- डॉ. सोमनाथ कोमरपंत
देवा, तू देणारच असशील तर वरून तुझ्या कृपेच्या धारा अविरत कोसळत राहतील असं काहीतरी कर. तुझ्या कृपासिंधूच्या वर्षावामुळे नदी-नद-नाले ओतप्रोत भरून वाहू देत. वृक्षांना कधीपासून विळखा घालून बसलेल्या वल्लरी रोमांचित होऊन सचैल स्नान करू देत. साक्षात सिंधूच्या लहरी अन् लहरी प्रेमरसानं उचंबळून येऊ देत. तृृषार्थ धरतितल ओलंचिंब होऊ दे. सारे तृप्त होऊ देत. सृष्टीचा अणुरेणू, रंध्र-रंध्र तृप्तीच्या गंधाने भरून जाऊ दे.
सृष्टीच्या अंकावर, अंगप्रत्यंगावर उधळलेले पावसाचे टपोरे थेंब ही जगातील प्राणिमात्रांना अन् माणसांना शांतविणारी, प्रसन्न करणारी अपूर्व चीज आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ हे नित्याचे सूत्र असूनही आपण सारे त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. समजा आपण परमेश्वराकडे प्रार्थना करायला बसलो आणि तो आमच्यावर प्रसन्न झालाच तर आपण त्याच्याकडे सर्वप्रथम काय मागू?
“देवा, सध्या तरी दुसरं तिसरं काही देऊ नकोस! वर देणारच असशील तर वरून तुझ्या कृपेच्या धारा अविरत कोसळत राहतील असं काहीतरी कर. तुझ्या कृपासिंधूच्या वर्षावामुळे नदी-नद-नाले ओतप्रोत भरून वाहू देत. वृक्षांना कधीपासून विळखा घालून बसलेल्या वल्लरी रोमांचित होऊन सचैल स्नान करू देत. साक्षात सिंधूच्या लहरी अन् लहरी प्रेमरसानं उचंबळून येऊ देत. तृृषार्थ धरतितल ओलंचिंब होऊ दे. सारे तृप्त होऊ देत. सृष्टीचा अणुरेणू, रंध्र-रंध्र तृप्तीच्या गंधाने भरून जाऊ दे. असा असतो पाऊस! असा हा किमयागार पाऊस! इथं पाऊस, तिथं पाऊस, सर्वत्र पाऊस अशी ओथंबलेपणाची पाऊसस्थिती व्हावी. या आनंदघटिकेला विविध पक्ष्यांनी आपापल्या मंजुळरवाने ‘सिंफनी’ योजावी.
हे सारे सूर जमून येण्यासाठी ये पावसा, ये!”
चातकचोचीची असोशी लेवून मल्हारधून आळवायला कुणाला बरे आवडणार नाही? नवेपणाचे नवे पाणी चाखायला सारेच सज्ज असतात… सर्व जामानिमा आवरून! काय ती लगबग? विचारूच नका! घरांची कौलं परतविणं… ‘खोपीं’वर करड निगुतीनं अंथरणं… फुलझाडांची निगराणी नीट व्हायला हवी म्हणून संरक्षक कवच असलेलं कुंपण कळकाचे उभे-आडवे खुंट/वासे लावून त्यांचा बंदोबस्त करणं… इत्यादी… इत्यादी.
आणि शेवटी एका नितांतरमणीय प्राजक्तपहाटेला प्राजक्तफुलांच्या सड्याबरोबर पावसाचा सडा पडून गेलेला असतो… तोही नकळतच!
चिंब भिजलेली
रानं सजलेली
ओलेत्या घनांनी
आरास मांडलेली
पानापानांच्या कानामनांत पावसानं असं निजगुज पोचविलेलं असतं. सृष्टिमानसातील हा ‘एल्गार’ इतमामानं साजरा झालेला असतो. या अननुभूत आनंदाच्या ऊर्मी सृष्टीत उचंबळून येताना आसमंतात नाना ध्वनींची ही गर्दी जमलेली असते… अजूनही नाना रंगविभ्रमांची दाटीवाटी होण्याची हमी सृष्टी देत असते. आसमंतात होणारा चित्ररंगांचा हा चित्कार म्हणजे नवनवोन्मेषशालिनी चित्कळेची अनाहत धून असते… हाक असते.
