांतियांना आपण ‘घाटी’ हा वापरलेला नसून, जे परप्रांतीय गुन्हेगारी कृत्ये करीत असतात व गोव्याचे नाव खराब करतात, त्यांनाच उद्देशून ‘घाटी’ हा शद्ब आपण वापरत असल्याचे स्पष्टीकरण मनोज परब यांनी दिले. गोव्यात जी गुन्हेगारी कृत्ये घडत असतात, त्यातील जास्तीत जास्त गुन्हेगार हे परप्रांतीय असल्याचे आढळून येतात. राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी अशा परप्रांतीय गुंडांचा वापर करून घेत असल्याचे परब म्हणाले. काही परप्रांतीय गोव्याच्या अस्तित्त्वावरच घाला घालत असल्याचे दिसून येत आहे, काही जण तर लोकांच्या जमिनीही हडप करीत असल्याचे परब म्हणाले. एवढेच नव्हे तर परप्रांतीय आता गोवा आपल्या ताब्यात घेऊ पाहत आहेत. आपला पक्ष हा आपण गोव्याच्या अस्मितेच्या रक्षणासाठीच स्थापन केला असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.

