पर्वरीतील नूतनीकृत ‘मंत्रालया’चे उद्घाटन

0
7

काल पर्वरी येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात नूतनीकृत ‘मंत्रालया’चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पर्वरी येथील पूर्वीच्या मिनिस्टेरिअल ब्लॉकचे नूतनीकरण व विस्तार करण्यात आला असून, काल त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. घटक राज्यदिनाचे औचित्य साधून उद्घाटन केलेल्या या ब्लॉकचे यावेळी ‘मंत्रालय’ असे नामकरण करण्यात आले आहे.
या ब्लॉकच्या तिसऱ्या मजल्यावर 10 कोटी 25 लाख रुपये खर्चून मुख्यमंत्र्यांसाठी सुसज्ज व शानदार असे नवे कार्यालय तयार करण्यात आले आहे. जीएसआयडीसीमार्फत कंत्राटदाराने हे काम केले आहे.

पुढील 50 वर्षांचा विचार करुन मुख्यमंत्री कार्यालयाची बांधणी करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या सुसज्ज कार्यालयाचा विविध कामांसाठी येणाऱ्या जनतेलाही चांगली सेवा देण्यासाठी फायदा होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या कार्यालयाची बांधणी करताना गोव्याची संस्कृती आणि गोव्याचा वारसा यांचा विचार करण्यात आला असून, तेच नजरेसमोर ठेवून तेथील शिल्पे तयार करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले. कंत्राटदाराचे कौतुक करतानाच पुढील काळात मंत्रिमंडळ बैठका मंत्रालयातच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय सरकारी खात्यांसंबंधीच्या सर्व बैठका व अन्य बैठकाही याच कार्यालयात होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

विरोधकांचा बहिष्कार
सर्व विरोधी आमदार व विरोधी पक्षांनी काल मंत्रालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मंत्रालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्ही सर्व 40 ही आमदारांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमत्रंण पाठवले होते; पण विरोधी पक्षांचे आमदार व नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘प्रशासन स्तंभा’ची 2 महिन्यांत पायाभरणी

पाटो-पणजी येथील प्रस्तावित ‘प्रशासन स्तंभ’ या राज्य प्रशासनासाठीच्या टोलेजंग इमारतीची पायाभरणी येत्या दोन महिन्यांत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
राज्य सरकारचे प्रशासन या इमारतीतून चालणार असून, ही इमारत पणजी शहरातील सर्वांत उंच व मोठी इमारत ठरणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रशासन स्तंभ इमारतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली होती; मात्र या गोष्टीला दोन वर्षे उलटूनही अद्याप या इमारतीची पायाभरणी झालेली नाही. ही पायाभरणी आता पुढील दोन महिन्यांत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, प्रशासन स्तंभ इमारत साकारल्यानंतर सर्व सरकारी खात्यांची कार्यालये या इमारतीत हलवण्यात येणार आहेत.