>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती
ज्यांना पर्यटन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी सरकारने सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी कक्ष पुनरुज्जीवीत केला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. गोव्याला भारताची पर्यटन राजधानी बनवण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करीत असून, त्यासाठी सरकार वरील प्रकारचे नवे प्रयोग करू पाहत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ पुनीत चटवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
ताज हॉस्पिटॅलिटी समूहाशी आमची चर्चा सुरू आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात. तसेच या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला तेजी यावी यासाठी सरकारचे प्रयत्न चालू असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
गोवा ही भारताची पर्यटन राजधानी व्हावी, यासाठी राज्यात पर्यटन साधनसुविधांमध्ये मोठी वाढ केली जात असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पर्यटन क्षेत्रात खासगी व सार्वजनिक सहभागाने पर्यटनविषयक प्रकल्प उभे राहावेत, यासाठी देखील प्रयत्न होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.