पुराव्यांमुळे म्हादईप्रश्नी गोव्याची बाजू मजबूत

0
12

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून स्पष्ट

उद्या सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी म्हादई विषयक याचिका सुनावणीला येण्याची शक्यता आहे. राज्य सरकार म्हादई प्रश्नी गंभीर आहे. आमच्याकडे भक्कम पुरावे असून, म्हादई प्रश्नी आमची बाजू मजबूत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.

राज्याचे महाधिवक्ता म्हादईप्रश्नी याचिकांचा वरच्या वर आढावा घेत आहेत. म्हादईप्रश्नी पाच वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील खटला आम्ही जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयात म्हादई जलतंटा लवादाच्या निवाड्याला आव्हान, कर्नाटक वन्यजीव संरक्षकांविरुद्धचा खटला दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या दैनंदिन सूचीनुसार, म्हादई प्रकरण बुधवार दि. 29 नोव्हेंबर आणि गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध आहे. सर्व संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाकडून एकच प्रकरण म्हणून एकत्रित केली जातील. राज्याचे महाअधिवक्ता आणि वकिलांचे संपूर्ण पॅनल गेल्या अनेक दिवसांपासून म्हादई प्रकरणाचा आढावा घेत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्नी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्याची म्हादई कायदा आणि तांत्रिक टीम मंगळवारी दिल्लीला रवाना होणार आहे. म्हादई प्रश्नी आमचे सल्लागार तयार आहेत, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्नी याचिकेवर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर गोवा विधानसभेच्या म्हादई सभागृह समितीची खास बैठक घेण्याची मागणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली होती; मात्र म्हादई सभागृह समितीची बैठक घेण्याबाबत सरकारी पातळीवर काहीच हालचाल नाही, असे दिसून आले आहे.