पाकिस्तानला धडा

0
18

या जन्मी केलेल्या पापाचे फळ याच जन्मी भोगावे लागते म्हणतात. पाकिस्तानच्या बाबतीत हे निश्चित खरे ठरू लागले आहे. जन्मापासून केवळ भारतद्वेषावर वाढलेली पाकिस्तान नामक ही विषवल्ली आज मात्र राजकीय, आर्थिक, नैसर्गिक, मानवनिर्मित अशा सर्व आघाड्यांवर समस्यांच्या गर्तेत सापडलेली दिसते. अलीकडेच निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवत पाकिस्तानला जबरदस्त तडाखा दिला. महापुराने पाकिस्तानच्या जवळजवळ एक तृतीयांश भूमीची वाताहत घडवली. शेती, अन्नधान्य, पशुधन, मत्स्यसंपदा अशा सर्व बाबतींत पाकिस्तानचे त्यात प्रचंड नुकसान झाले व त्याचा जबरदस्त फटका अर्थव्यवस्थेलाही बसला. या महापुरामुळे 3.7 अब्ज अमेरिकी डॉलरची हानी झाल्याचा अंदाज आहे. त्यानंतर पाकिस्तानात राजकीय अराजक आले. इम्रान खानचे डामडौलात आलेले सरकार पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आणि राजकीय अस्थिरतेत पाकिस्तानच्या प्रशासनाचा फज्जा उडाला. राजकारणी आणि नोकरशहांच्या बेबंदशाहीत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे मातेरे झाले आहे. जवळजवळ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर तो देश आज उभा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे पुढील कर्जासाठी गयावया करीत राहण्यापलीकडे त्याच्या हाती आज काही नाही. घनिष्ठ मित्र असलेले सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीसारखे देश आता त्याच्याशी हात राखून वागू लागले आहेत. मित्रवर्य चीन स्वतःच कोविडोत्तर आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यात चिनी कंपन्यांचा पाकिस्तानातील अनुभव चांगला नाही. चायना – पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर 2013 साली कार्यान्वित झाला. परंतु त्यात गुंतवणूक केलेल्या चिनी कंपन्यांना पाकिस्तानकडून परतावाच मिळेनासा झाल्याने त्या प्रचंड नाराज आहेत. ऊर्जेसारख्या क्षेत्रात मोठ्या परताव्याच्या आशेने उतरलेल्या त्या कंपन्यांची पार निराशा झाली आहे. आर्थिक रसदीअभावी चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरची कामे थंडावली आहेत.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था तर सर्व आघाड्यांवर आणि सर्व मोजमापांवर कमकुवत असल्याचे स्पष्ट होते. अलीकडेच पेट्रोलच्या दरांत तब्बल साडे बावीस रुपयांची वाढ करून तो 272 रुपये प्रति लीटरवर नेऊन ठेवण्याची पाळी पाकिस्तानवर ओढवली. इतक्यावर ही समस्या संपलेली नाही. लवकरच पाकिस्तानला पेट्रोल डिझेलचे रेशनिंग सुरू करावे लागेल अशी चिन्हे आहेत, कारण चालू खात्यातील तूट 0.2 अब्ज डॉलरवर आलेली आहे. विदेशी कर्जाचे हप्ते थकत आहेत. पाकिस्तानी रुपयाचे सातत्याने अवमूल्यन चालले आहे. महागाई निर्देशांक डिसेंबर अखेरीस गतवर्षीच्या 12.3 टक्क्यांच्या जवळजवळ दुप्पट म्हणजे 24.5 टक्क्यांवर गेलेला होता अशी भीषण परिस्थिती आहे. पाकिस्तानचा विदेशी चलन साठा केवळ 4.34 अब्ज डॉलरचा आहे. फेब्रुवारी 2014 नंतरचा हा नीचांक आहे, यावरून पाकिस्तानच्या सद्यस्थितीची कल्पना यावी. जनता प्रचंड नाराज आहे. गेल्या महापुरानंतर बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तुनख्वामध्ये अन्नधान्यासाठी दंगली झाल्या होत्या. आता पेट्रोल डिझेलसाठी दंगली होण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन दशकांतील सर्वांत कठीण परिस्थितीतून सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था चालली आहे.
भारताविरुद्ध दहशतवादाला सदोदित खतपाणी घालत आलेल्या पाकिस्तानला आता स्वतःच दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. पेशावरपाठोपाठ कराचीच्या पोलीस मुख्यालयावर नुकताच भीषण दहशतवादी हल्ला झाला. तेहरिक इ तालिबान पाकिस्तान त्या देशाच्या जिवावर उठलेली आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिला अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीचा पाठिंबा असल्याची चर्चा खुद्द पाकिस्तानात सुरू झाली आहे. एक काळ होता, जेव्हा तालिबानचे पान पाकिस्तानशिवाय हलत नसे. पाकिस्तानचे लष्कर, आयएसआय तालिबानला सर्वतोपरी मदत करीत असे. परंतु अफगाणिस्तानमध्ये सत्तारूढ झाल्यापासून तालिबानचा नूरच बदलला आहे. एकीकडे हक्कानींसारखे पाकिस्तानचे चाहते तेथे सत्तेत असले, तरी तालिबानचे विद्यमान प्रमुख मुल्ला हिबातुल्ला अखुनझादा पाकिस्तानची लुडबूड सहन करणारे नाहीत. पाकिस्तानला त्यांनी इस्लामविरोधी ठरवून टाकले आहे. अमेरिकेला खूष करण्यासाठी तेहरिक इ तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेविरुद्ध पाकिस्तान सरकारने झर्ब ए अज्ब ही मोहीम राबवली होती. आता अमेरिका अफगाणिस्तानातून गेल्यापासून ती पाकिस्तानवर सूड उगवू लागली आहे. एकूण पाकिस्तानचे दिवस भरले आहेत. इतरांविरुद्ध कटकारस्थाने करीत आलेल्या त्या देशाला आता स्वतःच्याच कर्माची फळे भोगावी लागत आहेत.