राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याने सत्तरी तालुक्यातील क्रांतीवीर दिपाजी राणे यांचे घर, केपे तालुक्यातील बेतुल किल्ला, सत्तरी तालुक्यातील नाणूस किल्ला यांच्यासह एकूण 7 स्थळे संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यासाठी सूचना जारी केली आहे. या सात स्थळांना संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यास कुणाचाही आक्षेप असल्यास त्यांनी येत्या दोन महिन्यात आक्षेप नोंदवावा, असे पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉ. नीलेश फळदेसाई यांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे. पुरातत्त्व खात्याकडून राज्यातील बेतुल किल्ला, नाणूस किल्ला, क्रांतीवीर दिपाजी राणे यांच्या घराबरोबरच म्हावशी सत्तरी येथील रॉक एनग्रेव्हिंग्स, खोतीगाव काणकोण येथील स्टोन सर्कल, खोला काणकोण येथील सोलिये मंदिर, बाळ्ळी केपे येथील श्री शांतादुर्गा संस्थानातील श्री वज्रेश्वर मंदिराची तळी संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले जाणार आहे.