पावसाळ्यातील त्वचारोग

0
40
  • – डॉ. मनाली महेश पवार
    (सांतइनेज, पणजी-गोवा)

त्वचेचे आजार पावसाळ्यात सर्रास व्यक्त होतात. त्वचा म्हणजे आरोग्याचा आरसा. चांगली सतेज, तुकतुकीत त्वचा कुणाला आवडत नाही? पावसाळ्यात त्वचेचे कोणतेच विकार होऊ नयेत म्हणून काळजी घ्या.

पावसाळा जेवढा आनंद देतो तेवढेच आजारही पसरवतो. आपण योग्य पद्धतीने ऋतुचर्येचे पालन केले नाही तर आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्वचेचे आजार हे पावसात सर्रास व्यक्त होणारे आजार आहेत. त्वचा म्हणजे आरोग्याचा आरसा. त्वचेवर पुरळ जरी आले तरी आपला जीव कासावीस होतो. चांगली सतेज, तुकतुकीत त्वचा कुणाला आवडत नाही? त्वचा, विशेषतः चेहरा चांगला दिसावा म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करतो; पण त्वचेचे कोणतेच विकार होऊ नयेत म्हणून ऋतुचर्येचे पालन मात्र करत नाही.
पावसाळ्यात दमट हवामानात, कोंदट वातावरणात शरीर नेहमी ओलसर राहते. कपडेही नरम, ओलसर असतात. घरातील, ऑफिसमधील फर्शीदेखील पाणी सुटल्यागत ओली लागते, लघवीला वारंवार जावे लागते. म्हणजे ओल्या बाथरुमचा परत-परत संपर्क येतो. रस्त्यावर चालत जाताना चिखलयुक्त, घाण पाण्याचा पायांशी संपर्क येतो. अशा अनेक कारणांमुळे फंगल इन्फेक्शन होते व ते त्वचेवर व्यक्त होते.
त्याचबरोबर पावसाळा म्हणजे वातप्रकोप व पित्तसंचयाचा काळ. अग्निमांधही जास्त प्रमाणात जाणवते. अशा अवस्थेत विरुद्ध अन्नाचे सेवन केले- तेलकट, पचायला जड असे पदार्थ खाल्ले- अपचनातही जेवण केले- दही, मासे, आंबट, खारट पदार्थांचे अतिसेवन केले- उडीद, मुळा, वांगी, तीळ, मीठ यांचे अतिरिक्त सेवन केले तर त्याचे विपरित परिणाम शरीरावर दिसू लागतात. दिवसा झोपल्याने खाल्लेल्या अन्नाचे आम तयार होते, दूषित आहार-रस तयार होतो. आपण सगळेच जाणतो की आहारापासूनच मांसधातू तयार होतो म्हणजे मांसधातूचे पोषण होते. त्वचा मांसधातूचा उपधातू आहे, तेव्हा त्वचेचेही पोषण या दूषित आहार-रसानेच होणार म्हणजे पर्यायी त्वचेमध्ये विकार उत्पन्न होणारच. म्हणूनच त्वचेची काळजी घेताना फक्त बाह्योपचार उपयुक्त ठरत नाहीत; त्वचारोग हे बर्‍याच वेळा अपचनातून निर्माण झालेले असतात म्हणून पोटातूनही औषधोपचार करावे लागतात व यात आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पावसाळ्यात दिसणार्‍या त्वचाविकारांची लक्षणे ः

  • त्वचेवर खाज येणे, सर्वांगाला खाज येणे किंवा काखेमध्ये, गुप्तांगाच्या बाजूला (मांडीचा सांधा) खाज येणे.
  • पायांच्या तळव्यांना खाज येणे, पायांच्या बोटांच्या बेचक्यात खाज येणे, जखम, पुरळ इत्यादी म्हणजेच चिखल्या होणे.
  • एक्सिमा, रिंगवर्म, नायटा होणे.
  • मुरमं जास्त प्रमाणात येणे.
  • केस तसेच ओलसर बांधून राहिल्याने बर्‍याच वेळा केसांत कोंडा होतो किंवा ऊवा, लिखा होतात. केस गळतीही जास्त प्रमाणात होते.
  • त्वचा कोरडी, खरखरीत होते. काहीवेळा त्वचेवर भेगा पडतात.
  • मांसधातूच्या विकृतीने गूद मोडाचा विकारही बळावतो.

कशी घ्याल त्वचेची काळजी?

