पैंगीण येथील श्री परशुराम पंचैग्राम सहपरिवारातील श्री बेताळ देवस्थानचा जीर्णोद्धार व मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा नुकताच झाला. या देवालयाचा तिसाला परब म्हणून परिचित असलेला टक्याचा संचार दि. 15 पासून सुरू होणार आहे. हा उत्सव 22 मे पर्यंत चालणार आहे. दि. 15 रोजी महालवाडा येथील श्री नवदुर्गा देवालयात देवकोस्थापन व तोंड बांधून पावणी होईल. नंतर श्री बेताळ देवालयात टक्यास दांडी घालून आरवातून टक्याच्या संचाराला प्रारंभ होणार आहे. त्या रात्री टक्याच्या संचाराचा मुक्काम श्री नवदुर्गा देवालयात राहील.
दि. 16 रोजी दुपारी करपणस, गाळये येथे आगमन, श्री भगवती देवालय खावट येथे आगमन व मुक्काम असेल. दि. 17 रोजी दुपारी श्री लक्ष्मीनारायण देवालय पैंगीण येथे आगमन, सायं श्री परशुराम देवालयाकडून श्री पाचापुरुष देवस्थान मठवाडा येथे आगमन व मुक्काम असेल. दि. 18 रोजी दुपारी श्री पाधापुरुष देवस्थानकडून श्री मोहिनी देवालय सादोळशे येथे प्रस्थान, संध्याकाळी श्री सातेरी देवालय कोळकर येथे आगमन व मुक्काम राहील. दि. 19 रोजी दुपारी श्री सातेरी देवालयाकडून श्री बेताळ देवालयात आगमन व रात्री मुक्काम असेल. दि. 20 रोजी दुपारी श्री बेताळ देवालयाकडून चंदना पेडमार्गे श्री केशव देवालय लोलये येथे प्रस्थान व मुक्काम राहील. दि. 21 रोजी दुपारी श्री केशव देवालयाकडून श्री दुर्गा देवालय खरगाळ येथे प्रस्थान व रात्री मुक्काम असेल. दि. 22 रोजी दुपारी श्री दुर्गा देवालय खरगाळ येथून प्रस्थान व नंतर श्री बेताळ देवालयात आगमन होणार आहे. पैंगीण, लोलये व खरगाळ गावांचा प्रमुख उत्सव असून 10 रोजी श्री नवदुर्गा देवालयात जेवणेस मेढ घालण्यात येईल.
दि. 11 रोजी श्री नवदुर्गा देवालयात पुण्याहवाचन व सायं. श्री परशुराम देवालयात रंगावली पूजा व नंतर श्री नवदुर्गा देवालयात रंगावली पूजा होईल. दि. 12 रोजी श्री नवदुर्गा देवालयात ब्राह्मण जेवणी होईल. दि. 13 रोजी मंडल्याची जेवणी, 14 रोजी खारव्याची जेवणी व रंगावली पूजा होईल. दि. 27 रोजी श्री बेताळ देवालयात रंगावली पूजेनंतर उत्सवाची सांगता होईल. तीन दिवस तीन जागर होईल.
या संपूर्ण कालावधीत तिन्ही गावांमध्ये बंधन पाळण्यात येत असल्याने देवकृत्ये व मंगलकार्ये होत नाहीत. उत्सवात सहभागी होण्यासाठी तिन्ही गावांतील इतरत्र असलेले ग्रामस्थ आवर्जून येतात. जेथे टक्याच्या स्वारीचा मुक्काम असतो, तेथे पूर्वपरंपरेनुसार भोजन व चहापानाची सोय स्थानिकांकडून करण्यात
येते.