पाऊस निथळतो दारी….

0
16
  • राधा भावे

आणि एक दिवस तो येतो… वाजत गर्जत!! काळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजा, आणि मग एका मंगल क्षणी पाऊसधारांचं बेभान कोसळणं… किती विलक्षण, किती देखणा असतो तो सोहळा!! डोळ्यांना निववणारा, मनाला हर्षवणारा विलोभनीय उत्सव! काही क्षणातच भोवतालाचं रूप बदलतं. पावसाकडे पाहताना आवेग, उत्कटता यांचा अर्थ कळू लागतो… मातीच्या आतली आतुरता, ओढ, उत्कंठा समजून येते. झाडे-वेली भिजू, निथळू लागतात. अधिक देखणी, अधिक प्रसन्न दिसू लागतात. मृदगंधाने आसमंत भरून जातो. बघता बघता वातावरणात आनंदाची, संतोषाची लहर पसरू लागते. साऱ्या जीवसृष्टीला आपली प्रतीक्षा फळाला आल्याचे समाधान मिळते…

पाऊस… तो येणार आहे हे नक्की असतं. तरी त्याच्या येण्याची वाट पहिली जाते, अंदाज बांधले जातात. त्याच्या न येण्यामुळे अस्वस्थता येते, वैताग व्यक्त केला जातो. त्याची वाट पाहणाऱ्या माणसांच्या मनातच नव्हे तर अवघ्या चराचर सृष्टीत एक प्रकारची हुरहूर, व्याकुळता दाटून आलेली असते. ‘कधी येणार हा? लौकर येईल तर बरं… ये ना रे एकदाचा!’ असे उद्गार निघत असतात. काही काळानंतर त्याच्या बेभान बरसण्याचा कंटाळा येऊन तो नकोनकोसा होणार असला तरी त्याचं दरवर्षीचं पहिलं-वहिलं येणं, बरसणं सर्वांनाच हवंहवंसं वाटत असतं.
सरत्या वैशाखातील कडक उन्हे, उष्ण झळा, आटत चाललेल्या विहिरी, झरे, नदी-नाले, सुकत चाललेली माती, मरगळलेली झाडे-पाने, वाढत चाललेला रखरखाट यातून सर्वांनाच सुटका हवी असते.

