पूर्वपुण्याई

0
17
  • सौ. संध्या विवेक वाटवे

चिंतामणी केळकर आपल्या वडिलांच्या पूर्वपुण्याईने- वारसाहक्काने- मिळालेला वडिलांचा फलज्योतिषशास्त्राचा वारसा आपल्या वडिलांच्या खुर्चीवर बसून चालवत आहेत. त्यांची वाणी म्हणजे त्यांच्या जिभेवर जणू वाचस्पती बसल्यासारखी आहे; आणि या वाचस्पतीचा गोव्यातीलच नव्हे तर गोव्याबाहेरील, परदेशातील लोकांनीही अनुभव घेतलेला आहे, घेत आहेत. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने-

वारसाहक्काने जमीन, संपत्ती, बँक बॅलन्स इत्यादी गोष्टी आवश्यक त्या कागदपत्रांद्वारे मिळवता येतात; पण एखादी कला, सिद्धी वारसाहक्काने कोणाकडे येणे म्हणजे ती पूर्वपुण्याईच असते. आणि त्यासाठी एखादी व्यक्ती ज्या घरात जन्माला येते त्या व्यक्तीला जन्मतःच परमेश्वर ही कला वा सिद्धीचा वरदहस्त देऊनच जन्माला घालतो. अशा खूप घटना बऱ्याच कुटुंबांमध्ये वारसाहक्काने त्या कुटुंबातील काही व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीला प्राप्त होताना दिसतात. ही एक दैवी देणगीच असते!
वकिलाच्या घरी वकीलच जन्माला येणे, डॉक्टरच्या घरी डॉक्टरच जन्माला येणे इत्यादी. हे खरेतर विधिलिखितच असते. कारण प्रत्येक वकिलाच्या घरी वकील, डॉक्टरच्या घरी डॉक्टरच जन्म घेईल असे नसते. केवळ काही कुटुंबांतच तसे घडते, कारण दैवाने घडवलेला तो एक आविष्कार असतो.

वकिली करणे म्हणजे काही तशी सोपी गोष्ट नव्हे. कायदेतज्ज्ञ उगाच नाही म्हणत त्या पेशाला! तशी बुद्धिमत्ता, चलाखी, चाणाक्षपणा अंगी असावा लागतो, तरच तो निष्णात वकील या सदरात मोडतो.
डॉक्टर होणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व असूनही नसल्यासारखे असते. कायम टांगती तलवार डॉक्यावर ठेवून जगणे! डॉक्टर होण्यासाठी आवश्यक म्हणजे ‘स्टॅमिना’ असणे. आणि डॉक्टर होणाऱ्या व्यक्तीला देव असा स्टॅमिना देऊनच जन्माला घालतो. ऑपरेशन थिएटरमध्ये तासन्‌‍तास उभे राहून एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी केलेला प्रकार म्हणजे ऑपरेशन. हे दैवी देणगी लाभलेला डॉक्टरच करू शकतो. आणखीनही असे अनेक व्यवसाय आहेत, ज्यांत सहनशक्ती, स्टॅमिना, बुद्धिमत्ता यांचा कस लावावा लागतो.
अशीच एक व्यक्ती आपल्या वडिलांच्या पूर्वपुण्याईने- वारसाहक्काने- मिळालेला वडिलांचा फलज्योतिषशास्त्राचा वारसा आपल्या वडिलांच्या खुर्चीवर बसून चालवत आहेत. त्यांची वाणी म्हणजे त्यांच्या जिभेवर जणू वाचस्पती बसल्यासारखी आहे. आणि या वाचस्पतीचा गोव्यातीलच नव्हे तर गोव्याबाहेरील, परदेशातील लोकांनीही अनुभव घेतलेला आहे, घेत आहेत. यात अतिशयोक्ती मुळीच नाही.
हे वाचस्पती ज्योतिषी म्हणजे आसगाव, बार्देश- गोवा येथील श्री. चिंतामणी रामकृष्ण केळकर, माझे भाऊजी (माझ्या बहिणीचा नवरा) तसेच माझ्या नवऱ्याचे मामा! श्री. चिंतामणी केळकर यांच्याशी माझ्या बहिणीचे लग्न झाले त्यावेळी ते फक्त त्यांच्या बाबांकडे आलेल्या लोकांच्या जन्मपत्रिका लिहीत असत (इ. स. 1985). त्यानंतर 1988 च्या दरम्यान त्यांचे वडील अर्धांगवायूने आजारी पडले होते, तरीही ते एका जागी बसून आपला ज्योतिषकथनाचा व्यवसाय सांभाळत होते. पुढे काही दिवसांतच त्यांना दुसरा अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणावर खिळले.