पाऊस म्हटला की पावसाच्या आठवणी या आल्याच… भूतकाळ आला… पाठ्यपुस्तकांतील कवितांनी निर्माण केलेलं निरागस भावविश्व आलं. सर्वप्रथम ओठावर येतात चिरपरिचित ओळी ः
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
अत्यंत साध्याभोळ्या शब्दांत पावसाचा आर्त जनांनी केलेला हा धावा. त्यानं यावं म्हणून त्याला पैशाचं आमिष दाखवलं आहे, पण तो पैशाच्या मोहानं बधतो थोडाच! त्याची पृथ्वीतलावर सहस्रधारांनी कोसळण्याची आदिप्रेरणा अनामिक स्वरूपाची. त्याचं रुसणं अथवा धुवांधार कोसळणं हे केवळ त्याच्या मर्जीवर… तो स्वतःच्या मस्तीतच जगत असतो. माणसं कशीही वागली तरी… तो यायच्या वेळेलाच येतो. कारण तो आदिमही आहे अन् अंतिमही आहे. टपोरेपण हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण… नित्यनूतनत्व हा त्याचा स्थायी भाव… तो सृष्टीला नवा तजेला आणतो… नवी उभारी आणतो. माणसांमध्ये नवचैतन्य निर्माण करतो. सृजनशीलतेची प्रेरणा देतो. त्याची ही शुभंकर, प्रसन्नचित्त रूपकळा कुणालाही भावणारी… पाऊस ज्यांना प्रिय वाटत नाही अशी माणसं जगाच्या पाठीवर फार थोडी! त्याचे पानापानांवरचे स्फटिकवत थेंब पाहिले की मनीवनींचा दाह क्षणार्धात मिटतो. म्हणून अनादिकालापासून त्याची प्रतीक्षा ही निरंतर स्वरूपाची.
त्याच्यासाठी केलेल्या प्रार्थनेत पावित्र्य असतं… वृत्तिगांभीर्य असतं… त्याच्या केलेल्या आर्जवात रसलीन भावनांचा कल्लोळ असतो… हे भावनाशालित्व शब्दांत व्यक्त होत राहातं खरं… पण ही अनुभूती खरं पाहायला गेल्यास शब्दातीत असते. सारेजण नुसते शब्दांचे बुडबुडे निर्माण करतात. खरा तोच असतो! तो भिजवतो… ओलाचिंब करतो… परमकारुणिकाच्या अश्रूंची आठवण सतत करून देतो. हा करुणाघन कसा? फक्त धावून येणारा! तो श्यामघन! आपल्या आवडत्या, सत्त्वशील आणि मनस्विनी पृथ्वीसाठी… त्याच्यासाठी ती द्रौपदीच असते… तिचा कृष्णसखा कधी वस्त्रहरण होऊ देत नाही… कारण तो धात्रा आहे… त्राता आहे… ‘त्राहि माम्’ म्हणताक्षणीच तत्काळ धावून येणारा… सृष्टीमध्ये तो मोरपीस फिरवतो तो उगाच का? मुरलीरवानं संतुष्ट करतो… चराचराची पुष्टी-तुष्टी त्याच्यावरच अवलंबून असते… सृष्टी न्हाते त्याच्याच चिरप्रसन्न लयीबरोबर… नृत्यगतिशील पर्जन्याची ही कला रूपमनोहर असते… अन् होतेही!
अनेक लेखक-कवींनी आजवर पर्जन्यदेवतेला आवाहन केलं, सामगायन केलं. पर्जन्याच्या पाणीदारपणाबरोबर त्याचं तेजस्वी रूपही तितकंच प्रभावी… प्रज्वलित रूपकळाही तेवढीच सामर्थ्यवान… कारण मेघाच्या नादनिनादाबरोबर विद्युतही आपलं प्रमाथी रूप घेऊन येत असते. ‘पर्जन्य’ या संवेदनगर्भ शब्दात मला त्याच्या प्रज्वलिततेचे स्मरण होते… पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या विविध घटकावयवांनी या विश्वलयीचं संघटन व्हावं हा एक विलक्षण स्वरूपाचा समष्टियोग आहे. विशेष लक्षणांनी युक्त ते विलक्षण! म्हणून ते विलोभनीयदेखील!