गावांमध्ये उन्हाळी कामे आटोपलेली असतात. पापड, सांडगे, कुरड्या, डाळी आणि इतर वाळवणे यांना पुरेसं ऊन मिळालेलं असतं. घराची शाकारणी उरकलेली असते. लाकूड-फाटा गोळा करून झालेला असतो. शेतीची सुरुवातीची जुजबी कामे आटोपलेली असतात. आता फक्त भरून आलेले काळे ढग दिसावेत… वारा सुटावा… विजा कडकडाव्यात अन्‌‍ पावसाच्या धारांनी, मातीच्या वासाने आसमंत भरून जावा, हीच इच्छा मनामनात मूळ धरू लागते. शहरात रणरणते उन्ह, असह्य उकाडा, घामाच्या धारांनी कावलेली शरीरं अन्‌‍ मनं, यातून आलेली बेचैनी- ‘पाऊस हवा’, ‘पाऊस हवा’ घोकत असतं.
पाऊस मोठ्यांना हवा वाटतो तसा छोट्या मुलांनाही. अगदी ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का?’ या गाण्यात दडलेला खूप पाऊस पडावा, त्यामुळे शाळेला सुट्टी मिळावी हा सुप्त हेतू आजकालच्या मुलांमध्ये फारसा आढळत नसला तरी पावसाविषयीची नैसर्गिक ओढ त्यांच्यात नक्कीच असते. पहिल्या पावसात भिजण्याची, रिमझिमणाऱ्या सरींमध्ये खेळण्याची, कागदी होड्या बनवून वाहत्या पाण्यात सोडण्याची आस त्यांनाही पावसाची वाट पाहायला लावते…
तरुण मनं तर ऐन पावसातही व्याकुळ होणारी! मग वाढत्या उन्हाळ्यात त्यांना पावसाची आत्यंतिक ओढ वाटली नाही तरच नवल! पावासाशी जुळलेल्या काही हळव्या आठवणी, त्याच्या चाहुलीने मनात उठणारे प्रेमाच्या, विराहाच्या, मीलनाच्या जाणिवांचे काल्पनिक काहूर तरुण मनाला वेढून टाकत असते. ही हवीहवीशी भावस्पंदने जागं करणारा पाऊस म्हणूनच लवकर यावा अशी त्यांची इच्छा असते. एकदाचा पाऊस यावा आणि…
पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली…
(संदीप खरे)
किंवा
आला पाऊस मातीच्या वासात गं
मोती गुंफित मोकळ्या केसांत गं
(शांता शेळके)
असे काहीतरी गुणगुणायला मिळावे असे त्यांना वाटत असते.
या आधी अनुभवलेला पाऊस, मागच्या अनेक पावसाळ्यातल्या घटना, आठवणी यांच्यावर चर्चा करत, कधीचा तरी लांबलेला, दुरावलेला पाऊस किंवा त्याचे धो-धो कोसळणे, नद्या-नाल्यांना आलेला भयावह पूर, त्यामुळे झालेलं नुकसान यावर बोलत राहणारी वयोवृद्ध माणसेही आतुरतेने पावसाची वाट पाहत राहतात.
मुळात पाण्याची खासियतच ही की त्याचा आवाज, दर्शन, स्पर्श… सारेच मनात आनंदलहरी उठवणारे! त्यामुळे पावसाच्या रूपात अवतरणाऱ्या पाण्याचे आकर्षण सर्वांनाच वाटत असते. त्यातही मनात सृजनाचे अंकुर रुजवणारा हा पाऊस कलावंतांना विशेष प्रिय असतो. तो यावा, भेटावा ही ओढ आणि उत्कंठा ग्रीष्म ऋतूच्या आगमनाच्या चाहुलीबरोबरच मनात भिरभिरत असते.
पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा
(शांत शेळके)
या अनुभवासाठी कविमने आतुर असतात किंवा मग ‘श्रावणात घननीळा बरसला…’ या गाण्यात वर्णन केलेला पाऊस प्रत्यक्ष पाहण्यासाठी उत्सुक असतात.
पाऊस येणारच आहे… त्याचा म्हणून ऋतू असतो.. हे सर्वांना माहीत असतं, आणि तरीही ‘तो नाहीच आला तर?’ अशी कल्पना करून जीव शिणवणारी मंडळीही असते. ती व्यक्ती जर शिक्षकी पेशातील असेल तर निबंधलेखनासाठी ‘पाऊस पडलाच नाही तर!’ असा विषय देऊन विद्यार्थ्यांना या कल्पनेच्या जाळ्यात अडकवून टाकते आणि स्वतः निवांतपणे पावसाची वाट पाहत बसते. मग मुलेही पाऊस ही कशी हवामानविषयक घटना आहे, वातावरणातील ढगातील द्रवीभवन होऊन किंवा हवेतील आर्द्रता संपृक्त झाल्यामुळे पाऊस पडतो वगैरे लिहू लागतात. पाऊस हा मानवी जीवन, पशुपक्षी, झाडेवेली यांच्यासाठी किती आवश्यक आहे याचे वर्णन करतात. तो पडलाच नाही तर पाणीटंचाई कशी होईल, शेती सुकून जाईल, अन्न-उत्पादनात समस्या निर्माण होतील, दुष्काळ पडेल, माणसांच्या अन्‌‍ इतर सजीवांच्या जगण्यावर कसा दुष्परिणाम होईल, समाजात आर्थिक प्रश्न कसे उभे राहतील याविषयी थोड्या पुस्तकी, थोड्या ऐकीव आणि अल्पशा अनुभवाच्या आधारे भरभरून लिहितात. आणि मनात असले काही कधीच घडू नये अशी प्रार्थना करत पावसाची वाट पाहतात किंवा मग पडत असलेल्या पावसाचा आनंद घेतात.
खरे तर पूर्वी पावसाचे म्हणून एक वेळापत्रक होते. वर्षभरातील मृग नक्षत्रापासून हस्त नक्षत्रापर्यंतचा काळ हा पावसाळा. या दरम्यान पाऊस येणारच. नक्षत्र बदलेल तसे त्याचे स्वरूप, जोर बदलायचा. कधी तो रिमझिमणार, तर कधी धो-धो कोसळणार! कधी अचानक दडी मारणार तर कधी सर्वांचा अंदाज चुकवून धुंवाधार कोसळणार. कधी त्याच्या अखंड आषाढधारा, तर कधी श्रावणातल्या उन्हाशी रंगणार लपाछपीचा खेळ. कधी तो हळुवार तर कधी त्वेषाने येणारा, संतप्त वाटणारा. परंतु या साऱ्यालाही एक मर्यादा होती, ठरलेल्या काळाची चौकट होती. त्याची ही विविधरंगी रूपं मनाला भुलवणारी, हवीहवीशी वाटणारी, सवयीची असणारी होती.
आजकाल त्याचा रंग-ढंग बदलला आहे. लहरीपणा वाढलेला आहे. तो पूर्वापार चालत आलेली गणिते अन्‌‍ अंदाज हमखास चुकवतो. त्याला हल्ली रोग जडलेला आहे, नको तिथे अतिवृष्टी करण्याचा आणि जिथं त्याची गरज आहे तिथं दिवसाचे दिवस कोरडे जाऊ देण्याचा. अतिवृष्टी अन्‌‍ अनावृष्टीच्या त्याच्या लहरी फेऱ्यात अवघी जीवसृष्टी भरडून निघतेय. कधी अवेळी तर कधी नको तेवढा कोसळून तो सर्वांची दाणादाण उडवून देतो. नद्या दुथडी भरून वाहू लागतात. महापुरात गावच्या गावं बुडून जातात. शेतांची, बागायतींची, अन्नधान्यांची नासाडी होते. दरडी कोसळतात, वाहतूक यंत्रणा कोलमडते, वीजपुरवठा ठप्प होतो, रोगराई पसरते, माणसं हताश होतात… अल्प प्रमाणातल्या किंवा नुसत्याच हुलकावण्या देणाऱ्या पावसामुळे कोरडा दुष्काळ पडतो. इथंही माणसं हतबल होऊन त्याचीच आळवणी करतात, त्याचीच वाट पाहत असतात.

