पाणी वाचवणे ही काळाची गरज

0
11058

– विवेक कुलकर्णी, फोंडा.

वैदिक संस्कृतीमध्ये आर्यांनी पंचमहाभूतांना देव मानले. पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते. त्यांचे आपल्या जीवनावर असलेले उपकार आणि त्यांचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्यावर संतुष्ट राहावे व त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगावी या हेतूने पंचमहाभूतांची पूजा सुरू झाली. पाणी हे त्यातील एक. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये पाणी आहेच. पाण्यावरच सजीवांचे जीवन अवलंबून आहे. अन्नाशिवाय माणूस एकदोन दिवस राहू शकेल मात्र, पाण्याशिवाय एक क्षणही राहू शकणार नाही. सृष्टीतील सर्व सजीव पाण्यावरच जगतात. घर बांधण्यासाठीही पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व कळते. उन्हात तापून सगळी सृष्टी भाजून निघते. मात्र, पावसाने सारी सृष्टी पुन्हा जिवंत होते. तिला पुन्हा नवे जीवन मिळते म्हणूनच पाऊस पडायला लागला की, ‘आता जीवनमय संसार’ असे म्हणतात. पाण्याचे हे महत्त्व ओळखून आपण पाण्याची पूजा करतो. आजही नदी दिसली की, लोक तिला नमस्कार करतात, समुद्राला नारळ देतात, तसेच घरामध्येही ‘उदकशांत’ हा विधी करतात. निसर्गामध्ये पाणी जास्त आहे कारण पाणी हा निसर्गाचाच एक घटक आहे. खेड्या-पाड्यात, डोंगर-दर्‍यांत, सृष्टीसौंदर्य दृष्टीत पडते, कारण तेथे पाण्याचे जिवंत स्त्रोत असतात.
पूर्वी लोकसंख्या कमी होती, सुधारणाही झालेली नव्हती. त्यामुळे जंगलांची संख्याही जास्त होती. पाऊसही नियमित पडायचा. त्यामुळे पाणी सहज उपलब्ध होत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही स्थिती बदललेली आहे. लोकसंख्या भरमसाट वाढल्याने जंगले तोडून त्या ठिकाणी इमारती, उद्योगधंदे उभे राहिले आहेत. जंगले नष्ट केल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वातावरणात उष्मा वाढला आहे, पावसाचे चक्र बदललेले, वृक्षतोड केल्याने जमिनीतील जलस्त्रोत आटले आहेत, तसेच आज मोठ्या प्रमाणावर माणसाकडून पाण्याचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे आज पाण्याची कमतरता भासत आहे. नद्या, नाले, सरोवरे हे गाळाने भरल्यामुळे झर्‍यांची मुखेेे बंद झाली आहेत. पूर्वी सहज उपलब्ध होणारे पाणी आज बाटलीत बंदिस्त करून १५ ते २० रुपयांना विकले जात आहे.
आज पाण्याची चोरी होत आहे, पाण्याची पळवापळवी होत आहे. पाण्यासाठी आज भांडणे, मारामार्‍या होत आहेत. दूरवरच्या खेड्यापाड्यांत तर हिवाळा संपल्यापासून पावसाळा येईपर्यंत पाण्याचे प्रचंड हाल होत असतात. अन्नासाठी दाही दिशा, आम्हां फिरविशी जगदीशा या श्लोकाप्रमाणे पाण्यासाठी दाहीदिशा, आम्हां फिरविशी जगदीशा असे म्हणण्याची पाळी आली आहे. जमिनीत पाणी नसल्याने जमीन पडीक झाली आहे. या सर्वाला कंटाळून लोक गाव सोडून जात आहेत. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात गावे ओस पडतील अशी भीती वाटू लागली आहे. दुसरीकडे गावातील लोकांनी शहराकडे धाव घेतल्याने शहरात लोकसंख्या वाढत आहे. यामुळे त्या ठिकाणीही पाण्याच्या टंचाईला लोकांना सामोेरे जावे लागत आहे.
पावसाळ्यामध्ये डोंगरदर्‍यांवरून माती, पाचोळा मोठ्या प्रमाणात खाली पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येतो आणि तो ओहोळात, नद्यांत, तलावांत साठतो. परिणामी, पात्र उथळ बनते आणि पाणी वाहून जाते. म्हणून शासनाच्या मदतीने त्या त्या गावातील लोकांनी, स्वयंसेवी संस्थांनी नियमितपणे हा गाळ काढला तर तो काठावरच्या जमिनी सुपीक बनवील आणि झर्‍यांची मुखे उघडी राहून पात्रे खोल होऊन पाणीसाठे वाढतील.
आज पाणी वाचवायचे असेल तर नदी, नाले, सरोवरे तसेच डोंगर दर्‍यांतील झरे येथील गाळ काढणे आवश्यक आहे. झर्‍यांची मुखे उघडी राहिली तरच पाण्याची पातळी वाढेल. याबरोबरच जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, जेणे करून पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पूर्ववत होण्यास मदत होईल.
जंगल संपत्ती टिकवून ठेवून शक्य असेल तेथे वृक्ष लागवड केली, तर सावलीने पाण्याचे बाष्पीभवन तर कमी होईलच, पण पाऊस भरपूर व नियमित पडेल. वृक्षांची मुळे माती धरून ठेवतात. जमिनीची धूप त्यामुळे होणार नाही व झरे निर्माण होऊन ते जिवंत व प्रवाही राहतील. आज जर ही अवस्था आहे, तर आणखी काही वर्षांनी येणार्‍या पिढीसाठी पाण्याची ही समस्या किती तीव्र बनेल याचा अंतर्मुख होऊन विचार करून पाण्याचा अपव्यय न करता ते जपून वापरणे महत्त्वाचे आहे.
पाण्याचे हे महत्त्व, त्याची गरज आणि त्याचा गरजेनुसार पुरवठा, त्याचा होणारा अपव्यय आणि आहे ते राखणे आणि पुरवणे या गोष्टी आता प्रकर्षाने लक्षात आल्या आहेत. पर्यावरणाच्या असमतोलामुळेच पावसाचे प्रमाण घटले आहे. शिवाय त्यात अनियमितता आली आहे.
पाणी मिळण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे पाऊस. तोच आज बेभरवशाचा आणि अनियमित बनला आहे. जागतिक तापमान हळूहळू वाढतेच आहे. म्हणूनच या सार्‍या पार्श्वभूमीवर पाण्याचे जीवनातील स्थान सर्वांच्याच लक्षात येते आहे. प्रकर्षाने जाणवते आहे. त्यासंबंधीची जागृती करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जलदिन साजरा होतो. आपणही या दिनी निश्‍चय करूया की पाण्याचे आजच्या काळातील महत्त्व ओळखून योग्य ती पावले टाकूया!