अनेकांनी अनेक गोष्टी वर्णिल्या तरी पावसाचं खरं संवेदन जाणवलं ते कविकुलगुरू कालिदासालाच! ‘मेघदूत’च्या ‘पूर्वमेघ’मध्ये तो म्हणतो ः
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं।
वप्रक्रीडापरिणतगज प्रेक्षणीयं ददर्श॥
- आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो तर शिखरावर मेघ वाकलेला! जणू काही तटभिंतीवर क्रीडेसाठी आतुर असलेला गज उभा ठाकलेला!
किती समर्पक उपमा या उत्तुंग प्रतिभाशाली कवीने या ठिकाणी योजलेली आहे. ‘उपमा कालिदासस्य’ ही उक्ती येथे पूर्णत्वाने प्रत्ययास येते. पाऊस हा प्राणिमात्रांचा सखा आहे. तो वेळच्या वेळी यायला हवा. म्हणूनच आपल्या पूर्वसूरींनी, ऋषिमुनींनी आपल्या ऋचांमधून, उपनिषदादी आर्ष ग्रंथांमधून परमेश्वराला प्रार्थिलेले आहे. ही पृथ्वी सस्यशालिनी व्हावी, हा देश क्षोभरहित व्हावा, समाज निरामय व्हावा आणि सर्वजण सुखी व्हावेत अशी प्रांजळ आणि पारदर्शी शब्दांत विनवणी केली आहे. ज्ञानदेवांनी देश-काल-परिस्थितीनुसार ‘प्रसाददान’ अथवा ‘पसायदान’ मागितले. विश्ववाङ्मयातील शाश्वत सूक्त म्हणून ते गौरविले गेले. मानवतेचा ध्यास या अक्षय वाणीत आहे. तसाच उपरोल्लिखित प्राचीन वाङ्मयातदेखील समर्थ आशय आहे. काळ कोणताही असो. माणसाचे हृदयस्पंदन तेच असते, आशा-आकांक्षा अन् निःश्वसिते तीच असतात. काव्यातून या समष्टिचिंतनाला अंतःसूर लाभत असतो.
समर्थ रामदास हे विजनवासात रममाण होणारे, लोकान्तामधील एकान्त सेवन करणारे संन्यासमार्गी योगपुरुष. पण ते जीवनातील रसमयतेचे थोर उपासक होते. ते सज्जनगडावर राहायचे. ‘दास डोंगरीं राहतो। चिंता विश्वाची वाहतो।’ असे आत्मप्रत्ययशील शब्दात त्यांनी स्वतःच म्हटले आहे. नियमित आणि समृद्ध पावसाचा, महाराष्ट्रदेशीच्या घनदाट, समृद्ध रानावनांचा तो प्रदेश! शिवथर घळीतील तुडुंबलेल्या जळाचं आणि मुसळधार पावसाचं रामदासांनी तन्मयतेनं केलेलं वर्णन रसिकमनं लुब्ध करणारं आहे. ‘गिरीचे मस्तकीं गंगा’ या आपल्या रचनेत ते उद्गारतात ः
गिरीचे मस्तकीं गंगा तेथुनी चालिली बळें।
धबाबां लोटल्या धारा धबाबां तोय आदळे॥
गर्जतो मेघ तो सिंधु ध्वनिकल्लोळ ऊठिला।
कड्यासी आदळे धारा वाता-आवर्त होतसे॥
तुषार उठती रेणु दुसरे रज मातले।
वातमिश्रित ते रेणु सीतमिश्रित धूकटें॥
दराच तुटला मोठा झाडखंडें परोपरीं।
निबीड दाटली छाया त्यामधे ओघ वाहती॥
गर्जती श्वापदें पक्षी नाना स्वरें भयंकरें।
गडद होतसे रात्री, ध्वनिकल्लोळ ऊठती॥
कर्दमु निवडेना तो, मनासीं सांकडें पडे।
विशाळ लोटली धारा तीखालें रम्य वीवरें॥
महाभारताचा समर्थपणे आणि सरसरमणीय अनुवाद करणारे मुक्तेश्वर- अर्थात संतश्रेष्ठ एकनाथ यांचे नातू- यांनी वर्षाकाळाचे नितांत मनोहर वर्णन केले आहे. त्यातील चित्रमयता प्रत्ययकारी आणि मन लुब्ध करणारी आहे.
सूर्यकिरण मृगसमुदाय। निस्तेज होऊनी पावले भय।
लपावया शोधीत ठाय। अभ्रें आड करूनियां॥1॥