परमात्मा आणि गर्भसंस्कार

0
29

योगसाधना-589, अंतरंगयोग- 174

 • डॉ. सीताकांत घाणेकर

या सर्व संस्कारांत आत्म्याचे परमात्म्याकडून मिळालेले संस्कार सर्वांवर सारखेच आहेत. पण इतर संस्कारांचा त्यांवर परिणाम होऊन ती व्यक्ती सज्जन अथवा दुर्जन बनते. त्याचा परिणाम त्याच्या आत्मशक्तीवर होतो.

भगवंताने अत्यंत कष्टाने व कल्पकतेने बनवलेले विश्व अफाट आहे. सुंदर पण तितकेच गूढही आहे. विविधतेमुळे विपुल आहे. त्याने छान निसर्ग बनवला. त्यात डोंगर, पर्वत, नदी, नाले, समुद्र आहे. त्याचबरोबर अनेक वृक्ष-वनस्पती, कृमी-किटक, जीव-जंतूदेखील आहेत. तसेच कित्येक प्रकारचे पक्षी, पशु-प्राणीसुद्धा दिसतात. आणि शेवटी त्याची उत्कृष्ट कलाकृती म्हणजे मानव!
मानवांतदेखील विविधता. देश, राष्ट्र, वंश, वर्ण, रंग, लिंग… त्याचबरोबर भिन्न-भिन्न संस्कृती, भाषा, रीतीरिवाज, संस्कार व स्वभाव. त्यातच भर म्हणून अनेक धर्म. करोडो वर्षे हे विश्व भगवंत सांभाळत आहे.
ठिकठिकाणी लहान-मोठे मतभेद, लढाया, युद्धे चालूच आहेत. याचे मूळ कारण म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे संस्कार; तेही अनेक जन्मांचे. कारण भारतीय संस्कृती पुनर्जन्म मानते. या तत्त्वज्ञानाप्रमाणे परमात्म्याकडून निघालेला आत्मा आपल्या कर्माप्रमाणे एका विशिष्ट शरीरात जन्म घेतो. गर्भरूपात त्याची त्या शरीरात वाढ होते. तो जन्मतो, शिक्षण घेतो, संसार करतो आणि एक दिवस मृत्यू पावतो. म्हणजेच परमधामामध्ये परमात्म्याकडे जातो. संचित कर्माप्रमाणे पुन्हा जन्म घेतो. मोक्ष-मुक्ती मिळेपर्यंत त्याचा हा प्रवास चालूच असतो- चार युगांमध्ये- सत्‌‍युग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग.
विश्वात वावरताना एक अनुभव सर्वांना नक्कीच येतो, तो म्हणजे- प्रत्येकाचा स्वभाव वेगळा; मग ते पिता-पुत्र, भाऊ-भाऊ अथवा जुळे भाऊ असले तरी! आध्यात्मिकतेप्रमाणे याचे मूळ कारण म्हणजे अनेक जन्माचे संस्कार म्हणून ते वेगवेगळे वागतात.
हे संस्कारदेखील विविध-