‘नेमेचि येणाऱ्या पावसा’चे हे बदलते रूप, निसर्गचक्राच्या गतीत पडलेला फरक ही मुळात मानवजातीने भोवतालच्या पर्यावरणावर चालवलेल्या आक्रमणाची, अत्याचारांची निष्पत्ती आहे हे तसे सर्वांना कळते. परंतु वळत मात्र नाही!
एक खरे, या भौतिक जगातील, जगण्याच्या अनेक आघाड्यांवर त्याची साथ अत्यंत आवश्यक आहे हे सर्वांनी जाणलेलेच आहे, म्हणूनच कदाचित मानवी मनात, त्याच्या भावविश्वात पावसाला अढळ स्थान आहे.

या पावसाळी ऋतूत साजरे होणारे सणवार-उत्सव, त्यांतून जपली जाणारी आपली संस्कृती, मनावर होणारे संस्कार, मिळणारा आनंद, समाधान या साऱ्यांचे गाठोडे आपण मनाच्या तळघरात जपलेले असते. पाऊस सुरू झाला की भावतालात होणार असलेल्या बदलाची कल्पनाचित्रेही खूप सुखद वाटतात. पाऊसकाळात मिळू शकणारा निवांतपणा, पाऊस काळातील भेटी-गाठी, गप्पा-टप्पा, सणवार, उत्सव, सोहळे.. ती नजरेला जाणवणारी आसमंतातील शीतलता, तनामनाला जाणवणारा थंडावा… या साऱ्याची ओढ वाटते, म्हणूनच वैशाख वणाव्याची धग जाणवू लागली की प्रत्येकाचेच मन म्हणू लागते ‘कधी येणार हा पाऊस?’
पाऊस… तो येणारच असतो… परंतु आपला आवडता पाहुणा आपल्याला हवा तेव्हा, अगदी लौकरात लौकर यावा असे वाटत असते. तसेच जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसा पाऊस-पाहुण्यासाठी आतुर होऊन कुणी मोठ्याने, तर कुणी मनात – ‘ये रे ये रे पावसा’ गुणगुणू लागतो.
आणि एक दिवस तो येतो… वाजत गर्जत!! काळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजा, आणि मग एका मंगल क्षणी पाऊसधारांचं बेभान कोसळणं… किती विलक्षण, किती देखणा असतो तो सोहळा!! डोळ्यांना निववणारा, मनाला हर्षवणारा विलोभनीय उत्सव! काही क्षणातच भोवतालाचं रूप बदलतं. पावसाकडे पाहताना आवेग, उत्कटता यांचा अर्थ कळू लागतो… मातीच्या आतली आतुरता, ओढ, उत्कंठा समजून येते. झाडे-वेली भिजू, निथळू लागतात. अधिक देखणी, अधिक प्रसन्न दिसू लागतात. मृदगंधाने आसमंत भरून जातो. ‘नभ विरघळते अन्‌‍ हरखून जाते धरा’ या राधा भावे यांच्या ओळींची अनुभूती येते. बघता बघता वातावरणात आनंदाची, संतोषाची लहर पसरू लागते. साऱ्या जीवसृष्टीला आपली प्रतीक्षा फळाला आल्याचे समाधान मिळते. अशा सुखावल्या क्षणी मन गाऊ लागते-
पाऊस वाजतो दारी
हलकेच निथळती सूर…
पाऊस छेडतो ताना
वाऱ्याची घेऊन साथ
(वैभव जोशी)
आणि आपण निसर्गाच्या त्या विलोभनीय आविष्काराचा आनंद घेण्यात रमून जातो.