पराभवाच्या कारणाची कल्पना नाही : कामत

0
19

आपण नवी दिल्ली दौर्‍यावर असल्याने मडगाव नगरपालिका मंडळाच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला, याची आपणाला कल्पना नाही. आता आपल्या सोबत आलेले भाजप समर्थक सर्व १५ नगरसेवक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आले आहेत. मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

आपणाला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी साहाय्य करणार्‍या भाजपच्या केंद्रातील चार ते पाच नेत्यांचे आभार मानण्यासाठी तातडीने नवी दिल्ली येथे गेलो होतो. आपल्या अनुपस्थितीत कोणत्या गोष्टी घडल्या याची कल्पना नाही. पहाटेच्या वेळी आपण गोव्यात परतलो. मला कोणावरही संशय नाही, असेही कामत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला १५ नगरसेवक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर एक तातडीची बैठक आल्तिनो-पणजी येथे काल घेतली. या बैठकीला आमदार दिगंबर कामत आणि मडगाव नगरपालिकेच्या भाजप समर्थक १५ नगरसेवकांची उपस्थिती होती. मात्र, मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला दहाच मते मिळाली. त्यामुळे या पराभवाचे नेमके कारण काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.