पाटण्यात 23 जूनला विरोधकांची बैठक

0
2

केंद्रातील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटत असून, याच अनुषंगाने बिहारच्या पाटण्यात 12 जून रोजी होणारी विरोधकांची बैठक आता 23 जून रोजी होणार आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह बहुतांश विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, एम. के. स्टॅलिन, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, सीताराम येचुरी, डी. राजा, दीपंकर भट्टाचार्य या नावांसह डावे नेतेही सहभागी होणार आहेत.

नितीश कुमार यांच्या पुढाकाराने विरोधी ऐक्यासाठी ही बैठक होत आहे. यापूर्वी 12 जून रोजी बैठक होणार होती, परंतु या दिवशी अनेक नेते बाहेर असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकणार नव्हते. त्यामुळेच तारीख पुढे ढकलण्यात आली. विरोधी पक्षांना जोडण्यासाठी नितीश कुमार सप्टेंबर 2022 पासून देशभर प्रवास करत आहेत. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांचीही त्यांनी दिल्लीत भेट घेतली होती.