पुन्हा दूध दरवाढ

0
15

गेल्या वर्षीच मे महिन्यात मोठी दूध दरवाढ केलेल्या गोवा डेअरीने यंदा पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशात हात घालून गुपचूप डल्ला मारला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणत्याही चर्चेला वाव न देता गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादक महासंघ आपल्या ग्राहकांच्या माथी दोन रुपयांपासून पाच रुपयांपर्यंतची मोठी दरवाढ करून मोकळा झाला आहे. या दूध दरवाढीचा सर्व वाटा दुग्धउत्पादक शेतकरी व बागायतदारांना गेला असता, तर ग्राहकांनी एकवेळ तो आनंदाने सोसला असता, परंतु येथे दोन रुपये दुग्ध उत्पादकांना आणि उर्वरित मलिदा आपल्याला असाच प्रकार गोवा डेअरीने गेल्यावर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा अवलंबिलेला दिसतो आणि त्यामुळेच या दरवाढीबाबत आणि त्यामागे असलेल्या गोवा डेअरीच्या ढिसाळ कारभाराबाबत काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात.
गोवा डेअरीच्या कुर्टीच्या दुग्ध प्रकल्पाचे उद्घाटन 1971 साली गांधी जयंतीला झाले, तेव्हा हा प्रकल्प गोव्याची दुधाची गरज भागवील, असे स्वप्न या प्रकल्पाचे उद्घाटन करणारे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी बोलून दाखवले होते. नवप्रभेने तेव्हा या उपक्रमाचे स्वागत करताना ‘धवलक्रांतीची मुहूर्तमेढ’ असे त्याचे वर्णन केले होते. सुरवातीला दिवसाला फक्त एक हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आता दिवसाला एक लाख दहा हजार लीटरवर गेलेली आहे. परंतु गोवा डेअरीचा गेल्या काही वर्षांतील कारभार पाहिला तर धवलक्रांतीऐवजी तेथील कृष्णकृत्यांसाठीच ती जनतेमध्ये सतत चर्चेत राहिलेली दिसते. तऱ्हेतऱ्हेचे राजकारण, तऱ्हेतऱ्हेचे भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांची लाचखोरी, अशा भलत्या कारणांनी हा दुग्ध महासंघ नेहमी चर्चेत राहत आला आहे आणि त्याची सार्वजनिक प्रतिमा काळवंडत राहिली आहे. त्याच्या यंत्रसामुग्रीपासून पशुखाद्यापर्यंतच्या खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप सतत होत आले. त्यामुळे दूधदरवाढ करताना जेव्हा महासंघाकडून तोट्याची गणिते पुढे केली जातात, तेव्हा ह्या तोट्याला ग्राहक जबाबदार आहेत की महासंघाचा ढिसाळ कारभार हा प्रश्न स्वाभाविकरीत्या उपस्थित होतो.
गोवा डेअरीच्या दुधावर आजही गोमंतकीय ग्राहकांचा विश्वास आहे, कारण हे आपल्याच मातीतले दूध आहे असा ग्राहकांचा भाबडा समज आहे. आपल्याकडे पुरेसे दूधसंकलन होत नसल्याने बाहेरून दूध आणून त्यावर गोव्याचे नाव लावून ते आपल्याला विकले जाते आहे हे या ग्राहकांच्या गावीही नसते. परंतु हा जो निष्ठावान ग्राहक गोवा डेअरीला लाभला आहे, त्याला नियमित दूधपुरवठा करणेही या महासंघाला जमत नाही. विशेषतः गोवा डेअरीचा हायफॅट दुधाचा पुरवठा तर कधीच नियमित नसतो. अन्य पूरक उत्पादने तर बाजारात दिसतही नाहीत. आपल्याला सुमुल आणि इतर बाहेरील दुग्धसंघाचे मोठमोठे प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत, ते आपल्यापेक्षा कमी किमतीत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकून बाजारपेठ काबीज करीत निघाले आहेत, याची जाणीव तरी गोवा डेअरीला आहे का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. गैरव्यवस्थापनाचे, भ्रष्टाचाराचे आणि लाचखोरीचे गंभीर आरोप यामुळे गोवा डेअरीची विश्वासार्हता दिवसेंदिवस रसातळाला चाललेली आहे. अशातच कोणतेही पटण्याजोगे स्पष्टीकरण न देता पुन्हा पुन्हा एवढी जबरी दरवाढ करीत जर महासंघाकडून ग्राहकांच्या खिशात असा सतत हात घातला जाऊ लागला, तर जो आपला निष्ठावंत ग्राहक आजवर टिकलेला आहे, तोही गमावण्याची पाळी लवकरच ओढवेल.
गोवा डेअरी तोट्यात असेल तर त्यामागची कारणे काय याचा वस्तुनिष्ठतेने अभ्यास होणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या माथी पुन्हा पुन्हा दरवाढ मारून दुग्धउत्पादकांच्या नावावर वरचा मलिदा लाटण्याचा हा जो काही प्रकार सातत्याने चालला आहे, तो समर्थनीय नाही. सरळसरळ ‘आयजीच्या जिवावर बायजीने उदार’ होण्याचा हा प्रकार आहे. गोवा डेअरी गाळात जाण्याची कारणे कधी तरी वस्तुनिष्ठपणे शोधली जाणार आहेत की नाही? त्यावर जे भ्रष्टाचाराचे, लाचखोरीचे, खोगीरभरतीचे, पशुखाद्यापासून यंत्रसामुग्रीपर्यंतच्या खरेदीतील घोटाळ्याचे आरोप संबंधित व्यक्तींकडूनच सतत होत आले आहेत, त्याबाबत तटस्थ चौकशी होणार आहे की नाही? डेअरीचे वार्षिक नफातोटापत्रक पाहिले तरी त्यात चहापान, पूजा, संचालक मंडळाचा प्रवास, बैठक भत्ता आदींवरच लाखो रुपये अवास्तव खर्चिले जाताना दिसतात. वेतन व भत्त्यांवरील खर्च तर प्रचंड दिसतो. गोवा डेअरीने ऊठसूट दरवाढीचे हत्यार उपसण्याआधी जरा आपल्या कारभारात डोकवावे. त्याला शिस्त आणावी. मगच दरवाढीचे पाऊल उचलावे.