त्याच दरम्यान श्री. चिंतामणी केळकर यांना 1989 मध्ये पहिले कन्यारत्न प्राप्त झाले आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांचा ज्योतिषाचा व्यवसाय पुढे नेण्यास, लोकांच्या समस्या सोडविण्यास सुरुवात केली. त्यांची अफाट बुद्धिमत्ता, सहनशक्ती आणि लोकांशी वागण्याचा त्यांचा नम्र स्वभाव यामुळे अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात आपला जम बसवला.
आजतागायत त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली की गोवा राज्य सोडून बाहेरील इतर राज्यांतही ते सुप्रसिद्ध झालेले आहेत. वडिलांच्या खुर्चीचा वारसा आणि त्यांची पुण्याई त्यांना बऱ्याच ठिकाणी लाभली आहे, आणि लाभतही आहे. त्यांच्या आसगाव या गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत लोक त्यांचा खूप आदर करतात. त्या गावातील कोणत्याही सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यासाठी त्यांना विशेष अतिथी म्हणून आवर्जून बोलावले जाते. कित्येक वेळा त्यांच्या हस्तेच कार्यक्रमाचा शुभारंभ केला जातो.

हल्लीच त्यांच्या हस्ते त्यांच्या पंचक्रोशीतील तीन मदिरांचा शिखर कलश स्थापना विधी पार पडला. दि. 13 फेब्रुवारी 2024, माघ शु. 4, मलबार बांध, हणजूण येथील ‘श्रीराष्ट्रोळी, बांदेश्वर विठ्ठल मंदिर.’ दि. 23 फेब्रुवारी 2024, माघ शु. 14, ग्रॅन्ड चिवार, हणजूण येथील ‘श्री राष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थान.’ दि. 29 फेब्रुवारी 2024 माघ कृ. 5, पिकेन चिवार, हणजूण ‘श्रीराष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थान.’
शिखर कलश आणि मंदिर स्थापना यांचा मुहूर्तही संबंधित देवस्थान कमिटीनी त्यांच्याकडूनच काढून नेला होता आणि त्याचवेळी त्या-त्या गावांतील लोकांनी त्यांना सदर कार्यक्रमाचे आगाऊ निमंत्रणही देऊन ठेवले होते. कारण श्री. चिंतामणी केळकर यांच्याकडे ज्योतीष सल्ल्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या खूप असते. सतत लोकांची वर्दळ असल्याने त्यांना सवड मिळणे कठीणच होते.
या शिखर कलश स्थापनेच्या वेळी त्यांनी तेथील लोकांना अशा कार्याच्या वेळी येणाऱ्या लहान-सहान त्रुटी समजावून सांगून, आपल्या नम्र वाणीत सल्ला देऊन व्यवस्थितपणे करून घेतल्या. यानिमित्ताने गावातील लोकांनी त्यांचा शाल-श्रीफळ देऊन, नतमस्तक होऊन विशेष गौरवही केला.

खरेतर सांगायचा मुद्दा एवढाच की, पूर्वपुण्याई असल्याशिवाय आपल्याच गावातील- पंचक्रोशीतील- सलग तीन मंदिरांची शिखर स्थापना, एकापाठोपाठ एकाच महिन्यात त्यांच्या हस्ते होणे हे त्यांचे पूर्वसंचितच नव्हे का? केवळ एखाद्याच मंदिराच्या नव्हे तर तीन मंदिरांच्या शिखर कलश स्थापनेचा योगायोग जुळून येणे म्हणजे दैवी संकेतच म्हणावा लागेल!
ज्योतिष सल्ल्याच्या व्यवसायाने त्यांनी प्रसिद्धी मिळवली, पैसा मिळविला. तसेच आपल्या व्यवसायात व्यस्त असूनही कथा-कविता लेखन, विविध लेख लिहिणे ही त्यांची मनपसंत कलाही ते जोपासतात. त्याची झलक अनेक वर्तमानपत्रे, अंक अशा प्रसिद्धीमाध्यमातून दिसून येते. त्यांच्या या लेखनकलेतून त्यांना आजवर अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.
अशा या व्यक्तिमत्त्वाला माझे विनम्र अभिवादन!
अशी ही व्यक्ती जन्मलीही नेमकी मार्च महिन्यातील दिनांक 9 च्या रात्री 12.00 वाजता. त्यामुळे त्यांचा वाढदिवसही दरवर्षी दोन दिवस साजरा केला जातो. 9 आणि 10 मार्च या दिवशी! आज-उद्या त्यांचा वाढदिवस, तेव्हा आम्हा उभयतांकडून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!