  • तीळ किंवा खोबरेल तेलाने संपूर्ण शरीरावर अभ्यंग करा.
  • लघवीच्या जागेवर, काखेत किंवा इतर ठिकाणी पुरळ उठले असल्यास किंवा खाज येत असल्यास कोणत्याच क्रीमचा वापर करू नका. फक्त दिवसातून ३ वेळा खोबरेल तेल लावा.
  • साबणाऐवजी निम्ब, चंदन, वेखंड, सारिवा, मंजिष्ठा, जेष्ठमधसारखी द्रव्ये असलेले उटणे लावा.
  • दूधाच्या सायीचा वापर करा.
  • बेसन, मसूरच्या पीठाचा उपयोगही त्वचेला लावण्यास करता येतो.
  • ताज्या कोरफडीचा रस, नारळाचे दूध वापरा.
  • आंघोळीच्या पाण्यात कडुनिम्बाची पाने टाकून, त्या पाण्याने आंघोळ करा.
  • दूषित भागावर निम्बाचे तेल किंवा करंजाचे तेल लावता येते.
  • दोन चमचे बेसन, पाव चमचा हळद व एक चिमूट भीमसेनी कापराचे चूर्ण एकत्र करून आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी वापरा.
  • पाव चमचा लिंबाचा रस, थोड्या पाण्यामध्ये एक चमचा जिर्‍याची पूड व चमचाभर बेसन रात्रभर भिजत घालावे व आंघोळीपूर्वी अंगाला लावावे. नंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी.
  • चेहर्‍यावरच्या मुरुमांसाठी चंदन व दालचिनी उगाळून केलेला लेप लावावा.
  • कोरफडीचा गर चेहर्‍यावर लावल्यास चेहरा सतेज होतो व केसांमध्ये लावल्यास कोंडा निघतो आणि केस मुलायम होतात.
  • त्वचा निरोगी व तेजस्वी दिसण्यासाठी दूध, लोणी, तूप, मध, केशर, हळद अशा त्वचापोषक द्रव्यांचे नियमित सेवन करावे.
  • गुलाबाच्या पाकळ्यांचे चूर्ण, मेथ्यांचे चूर्ण, धण्याची पूड, जिर्‍याची पूड यांचे मिश्रण तयार करून हे चूर्ण चेहरा धुण्यासाठी वापरावे. चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते.
  • पावसातून आल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी व अंग चांगले कोरडे करावे.
  • बाथरुममधून आल्यावर पाय ओले ठेवू नयेत, व्यवस्थित वाळवावे.
  • केस ओले ठेवू नयेत, ते ड्रायरने चांगले कोरडे करावे.
  • पावसाळ्यात धूपनाला खूप महत्त्व आहे. गोक्यांवर सुखलेल्या निम्बाचा पाला, वेखंड, जटामांसी, ज्येष्ठमध, लसणीची साले, कांद्याची साले, धूप किंवा उद घालून घर निर्जंतुक करावे. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या कपड्यांनाही धूपन करावे. केसांनाही धूप द्यावा.

पावसाळ्यात त्वचारोग होऊ नयेत म्हणून आहार ः

  • ताजे, गरम आणि हलके अन्न सेवन करावे.
  • विरुद्धाहार म्हणजे दूध व मासे, फ्रुट सॅलॅड, शिकरण इत्यादी आहार सारखा सेवन करू नये.
  • पचायला जड व तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
  • दही, चीज, पनीरसारखे पदार्थ तसेच मिठाया खाऊ नयेत.
  • खारवलेले मासे खाऊ नयेत.
  • सकाळी उठल्यावर गरम पाण्यात १/२ चमचा लिंबाचा रस घालून प्यावे.
  • पाणी चांगले उकळून प्यावे.
  • पालेभाज्यांवर शरीरघातक रसायने फवारलेली असल्याने त्या खूप पाण्याने काळजीपूर्वक धुवून घ्याव्यात. भाज्या चांगल्या शिजवूनच खाव्यात. कच्च्या, सॅलॅड करून खाऊ नयेत.
  • आले, आंबेहळद, ओली हळद, लिंबू यांपासून तयार केलेले लोणचे खावे.
  • दुपारच्या जेवणानंतर ताकात ओवा, जिरेपुड, हिंग, काळेमिठ टाकून प्यावे.
  • वैद्याच्या सल्ल्याने रोज रात्री मृदुविरेचन चालू करावे. त्यासाठी अविपत्तिकर चूर्ण, त्रिफला, आमलकी, आरग्वय इत्यादी वापरता येतेे.

त्वचेसाठी उत्तम अशा आपल्या रोजच्या आहारात ज्या गोष्टींचा समावेश आपण सहज करू शकतो, त्यातील काही महत्त्वाच्या अशा ः
१) लोणी – ताजे घरचे लोणी वर्ण सुधारावयास उत्तम होय.
२) तूप – साजूक तूप उत्तम कांतीचा लाभ करून देते.
३) दूध – रस, रक्त, मांस अशा त्वचेसाठी आवश्यक असणार्‍या सर्वच शरीरघटकांना पोषण देते. पर्यायाने त्वचेसाठी उत्तम.
४) केशर – त्वचेची कांती वाढवते.
५) मध – वर्ण्य तसेच प्रसादन करणारे.
६) हळद – वर्ण सुधारणारी व त्वचा शुद्ध करणारी.
चंदन, केशर, श्‍वेतदूर्वा, ज्येष्ठमध, पद्मकाष्ठ, वाळा, मंजिष्ठा, अनंत ही औषधे वर्ण्य आहेत व त्वचाविकारास गुणकारी आहेत.