 • मूळ आत्म्याचे संस्कार ः पवित्रता, ज्ञान, सत्य, प्रेम, शांती, सूख, आनंद, शक्ती हे गुण त्याला परमात्म्याकडून मिळालेले असतात. म्हणून अशा आत्म्यामध्ये भगवंताचेच दर्शन घडते.
 • गर्भसंस्कार ः तो आत्मा एका शरीरात म्हणजे गर्भात प्रवेश करतो. तिथे त्याला विविध अनुभव येतात. त्याला सुरुवातीला ऐकायला येत नाही तरी जे विचार त्या घरातील व्यक्तींच्या मनात येतात तेदेखील म्हणे हा आत्मा ग्रहण करतो. गर्भाची थोडीथोडी वाढ झाली की त्याची इंद्रिये व मेंदू बनतात. त्यामुळे तो आत्मा कानांनी ऐकू शकतो. म्हणून तिथे जे तो ऐकतो ते संस्कारदेखील तो घेतो.
  त्यामुळे आपले शास्त्रकार सांगतात की, मुख्यत्वे मातेने व इतरांनीदेखील शुभ विचार करावे व त्यांचे बोलदेखील तसेच असावेत. अनेक वेळा आपल्या अज्ञानामुळे असे घडेलच याची खात्री नाही.
  एरव्हीचे उदाहरण म्हणजे बहुतेक कुटुंबांत मुलगा (कुलदीपक) व्हावा ही इच्छा प्रबळ असते. अनेकवेळा काहीजण तसे बोलूनही जातात. अगदी सहज. आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे ते त्या गर्भाला ज्ञात होते. त्याने जर पुरुष शरीरात प्रवेश केला असेल तर त्याला बरे वाटते. पण जर त्याने स्त्री शरीरात प्रवेश केला असेल तर त्याला दुःख होते.
  केव्हा केव्हा पहिला मुलगा जन्मलेला असतो त्यावेळी त्यांची साहजिक इच्छा असते की आता मुलगी व्हावी. आत्म्याचे शरीर स्त्रीलिंगी असेल तर ठीक, नाहीतर त्याच्या मनावर विपरित परिणाम होऊ शकतात.
  सारांश एवढाच की आपण इच्छा करतो अथवा बोलून जातो त्याच्या विरुद्ध जर त्या आत्म्याचे शरीर असेल तर त्याला दुःख होते. त्यामुळे भारतीय तत्त्ववेत्त्यांच्या मताप्रमाणे कुटुंबीय काय विचार करतात अथवा बोलतात याबद्दल अत्यंत दक्षता ठेवायला सांगतात.
 • कुटुंबाचे संस्कार ः मुलाच्या जन्मानंतर त्याची सर्व कर्मेंद्रिये- मन- बुद्धी कार्यरत होते. त्यावेळीदेखील घरातील प्रत्येक सदस्याने विचार-बोल-कर्म यांवर संपूर्ण नियंत्रण ठेवायला हवे. मूल जरी छोटेसे असले तरी संस्कार होणे ही अत्यंत सूक्ष्म प्रक्रिया असते.
  म्हणूनच भारतात माता गर्भवती झाली की कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहावे असा आग्रह होतो. सर्वांनी शुभविचार, शुभआचरण करावे असे सांगितले जाते. भगवंताची स्तोत्रे वाचावी, भजने करावी, चांगली गीते म्हणावी अशा प्रथा पूर्वी होत्या. तसेच पाचवा- सातवा- नववा महिना लागला की काही आनंददायक, आल्हाददायक उत्सव व व्रतवैकल्ये करत असत.
  सारांश- त्या गर्भवतीला व आतील बाळाला आनंदित ठेवून त्याच्यावर शुभसंस्कार केले जावेत.
 • समाजाचे संस्कार ः मूल जसजसे मोठे होते तसतसा त्याचा संबंध समाजातील इतर घटकांशी येतो. सुरुवातीला शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी, तद्नंतर शाळा-कॉलेजातील सवंगडी, शिक्षक व इतर कर्मचारी, पुढे पुढे काम-धंद्यातील लोकांचे संस्कार. तसेच उत्सवाच्या निमित्ताने भेटणाऱ्यांचे संस्कार.
 • वातावरणाचे संस्कार ः आपल्यातील प्रत्येकजण वेगवेगळ्या वातावरणात जन्म घेतो, राहतो, वाढतो. कुणी शहरात तर कुणी खेड्यात, कुणी शांत ठिकाणी तर कुणी घाईगर्दीत, कुणी पवित्र ठिकाणी तर कुणी साधारण ठिकाणी… तिथे निसर्ग वेगळा, व्यक्ती वेगळ्या, कामकाज वेगळे… देशाच्या सीमेवर तर वातावरण वेगळेच असते. त्याशिवाय नैसर्गिक आपत्ती. वेगवेगळ्या ठिकाणी विविधता…
  हे सगळे संस्कार वेगळे असले तर दोन व्यक्ती वेगळ्या असणे हे स्वाभाविक आहे. म्हणूनच सुज्ञाने तशी अपेक्षा ठेवू नये. तेच शहाणपणाचे ठरेल.
  या सर्व संस्कारांत आत्म्याचे परमात्म्याकडून मिळालेले संस्कार सर्वांवर सारखेच आहेत. पण इतर संस्कारांचा त्यांवर परिणाम होऊन ती व्यक्ती सज्जन अथवा दुर्जन बनते. त्याचा परिणाम त्याच्या आत्मशक्तीवर होतो.
  प्रत्येक युगातदेखील परिणाम वेगळा असतो असे जाणकार सांगतात. सर्वात जास्त भयानक दुष्परिणाम या कराल कलियुगात होतात. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता बाळगायला हवी.
  वेळोवेळी चिंतन व ध्यानाद्वारे आपली आत्मशक्ती वाढवणे आवश्यक आहे. दिवसभरातील विविध प्रसंगांमुळे, चांगल्या-वाईटामुळे आत्मशक्ती बदलत राहते. आजच्या प्रत्येक ठिकाणातील परिस्थितीमुळे शक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते. कारण सगळीकडे नकारात्मक कंपने जास्त असतात.
  आपल्या पूर्वजांनी एक ठरावीक दिनक्रम त्यामुळेच नक्की केला होता-
 • प्रातःकाली ब्रह्ममुहूर्तावर उठून योगसाधना/ध्यान.
 • संध्या-पूजा.
 • तिन्हीसांजेला पूजा-प्रार्थना-भजने-संतांच्या कथा, विविध दिवशी मंदिरदर्शन.
 • सोमवार/शुक्रवार ः श्रीमहालक्ष्मी, मंगळवार ः श्रीगणपती, गुरुवार ः श्रीदत्तात्रय, शनिवार ः श्री हनुमान.

(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांचे साहित्य)