पुढचा धोका ओळखा

0
216

कोरोना विषाणूने जगभरात माजवलेल्या हलकल्लोळाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय घेतला. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याचेच सरकारचे धोरण असल्याने यात वावगे काही नाही, परंतु ज्या पद्धतीने हा निर्णय आधी काही मोजक्या शाळांनी स्वतःहून घेतला आणि नंतर शिक्षण खाते जागे झाले आणि तसा निर्णय मग सर्व शाळांना लागू करणारे परिपत्रक काढण्यात आले हा प्रकार मुळीच शोभादायक नाही. हे नेतृत्वहीनतेचे लक्षण आहे. शाळांच्या व्यवस्थापनांना परीक्षांचे फेरनियोजन करण्याचे अधिकार सरकारने दिलेले होते, पण परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याचे अधिकार त्यांना कोणी आणि कधी दिले? कोणत्या कायद्याखाली दिले? असे प्रश्‍न विचारले जाऊ शकतात. वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा हा निर्णय काही शाळांनी नव्हे, तर शिक्षण खात्यानेच स्वतःहून घेणे अपेक्षित होते, परंतु काही पालकांनी व शालेय व्यवस्थापनांनी जागरूकपणे स्वतःहून तसा निर्णय घेतला आणि मगच शिक्षण खाते जागे झाले आणि हा निर्णय संपूर्ण राज्याला लागू करण्यात आला. मुळात सरकारने कोरोनासंदर्भात निर्णय घेताना त्यामध्ये जी संदिग्धता ठेवलेली आहे, तीच अशा प्रकारच्या सावळ्यागोंधळास कारणीभूत ठरते आहे. जे शिगमोत्सव मिरवणुकांच्या बाबतीत दिसून आले, तेच वार्षिक परीक्षांच्या बाबतीत झाले आहे. सरकार काही बाबतींत स्वतः निर्णय न घेता निर्णयस्वातंत्र्य इतरांना बहाल करून मोकळे झाले आहे. त्यातून गोंधळ निर्माण होतो आहे. आता नववी, दहावी, अकरावी, बारावीच्या परीक्षा नेहमीप्रमाणे घेतल्या जाणार आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत? देशातील बाधित रुग्णांची संख्या वाढत जाईल. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी म्हणजे ठिकठिकाणची सरकारे सध्या पुरेशा तपासणी सुविधांच्या अभावी केवळ विदेशात प्रवास करून आलेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीच कोरोना चाचणी करीत आलेली आहेत. इतर रुग्णांमध्ये लक्षणे दिसली तरी त्यांच्या चाचण्या घेतल्या जात नाहीत. त्यामुळे हा मर्यादित दिसणारा आकडाही प्रत्यक्षात मोठा असू शकतो. कोरोनाचा प्रत्येक रुग्ण दर दिवशी शेकडो लोकांच्या संपर्कात आलेला असू शकतो. आपल्या देशात तर अनेक कोरोना रुग्णांनी अडाणीपणाची कमाल केलेली दिसते आहे. डॉक्टरांना आपण कोरोनाबाधित आहोत याची कल्पना न देणे, विलगीकरणासाठी पाठवलेले असताना पळून जाणे असले जे प्रकार होत आहेत, त्यातून अशी प्रत्येक बाधित व्यक्ती किती लोकांचे जीव धोक्यात घालेल याची कल्पनाही करवत नाही. गोव्यामध्ये सुदैवाने अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही ही दिलासादायक बाब जरूर आहे, परंतु म्हणून आपण बेफिकीर राहून चालणार नाही. देशातील कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण नजीकच्या महाराष्ट्रात आहेत. कर्नाटकमध्येही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारीचे अधिक व्यापक उपाय गोवा सरकारनेही घेणे आवश्यक आहे. जनजागृतीच्या बाबतीत काही विशेष प्रयत्न राज्य सरकारने केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्र सरकारने जनजागृतीसाठी पुस्तिका तयार केली आहे. नवप्रभेच्या वाचकांच्या माहितीसाठी त्यातील महत्त्वाचा मजकूर या अग्रलेखाशेजारील जागेत आवर्जून दिलेला आहे. खरे तर असे प्रबोधन करणे हे काम राज्य सरकारचे आहे. सॅनिटायझर, मास्कस् बाजारपेठांतून गायब झाले आहेत. लोक पुढील संकटांची चाहुल घेऊन धान्य व जीवनावश्यक वस्तूंची बेगमी करण्यासाठी रांगा लावताना दिसत आहेत. संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी, सुपरमार्केट आणि मॉलमधील या गर्दीच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत? असंख्य गोमंतकीय शिक्षणाच्या, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने देशविदेशात असतात. त्यातले अनेकजण घरी परतू लागले आहेत. त्यांच्यावर काय देखरेख ठेवली गेली आहे? विचारण्यासारखे प्रश्न अनेक आहेत. कोरोनाची लक्षणे दिसायला तब्बल चौदा दिवस लागू शकतात आणि प्रत्येक बाधित व्यक्ती अनेक पटींनी हा संसर्ग पसरवू शकते या दोन गोष्टींचा विसर राज्य सरकारला पडू नये. केंद्र सरकारने ज्या तत्परतेने कोरोनासंदर्भात धडाधड आणि अचूक निर्णय घेतले, ती राज्य सरकारकडून अजूनही दिसलेली नाही. सत्ताधारी राजकारणी जिल्हा पंचायतीच्या राजकारणात गुंतलेले आहेत. इथे जनतेचा जीव कोरोनामुळे टांगणीला लागला आहे आणि तुम्हाला कसले राजकारण सुचते आहे? या जिल्हा पंचायत सदस्यांना ना कोणते निर्णयाधिकार, ना कोणते स्थान. या निवडणुका पुढे ढकलल्याने एवढे कोणते आकाश कोसळणार आहे? एखादा बाधित रुग्ण गर्दीत मिसळला तरी होत्याचे नव्हते होऊ शकते. आरोग्यविषयक आणीबाणीला सामोरे जाण्याची आपली क्षमता आहे का? सरकारने राज्यात एकही रुग्ण नाही म्हणून गाफील न राहता भविष्यातील धोक्यांचाही विचार करावा आणि तत्पर निर्णय घ्यावेत.