पिटबुल श्वानाच्या मालकास हणजूण पोलिसांकडून अटक

0
6

पिकेन पेडे, हणजूण येथील अब्दुल कादर खाजा याने पाळलेल्या पिटबुल जातीच्या श्वानाच्या जीवघेण्या हल्ल्यात गुरुवारी 7 वर्षीय प्रभास कळंगुटकर या मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी संशयित अब्दुल कादर खाजा याला काल अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिटबुल श्वानाने सदर मुलाच्या चेहऱ्यावर, गळ्यावर व मानेवर हल्ला चढवला होता. ही घटना घडल्यानंतर ताबडतोब त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यावेळी उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी सदर मुलाचे वडील प्रेमानंद कळंगुटकर यांनी हणजूण पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी श्वानाचा मालक अब्दुल कादर खाजा याला अटक केली. त्याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 (1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.